Marathi Bible Reading | 5th Week of the Easter | Friday 7th May 2021

पुनरुत्थान

पाचवा सप्ताह 

शुक्रवार 

७ मे  २०२१ 




बेवर्लेचे संत जॉन
- महागुरू, वर्तनसाक्षी (... ७२१)

✝️


आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याबरोबर असलेले त्याचे मैत्रिचे नाते स्पष्ट करून सांगत आहे. खऱ्या मैत्रिमध्ये प्रेम, सहभागिता, जवळिकता व आदर असतो. मित्र ऐकमेकांना समजून घेतात. परस्परांच्या अपराधांबद्दल क्षमा मागतात व एकमेकांसाठी त्याग करायला तयार असतात. प्रभू येशू आज ह्या मैत्रिच्या नात्यावर आपल्याला चिंतन करण्यासाठी बोलावित आहे.

 मैत्रिच्या नात्याद्वारे प्रभू आपल्याला प्रेमाचा, त्यागाचा आणि  क्षमेचा संदेश देत आहे. ह्या क्षणभंगूर जगातील मैत्री केवळ स्वार्थासाठी आणि आत्मसंरक्षणासाठी असते. पैसा, धनदौलत व सन्मानासाठी अनेकदा जगातील  मैत्रीचे नाते संपूष्टात येत असते. मात्र प्रभू येशूबरोबर असलेली मैत्री निःस्वार्थी आणि सर्वकाळ टिकणारी आहे. प्रभू येशू विशेष रितीने आपल्याला त्याच्या  आपल्यावरील निःस्वार्थी प्रेमाबद्दल स्पष्ट करून सांगत आहे. म्हणूनच प्रभू  त्याच्या प्रीतीत राहण्यासाठी आणि त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी आपल्याला आवाहन करीत आहे.  प्रभू येशूने ज्याप्रमाणे आपल्या सर्वांसाठी आत्मत्याग  करून आपले तारण केले त्याप्रमाणे आपणसुद्धा इतरांसाठी त्याग करायची तयारी ठेवली पाहिजे.

✝️

 "मी तुम्हांला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे."

✝️
             
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये  १५:२२-३१

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 


"पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींविषयी तुम्हावर जास्त ओझे लादू, असे पवित्र आत्म्याला आणि आम्हाला योग्य वाटले. "
पौल आणि बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे, म्हणजे बंधुजनातील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहुदा आणि सीला ह्यांना अंत्युखिया येथे पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडीलजन ह्यांना वाटले. त्यांच्या हाती असे लिहून पाठवले:
“अंत्युखिया, सुरिया आणि किलिकिया येथील परराष्ट्रीयातले बंधुजन ह्यांना प्रेषित आणि वडीलवर्ग ह्या बंधुजनांचा सलाम. आमच्यापैकी काहीनी जाऊन आपल्या बोलण्याने तुम्हांला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करायला सांगितले नव्हते. ह्यास्तव आमचे एकमत झाल्यावर आम्हांला हे योग्य वाटले की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जिवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा आणि पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेली माणसे तुम्हांकडे पाठवावी. ह्याकरिता यहुदा आणि सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे. ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हांला तोंडी सांगतील. कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या  गोष्टींशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला आणि आम्हाला योग्य वाटले. त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी आणि जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी. ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेमकुशल असो."
त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखिया येथे गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले. त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ५७:८-१२

प्रतिसाद : प्रभो, लोकसमुदायामध्ये मी तुझे आभार मानीन.

 ) माझी मनोमन निष्ठा आहे देवा, 
माझी मनोमन निष्ठा आहे. 
मी गाईन, मी गुणगान गाईन. 
माझ्या आत्म्या, जागृत हो. 
सतार आणि वीणा हो, तुम्हीही जागृत व्हा. 
मी सूर्याला जागृत करीन.

२) प्रभो, लोकांसमक्ष 'तुझे आभार मानीन, 
राष्ट्रांमध्ये तुझे गुणगान गाईन. 
कारण तुझे अनंत प्रेम स्वर्गाला पोहचले आहे. 
आणि तुझे सत्य गगनाला भिडले आहे. 
हे देवा, वर आकाशात तुझे ऐश्वर्य प्रकट कर, 
साऱ्या पृथ्वीवर तुझा गौरव होवो !

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. 
त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. 
आलेलुया!

शुभवर्तमान योहान १५ :१२-१७

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे. "

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा. मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे. ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हांला ह्या आज्ञा करतो.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :एखादी व्यक्ती इतरांसाठी कोणती सर्वात मोठी प्रेमाची कृती करू शकते? प्रभू येशू आपणास मैत्री स्पष्ट करून सांगतो, स्वेच्छेने परस्परांवर विश्वास आणि आपुलकी दाखवून मित्रासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी असणे, इतके की, प्रसंगी संपूर्णजीवन समर्पित करणे. असे प्रेम करणे शक्य अथवा योग्य आहे का ? देवाने आपणास प्रेमाने व प्रेमासाठीच निर्माण केले. बायबल आपणांस सांगते की, देव प्रेम आहे. देव आपणासाठी जे काही करतो ते आपल्यावरील अपार प्रेमातून येत असते. त्याने आपणावर इतके प्रेम केले की आपण कधीही त्याची अपेक्षा केली नसती किंवा त्याच्या प्रेमाला पात्र ठरलो नसतो. त्याने आपणास पाप, गुलामगिरी आणि मृत्यू यापासून सोडविण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयारी ठेवली होती. म्हणूनच आपल्या पापांची भरपाई करण्यासाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशूला या जगात पाठविले. या देवाण-घेवाणीमध्ये देवाने त्याच्या एकुलत्या एका पुत्राचे क्रूसावर बलिदान दिले आणि आपल्याला त्याचे विपुल आणि शाश्वत जीवन देऊन आपणास त्यांची मुलेच नव्हे तर वारसही केले.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझा खरा मित्र बनण्यास व इतरांबरोबर मैत्रीचे नाते  प्रस्थापित करण्यास मला कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या