Marathi Bible Reading | 5th Week of the Easter | Thursday 6th May 2021

 पुनरुत्थान

पाचवा सप्ताह 

गुरुवार 

६ मे  २०२१ 



संत डॉमणिक सावियो 
  वर्तनसाक्षी (१८४२-१८५७)

चार्ल्स आणि ब्रिजेट ह्यांच्या पोटी २ एप्रिल १८४२ साली डॉमनिक सावियो नामक पुत्ररत्न जन्माला आले. उत्तर इटलीतील मुरियाल्डो येथे डॉमणिकचे कुटुंब राहात होते. डॉन बॉस्को या महान युगप्रवर्तकाचा हा लाडका शिष्य बालपणापासूनच अत्यंत प्रार्थनामय जीवन जगत होता.
डॉमणिक सावियोच्या धार्मिकतेला त्याच्या घरी आणि घराजवळच असलेल्या देवळात भरपूर खतपाणी मिळत गेले. त्याचे आईवडील आणि घरातील श्रद्धाळू वातावरण ह्यामुळे देवाकडून मोठमोठी कृपादाने स्वीकारण्यासाठी डॉमणिक सावियोचे अंत:करण विशाल बनले. त्यांच्या घराशेजारी असलेल्या देवळात फा. जॉन बॉस्को नावाचे एक उमदे व्यक्तीमत्व हसतखेळत मुलांवर धार्मिक संस्कार  करीत होते. त्यांच्यात गाणी, गोष्टी, जादू अशा माध्यमातून देवाविषयी आदर व पवित्र मरियेविषयी भक्तीभाव जागृत करीत होते. त्यांनी किशोरवयातील डॉमणिक ह्याला देवावर संपूर्ण हृदयाने प्रेम करायला शिकविले.
डॉमणिक दररोज सकाळी ५.०० वा. मिस्साअर्पणाला न चुकता हजेरी  लावीत असे. तिथे वेदीसेवा करणे, मिस्सानंतर वैयक्तिक प्रार्थना करणे ह्यात तो वेळ घालवित असे. ऊन असो, वारा असो, पाऊस असो किंवा कडाक्याची थंडी असो, हा मुलगा अत्यंत विश्वासाने व प्रेमाने आपली धार्मिक कर्तव्ये बजावीत असे.
देवावर प्रेम करणे आणि इतरांना देवावर प्रेम करण्यास प्रवृत्त करणे ह्यात असणाच्या पारमार्थिक आनंदाचा अनुभव या बालकाने फा. जॉन बॉस्को ह्यांच्याकडून घेतलेला होता. पोप पायस दहावे ह्यांनी तर या बालकाविषयी पुढील गौरवोद्गार काढलेले होते. जीवनातील अखेरचा श्वास घेईपर्यंत ज्या बालकाने आपल्या स्नानसंस्काराच्या वेळी मिळालेल्या ख्रिस्ती प्रतिष्ठेला कधीही कलंक लावू दिला नाही. तो किशोरवयीन बालक निश्चितच संत मानला गेला पाहिजे.
वयाच्या पंधराव्या वर्षी तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असे जीवन जगत होता. आध्यात्मिक क्षेत्रात तो अत्यंत पारंगत झालेला होता.९ मार्च १८५७ रोजी मृत्यूशय्येवर खिळलेला असताना डॉमणिकला एक स्वर्गीय दृष्टांत झाला आणि तो हर्षातिशयाने ओरडला, “अरे वा! काय सुंदर दृश्य आहे हे ! "

शंभर वर्षे त्याच्या जीवनाविषयी सखोल अभ्यास करण्यात आला. शेवटी त्याला संतपद देण्याचे ठरले. १२ जून १९५४ साली आयोजित करण्यात आलेल्या त्याच्या भव्य संतीकरण सोहळ्यात पोप पायस बारावे ह्यांनी पुढीलप्रमाणे डॉमणिक सावियो ह्याच्या जीवनाचा आढावा घेतला. “आजच्या युगात युवकांच्या हृदयातून सत्प्रवृत्ती समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असताना केवळ १५ वर्षीय डॉमणिक सावियो ह्याला आल्ताराचा बहुमान देण्यास आम्हाला विशेष आनंद होत आहे. सर्व युवकांनी डॉमणिक सावियोचे अनुकरण करावे असे आदर्श जीवन तो जगला. ” 

मी मोठमोठ्या गोष्टी करू शकत नाही, परंतु जे काही मी करीन ते अगदी लहानातली लहान गोष्टसुद्धा देवाच्या महान गौरवासाठी करीन. संत डॉमणिक सावियो

✝️


ख्रिस्ताच्या प्रीतित राहणे म्हणजेच त्याच्या कृपेचा अनुभव घेणे, अंतर्यामी  बलसंपन्न होणे, अखंड शांतीचा अनुवभ घेणे, पापापासून परावृत्त होऊन  पवित्रतेचे जीवन जगणे. त्याच्या प्रीतित राहिल्याने सर्वकाळचा स्वर्गीय आनंद आपणास लाभणार आहे. म्हणून, आपण जसे स्वतःवर प्रेम करतो तसेच इतरांच्या अडचणीत त्यांना सहकार्य करावे, नम्रता धारण करुन परस्पर क्षमा करावी. आपण सदैव प्रभूच्या आज्ञा पाळाव्यात व त्याच्या परमानंदनामध्ये 
 सर्वकाळचा आनंद आपल्याला मिळावा म्हणून प्रार्थना करु या.

 प्रभू आपल्या सर्वांना आज्ञा पालनाचा संदेश देत आहे. आपण प्रभूच्या आज्ञेत  राहून, सर्वस्वी समर्पित जीवन जगण्यासाठी प्रेरणा व कृपा मागू या. 

✝️

 "माझ्या प्रीतीत राहा म्हणजे तुमचा आनंद परिपूर्ण होईल."
.
✝️
             
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये  १५:७-२१

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"माझे मत असे आहे की, जे परराष्ट्रीयातून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये."

पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला: “बंधुजनहो, तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या तोंडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून तुम्हांमध्ये देवाने माझी निवड केली आणि हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणांला तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. असे असताना जो जोखड आपले पूर्वज आणि आपणही वाहण्यास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? तर मग त्याच्याप्रमाणेच आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे.” 
तेव्हा सर्व लोक गप्प राहिले आणि बर्णबा आणि पौल ह्यांना आपल्याद्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे आणि अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले. मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला,
"बंधुजनहो, माझे ऐका. परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनने सांगितले आहे आणि ह्यांच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की, ह्यानंतर मी परत येईन आणि दावीदचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन. इतर माणसांनी आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा, हे जे त्याला युगादिपासून माहित आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. ह्यास्तव माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयातून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये, तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी आणि रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा. कारण प्राचीन काळापासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत.”

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ९६:१-३,१०

प्रतिसाद : देशोदेशी प्रभूची अलौकिक कृत्ये जाहीर करा.

१) एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा, 
पृथ्वीवरील समस्त जनहो, प्रभूचे गुणगान करा. 
प्रभूचे गुणगान करा, त्याच्या नामाचा धन्यवाद गा.

२) त्याने केलेल्या उद्धाराची दिवसानुदिवस घोषणा करा, 
देशोदेशी त्याचा महिमा वर्णा, 
साऱ्या मानवजातीला त्याची अलौकिक कृत्ये जाहीर करा.

३) सगळ्या राष्ट्रांना जाहीर करा, “प्रभू राजा आहे.” 
जगाची स्थापना करा, "प्रभू राजा आहे." 
जगाची स्थापना झालेली असून ते अढळ आहे. 
तो मानवजातीचा यथार्थ न्याय करील.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
येशूने म्हटले, “थोमा, तू मला पाहिले आहे म्हणून श्रद्धा ठेवली आहे. पाहिल्यावाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य.”
आलेलुया!

शुभवर्तमान योहान १५ :९-११

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

  "माझ्या प्रीतीत राहा म्हणजे तुमचा आनंद परिपूर्ण होईल."

येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हांमध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :ह्या जगातील कोणतीही शक्ती अथवा मृत्यू देवाचे प्रेम नष्ट करू शकत नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? परमेश्वर पिता आणि त्याचा पुत्र प्रभू येशूचे प्रेम हे सर्जनशील आहे, आणि या प्रेमाचा स्वीकार करणाऱ्या सर्वांना अतुलनीय आनंद आणि चिरकाल टिकणारी मैत्री प्राप्त होते. परमेश्वर जगावर प्रेम करतो कारण त्याने, त्याचा गौरव करण्यासाठीच हे जग आणि आपणा सर्वांना त्याची प्रतिमा आणि प्रति रुपासारखे निर्माण केले आहे. आपण प्रभू येशूशी आपणांस त्याच्यापासून विभक्त न करणाऱ्या ऐक्य, शांती आणि आनंद या मूल्यांनी एकत्रित असावे म्हणून परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला ह्या जगात पाठविले. आपला नाश होण्यासाठी नव्हे तर आपणास पाप आणि मृत्यूपासून सोडवून, तारण करण्यासाठी पाठविले. संत पॉल सांगतो की, आपणांस विपुल आनंद आणि आशा मिळू शकते कारण देवाने आपल्या अंतःकरणात त्याच्या प्रीतीचा वर्षाव केला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना नवीन आज्ञा दिली. नवीन आज्ञेचे सार काय आहे ? तर मरणापर्यंत प्रेम, शुद्ध करणारे प्रेम, स्वार्थ, भीती, अहंकार यावर विजय मिळविणारे प्रेम, इतरांसाठी सर्वस्व पणाला लावणारे प्रेम आणि निःस्वार्थी करणारे प्रेम होय.

प्रार्थना : हे परमप्रिय प्रेमळ परमेश्वरा, आमच्या अंत:करणात तुझ्या प्रीतिची ज्योत प्रज्वलित कर व आम्हाला तुझी प्रीतिची आज्ञा पाळण्यास प्रेरणा दे, आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या