Marathi Bible Reading | 6th Sunday of the Easter | 9th May 2021

पुनरुत्थान

सहवा रविवार 

९ मे  २०२१ 




✝️

संत योहान आजच्या दुसऱ्या वाचनात स्पष्ट करीत आहे की, 'देव प्रीति आहे,' हीच प्रीति परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रगट करुन आपल्या प्रत्येकाला त्या प्रीतित सहभागी होण्यास पाचारण केले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वांवर प्रीति  केली आणि आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन आपल्या सर्वांचे तारण केले आहे.  परमेश्वराच्या प्रीतित आपण सतत वाढत राहावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने  आपल्याला देवप्रीति व परस्पर प्रीतिचा महामंत्र दिला आहे. 

 प्रभू येशूच्या  प्रीतित रहाणे म्हणजे काय ह्यावर आपण आज चिंतन करु या. देवाचे प्रेम निरपेक्ष आहे, पवित्र आहे व सेवाभावी आहे. देवाच्या प्रेमात त्याग, क्षमा, समेट व शांती  आहे. देव सर्वांवर सारखेच प्रेम करतो. आपले प्रेम कशा प्रकारचे आहे ? देवावरील, स्वत:वरील आणि परस्परावरील प्रेम आपण कशा प्रकारे प्रकट करतो ? प्रेम केवळ बोलून नाही तर प्रत्यक्ष कृतीत व्यक्त करता आले पाहिजे.  प्रभूच्या आज्ञा पाळायच्या कारण प्रभू म्हणतो, 'मी तुम्हाला निवडले आहे. आपण त्याचे निवडलेले प्रियजन आहोत. त्याच्यासारखेच इतरांवर प्रेम करण्यासाठी प्रभू येशू आपल्याला बोलावित आहे.

प्रभू त्याच्या प्रीतीत राहण्यास, प्रीतीत वाढण्यास, प्रीतित परोपकारी जीवन जगण्यास व हे जग सुंदर आणि प्रेमळ बनविण्यास बोलवित आहे.

✝️

 "जसे मी तुम्हांवर प्रेम केले तसे तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे, अशी माझी आज्ञा आहे. 

✝️
             
पहिले वाचन प्रे. कृ.  १०:२५-२६.३४-३५.४४-४८

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन

"परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव झाला.'

पेत्र आत जात असता कर्नेलियस त्याला सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, “उभे राहा. मीही मनुष्यच आहे."
तेव्हा पेत्रने बोलण्यास आरंभ केला : “देव पक्षपाती नाही, हे माझ्या पक्के ध्यानात आहे, तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो आणि ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे."
पेत्रचे हे बोलणे चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव झाला आहे, असे पाहून पेत्रबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या आणि सुंता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. कारण त्यांनी त्यांना अनेक भाषांतून बोलताना आणि देवाची थोरवी गाताना ऐकले. तेव्हा पेत्रने म्हटले, “आम्हाला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्याचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल ?" मग येशू ख्रिस्ताच्या नावात त्याचा बाप्तिस्मा व्हावा अशी त्याने आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ९८:१,- ४

प्रतिसाद : प्रभूने आपले तारण राष्ट्रांसमक्ष प्रकट केले आहे.

१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र बाहूने तारण साधले आहे.

२) परमेश्वराने आपण सिद्ध केलेले तारण कळवले आहे, राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. इस्त्राएलच्या घराण्यावरील आपली दया आणि सत्यता यांचे त्याने स्मरण केले आहे.

३.)पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे तारण पाहिले आहे अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, उच्च स्वरात आनंदाने गा.


दुसरे वाचन १योहान ४:७-१०

वाचक : योहानलिखित पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

"देव प्रेमस्वरूप आहे. "

प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रेम करावे, कारण प्रेम देवापासून आहे. जो कोणी प्रेम करतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि तो देवाला ओळखतो. जो प्रेम करीत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रेमस्वरूप आहे. त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे म्हणून देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे; ह्यावरून देवाचे आपल्यावरील प्रेम प्रकट झाले. प्रेम म्हणावे तर हेच. आपण देवावर प्रेम केले असे नाही, तर त्याने तुम्हांआम्हांवर प्रेम केले आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
येशूने म्हटले, माझ्यावर प्रेम करणारा माझे वचन पाळील, 
माझा पिता त्याच्यावर प्रेम करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ.

आलेलुया!

शुभवर्तमान योहान १५ :९-१७

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

"आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा मोठे प्रेम दुसरे नाही."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जसे पित्याने माझ्यावर प्रेम केले तसे मीही तुम्हांवर प्रेम केले आहे. तुम्ही माझ्या प्रेमात राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रेमात राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रेमात राहाल. माझा आनंद तुम्हांमध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. " 
"जसे मी तुम्हांवर प्रेम केले तसे तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे, अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा मोठे प्रेम दुसरे नाही. मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा. मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे. तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे हा हेतू आहे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हांला ह्या आज्ञा करतो.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :गेल्या रविवारी विपुल फळ देण्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यात आले. आज प्रभू येशू आपल्याला टिकणारे फळ देण्याविषयी सांगत आहे आणि हे टिकणारे फळ म्हणजे प्रेम ! पोप फ्रान्सिस ह्यांच्या मते या जगात टिकणाऱ्या दोन व्यक्ती म्हणजे परमेश्वर आणि तुमचा शेजारी. या दोघांवर प्रेम करूनच आपण आपले जीवन सार्थकी लावू शकतो. मात्र त्यासाठी माणसाने स्वतःवरही प्रेम करायला हवे. 
१) सुदृढ स्वप्रीती : स्वतःवर प्रेम करणे म्हणजे मन मानेल तसे वागणे नव्हे तर आपण देवाची प्रतिमा आहोत, पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत, ख्रिस्तसभेचा सभासद आहोत या भावनेने स्वतःची उचित प्रतिष्ठा जोपासणे. स्वतःच्या गरजा, इच्छा, भावना, विचार व ध्येय - स्वप्ने ह्यांचा यथायोग्य आदर करणे येशूने आपल्याला टिकणारे फळ धारण करण्यासाठी निवडले व नेमले आहे असा सार्थ अभिमान बाळगणे. आपल्या शरीराचा वापर सुवार्ता प्रसारासाठी व्हावा म्हणून स्वतःची शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक जडणघडण करणे. 
२) भावपूर्ण देवप्रीती : आजच्या दुसऱ्या वाचनात देव प्रीती आहे असे आपल्याला सांगण्यात आलेले आहे. परमेश्वराने आपल्यावर प्रथम प्रीती केली. येशू म्हणतो, 'जशी मी तुम्हांवर प्रीती केली... माझ्या प्रीतीत राहा. परमेश्वरावर प्रेम करायचे ते केवळ त्याच्याकडून काही मिळावे म्हणून नव्हे, कर्तव्य म्हणून नव्हे किंवा चुकीच्या भीतीपोटी नव्हे तर तो सर्वांच्या प्रेमास पात्र आहे. त्याने आपल्यावर अनंत उपकार केले आहेत, केवळ प्रेमानेच आपण त्याचे उतराई होऊ शकतो म्हणून देवावर प्रेम करावे. 
३) निःस्वार्थी शेजारप्रीतीः आजच्या पहिल्या वाचनात पेत्र परराष्ट्रीयांवर प्रेम करताना दिसतो. त्यामुळे सर्वांवर पवित्र आत्मा उतरतो. शुभवर्तमानात येशू शेजारप्रीतीचा एक घटक सादर करतो : मैत्री. मी तुम्हांस मित्र म्हटले आहे. जशी पित्याने त्याच्यावर प्रीती केली तशी त्याने आपल्यावर प्रीती केली आहे. याचा अर्थ आपली शेजारप्रीती हे आपल्या देवप्रीतीचे वा देवाचे आपल्यावरील प्रेमाचे प्रतिबिंब असायला हवे.

आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात मला परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव कुठे येतो ? मी परमेश्वरावरील व इतरांवरील प्रेम कसे व्यक्त करतो ? स्वतःवरील प्रेम प्रकट करण्यासाठी मी काय काय करतो ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझा प्रेमळ स्पर्श आम्हा सर्वास व्हावा व आमचे जीवन सर्वासाठी प्रेमाचा निर्झर बनावा म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या