पुनरुत्थान
सहवा सप्ताह
सोमवार
१० मे २०२१
संत पौलाने फिलिपै मध्ये ख्रिस्ताची साक्ष देऊन देवाची सुवार्ता सांगितली, त्या नगरात लुदिया नावाच्या भक्तीमान स्त्रीने प्रभूवर विश्वास ठेवला आणि तिने व तिच्या घराण्याने बाप्तिस्मा स्वीकारला, तेव्हापासून ती देवाच्या सुवार्तिकांची सेवा करु लागली. संत पौलाने दिलेली साक्ष व त्याने केलेल्या प्रभूच्या सुवार्तेचा प्रसार वाढतच गेला, असे पहिल्या वाचनातून प्रत्ययाला येते.
प्रभू येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविषयी स्पष्ट करुन सागत आहे की, 'सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल, आणि तुम्हीहि साक्ष द्याल. देवपित्याने निर्मिती करुन जीवनाची परिपूर्तता केली. देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व प्रकारच्या पापांतून व अंधारातून मुक्ती दिली व आज पवित्र आत्मा प्रभू येशूची साक्ष जगात देऊन पवित्र करणाचे कार्य करीत आहे. सत्य हेच आहे की प्रभूयेशू ख्रिस्ताद्वारे आपल्या पापापासून आपली मुक्तता झाली असून आपणास क्षमादान मिळाले आहे व आपले तारण झाले आहे. पवित्र आत्म्याचा स्वीकार करणाऱ्यांस परमेश्वर अनेक प्रकारची कृपादाने बहाल करतो. ज्ञान, शहाणपण, समंजसपणा, आरोग्यदान व अद्भूत कार्य करण्याचे सामर्थ्य पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त होते. पवित्र आत्म्याठायी प्रेरणा व सामर्थ्य मिळाल्यामुळे अनेक माणसे आज ख्रिस्ताची सुवार्ता पसरवित आहेत.
✝️
"ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल,"
✝️
पहिले वाचन प्रे. कृ. १६:११-१५
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"लुदियेचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. "
त्रोवसपासून हाकारून आम्ही नीट समथ्राके येथे गेलो आणि दुसऱ्या दिवशी नियापुलीस गेलो, तेथून फिलीपी येथे गेलो, ते मासेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हांला वाटले तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती, ती धुवतीरा नगरची असून जांभळी वस्त्रे विकीत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा आणि तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानीत आहा तर माझ्या घरी येऊन राहा." तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १५०:१-६,९
प्रतिसाद : परमेश्वर आपल्या लोकांवर प्रसन्न आहे.
१) परमेश्वराचे स्तवन करा! नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा, भक्तांच्या सभेत त्याचे स्तुतिस्तोत्र गा. इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो. सियोनची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हास पावोत.
२) ती नृत्य करीत त्याच्या नामाचे स्तवन करोत, डफ आणि वीणा यांवर त्याला स्तुतिस्तोत्रे गावोत. कारण परमेश्वर आपल्या लोकांवर प्रसन्न आहे. तो दीनांना तारणाने सुशोभित करतो.
३) भक्त गौरवामुळे उल्हासोत, ते आपल्या अंथरुणांवरुन हर्षघोष करोत. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो. हे त्यांच्या सर्व भक्तांना भूषण होईल, परमेश्वराचे स्तवन करा!
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे, आणि आम्हांला प्रकाशित केले आहे.
त्याने आपल्या रक्ताने आमचे तारण केले आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १५ :२६-१६:४
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"सत्याचा आत्मा माझ्याविषयी साक्ष देईल."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल आणि तुम्हीही साक्ष द्याल, कारण तुम्ही माझ्याबरोबर आरंभापासून आहा."
“तुम्ही अडखळविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ते तुम्हांस सभाबहिष्कृत करतील, इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो असे वाटेल, अशी वेळ येत आहे. त्यांनी पित्याला आणि मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील. मी तुम्हांला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या की, त्यांची वेळ आली म्हणजे त्या मी सांगितल्याची तुम्हांला आठवण व्हावी."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- तुम्ही खूप अडचणीत अथवा संकटात असताना तुम्हांस मदत किंवा आधार कुठे उपलब्ध होतो? संकटकाळी वा आपत्तीच्या वेळी खरी मैत्री घट्ट होत असते किंवा मैत्री ढिली पडत असते. येशू आपला मार्गदर्शक, सल्लागार, मदतनीस, कैवारी म्हणून पवित्र आत्म्याला देतो. पवित्र आत्मा आपला समर्थक आणि मदतनीस आहे. जो आपल्या जीवनातील कठीण, संकट आणि आव्हानप्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करतो. त्या संकटातून आपल्याला सुरक्षित बाहेर काढतो. क्रूस, दुःखसहन आणि पुनरुत्थान आणि प्रभू येशूचा गौरव होण्याची वेळ जवळ येऊन ठेपली तेव्हा आपल्या शिष्यांना पवित्र आत्मा, पवित्र त्रैक्यातील एक व्यक्ती म्हणून त्याचे कार्य पूर्णपणे प्रकट करतो. पवित्र आत्म्याविषयी प्रभू येशू सांगत आहे की, पहिल्या प्रथम पवित्र आत्म्याला पिता-पुत्र ह्यांच्या पासून वेगळे करता येत नाही. पवित्र आत्मा एक दैवी जीवन आहे आणि जे देवाचा शब्द ग्रहण करतात व तो आचरणात आणतात त्यांच्या मनात, हृदयात व जीवनात श्रद्धा जिवंत करण्याचे पवित्र आत्मा कार्य करतो. तो देवाचे ज्ञान, शहाणपण आणि देवाची योजना प्रकट करतो आणि युगानयुगे पिता-पुत्र करीत असलेले कार्य पाहण्यासाठी आपणास श्रद्धेची दृष्टी देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाने केलेल्या महान कार्याचे पवित्र आत्म्याद्वारे साक्षीदार होता येते.
प्रार्थना : हे प्रभू, आमच्या प्रत्येक विचारांतून व कृतीतून तुझी साक्ष इतरांना देण्यास आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे, आमेन.

0 टिप्पण्या