Marathi Bible Reading | 5th Week of the Easter | Saturday 8th May 2021

पुनरुत्थान

पाचवा सप्ताह 

शनिवार 

८ मे  २०२१ 




कनोसाची संत माग्दालेन 
-कुमारिका (१७७४-१८३५)

आपला संपूर्ण विश्वास देवावर टाका. म्हणजे जरी तुम्ही सर्व काही हरवून बसलात तरी त्याच्याठायी तुम्हाला सर्व काही मिळू शकते.
-संत माग्दालेन.

संत बॉनिफेस चौथे 
- परमगुरू वर्तनसाक्षी (... ६१५)


✝️

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्या निवडलेल्या प्रेषितांना विशेष मार्गदर्शनपर सल्ला देत आहे. सुवार्ता प्रसाराचे प्रेषितीय कार्य खूप आव्हानात्मक आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताला पाखंडी शास्त्री परुश्यांनी नाकारले. प्रभू येशूची शिकवण देवाकडून नाही, असे आरोप त्याच्यावर लावले. प्रभूला कावेबाज पद्धतीने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन त्याचे हालहाल केले व छळ करुन  क्रुसावरील मृत्यू दंड दिला. म्हणूनच प्रभू येशू म्हणत आहे, 'मी तुम्हाला  जगातून निवडले आहे.' प्रभू म्हणत आहे की, 'तुम्ही जगाचे नाहीत' म्हणजेच ' प्रभूच्या वचनाप्रमाणे आपण सार्वकालिक जीवनाचे सहभागीदार आहोत. ज्या जीवनदात्या व मुक्तीदात्या परमेश्वराला आपण ओळखतो त्याची साक्ष जगाला देण्यासाठी प्रभूने आपल्या सर्वांना निवडले आहे.
 देवाच्या योजनेप्रमाणे योग्य अशा सुवार्तीकांची निवड सुवार्ता प्रसारासाठी आणि देवाच्या कार्यासाठी होत असते. देवाने केलेली ही निवड आव्हानात्मक असते, तरी सुद्धा निवडलेल्या सर्वांनी ख्रिस्ताची साक्ष द्यायची असते.

ख्रिस्तामध्ये स्नानसंस्कार स्वीकारलेल्या आपणा सर्वाना प्रभूची सुवार्ता पसरविण्याचे पाचारण आहे. प्रभू म्हणतो, 'त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेहि पाळतील. '
✝️

 "मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते."

✝️
             
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये  १६:१-१०

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 


"इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य कर."

त्यानंतर पौल दर्बे आणि लुस्त्र येथे आला. तेथे तिमथी नावाचा शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या कोणाएका यहुदी स्त्रीचा मुलगा होता, पण त्याचा बाप हेल्लेणी होता. त्याला लुस्त्रातले आणि इकुन्यातले बंधू नावाजत होते. त्याने आपल्याबरोबर यावे अशी पौलची इच्छा होती. तेव्हा त्या ठिकाणी जे यहुदी होते त्यांच्याखातर त्याने त्याला घेऊन त्याची सुंता केली, कारण त्याचा बाप हेल्लेणी आहे हे सर्वांना ठाऊक होते. तेव्हा त्यांनी नगरांमधून जाता जाता येरुशलेमातील प्रेषित आणि वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळायला नेमून दिले. ह्यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली.
नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया आणि गलतिया ह्या प्रांतांमधून गेले आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनिया येथे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोवसला गेले. तेथे रात्री पौलला असा दृष्टान्त झाला की, मासेदोनियाचा कोणीएक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे : "इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर." त्याला असा दृष्टान्त झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगायला देवाने आम्हाला बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १००:१-३,५

प्रतिसाद : पृथ्वीवरील सर्व लोकहो, प्रभूचा जयजयकार करा.

१) पृथ्वीवरील सर्व लोकहो, प्रभूचा जयजयकार करा.आनंदाने प्रभूची सेवा करा. आनंदगीते गात त्याच्यासमोर या.

२) प्रभू हाच देव आहे याची जाणीव ठेवा. आमचा निर्माणकर्ता तोच, आम्ही त्याचेच, त्याचे लोक, त्याच्या कुरणातला कळप आहो.

३) खरोखर प्रभू चांगला आहे, त्याचे वात्सल्य अनंतकाळ टिकते. त्याची सात्त्विकता पिढ्यान्पिढ्या टिकते.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा.
आलेलुया!

शुभवर्तमान योहान १५ :१८-२१

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 “तुम्ही जगाचे नाही, परंतु मी तुम्हांला जगातून निवडले आहे. "

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते. दास धन्यापेक्षा मोठा नाही, हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील, त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील. परंतु ते माझ्या नावाकरिता हे सर्व तुम्हाला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :तुम्ही या जगाचे नाही, ह्याविषयी येशूला काय सांगावयाचे आहे ? समाजातील जे लोक देवाच्या विरोधात आहेत, त्याच्या योजनेला न जुमानणाऱ्या लोकांविषयी आहे. या जगाने येशूला नाकारले, त्याचा अनादर करून अपमानास्पद वागवले. त्याच्या शिष्यांनाही असेच वागवून त्यांची बेअब्रू केली. प्रभूची भूमिका स्पष्ट आहे. एकतर आपण त्याच्या बाजूने किंवा त्याच्या विरोधात असू, कुंपणावर बसण प्रभूला पसंत नाही. म्हणून प्रभू सांगतो, तुम्ही ना उष्ण, ना तुम्ही थंड. पावा वाजवला तर नाचला नाही, बासरी वाजवली तर शोक केला नाही. एक तर तुम्ही त्याच्या राज्यासाठी प्रकाश आणि सत्य नाही तर तुम्ही अंधार आणि फसवणूक आणि असत्य आहात. ह्या राज्यासाठी यशया संदेष्टा म्हणतो, जे वाईटाला बरे व बऱ्याला वाईट म्हणतात ते प्रकाशाला अंधकार आणि अंधकाराला प्रकाश समजतात. गोड ते कडू व कडू ते गोड मानतात, त्यांचा धिक्कार असो. जर आपणास देवाच्या सत्याच्या प्रकाशात जीवन जगायचे असेल तर आपण चांगले आणि वाईट, सत्य आणि लबाडी यातील अचूक भेद कसा करावा ? देवाचे खरे प्रेम आणि मार्ग आपणास त्याच्या प्रेमळ सत्य आणि चांगुलपणाकडे ओढत असते. आपण खरोखर देवावर प्रेम करीत असू तर त्याला शरण जाऊन त्याच्या दिव्य शब्दांचे पालन करू. जो देवाचा मित्र आहे, त्याची ऐहिक जगाशी मैत्री अपेक्षित नाही ऐहिक जग देवाचे सत्य, मार्ग आणि नीतिमत्तेच्या विरोधात आहे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्हाला सुवार्ता प्रसार करण्यासाठी तुझ्या धैर्याचा व  सामर्थ्याचा आत्मा बहाल कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या