Marathi Bible Reading | 6th Week of the Easter | 11th Tuesday May 2021

पुनरुत्थान

सहवा सप्ताह 

मंगळवार 

११ मे  २०२१ 



 लाकोनीचे संत इग्नेशिअस

 ( वर्तनसाक्षी  १७०१-१७८१ )
✝️

प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार बनलेल्या प्रेषितांनी श्रद्धेने देवाच्या सुवार्तेचा प्रसार केला. परंतु त्याचवेळी त्यांना विरोधाला आणि छळाला सामोरे जावे लागले. तशाही परिस्थितीत पवित्र आत्माचे सामर्थ्य व कृपा त्यांना प्रेरणादायी ठरली. प्रभू येशूवर विश्वास ठेवून येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला संत  पौल व सीला सामोरे गेले. 
संत पौल व सीला ह्यांना झालेला बंदिवास व त्यांची अद्भुतरित्या झालेली सुटका ह्याचा वृतांत आहे.  ह्यांची वस्त्रे फाडली व पुष्कळ फटके मारुन त्यांचे पाय खोड्यात अडकवून त्यांना बंदिखान्यात टाकण्यात आले. तशा परिस्थितीत त्यांनी देवाची स्तुति आराधना केली व देवाने त्यांची सुटका केली. बंदिशाळेच्या नायकाने घडलेल्या  घटनेवर श्रद्धा ठेवून तो पौल व सीला ह्यांच्या पाया पडला. त्यांनी म्हटले, ‘प्रभू  येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.' अंध श्रद्धेच्या  काळोखात, अत्याचाराच्या विळख्यात सापडलेल्या तसेच दुःख, संकटे, आजार व पापाच्या विळख्यात अडकलेल्या सर्वांनी आजच्या ह्या वचनावर  चिंतन करणे खूप गरजेचे आहे. 


 
"मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही."
✝️
             
पहिले वाचन प्रे. कृ.  १६:२२-३४
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन

 “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल."

लोक पौल आणि सीला ह्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली आणि त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. परंतु मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सीला हे प्रार्थना करीत असता आणि गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की, बंदिशाळेचे पाय डगमगले. सर्व दरवाजे लागलेच उघडले आणि सर्वांची बधने तुटली. तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तरवार उपसून आपलाच घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको, कारण आम्ही सर्वजण येथेच आहो." मग दिवे मागवून तो आत धावत गेला. कापत कापत पौल आणि सीला ह्यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे ?" ते म्हणाले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल.” त्यांनी त्याला आणि त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेला त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा साफ केल्या आणि तेव्हाच त्याने आणि त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. मग बंदिशाळेच्या नायकाने त्यांना घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने आणि त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १३८:१-३,७-८

प्रतिसाद : प्रभो, तुझा हात पुढे कर आणि मला वाचव.

१) मी अगदी मनापासून तुझे उपकारस्मरण करीन, तू माझा धावा ऐकला आहेस. दूतांसमोर तुझी स्तोत्रे गाईन तुझ्या पवित्र मंदिरात मी तुझी उपासना करीन.

२) तुझ्या दयेमुळे आणि तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नामाचे उपकारस्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नामाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला, तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या आत्म्याला सामर्थ्य प्राप्त झाले. 

३) तुझा हात पुढे कर आणि मला वाचव, परमेश्वर माझे सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे, तू आपल्या हातचे काम मध्येच सोडू नको.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभू जो क्रुसावर आमच्याकरिता टांगलेला होता तो थडग्यातून उठलेला आहे..

आलेलुया!

शुभवर्तमान योहान १६:५-११

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

  "मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कोठे जाता असे तुमच्यापैकी कोणी मला विचारत नाही. ह्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. तरी मी तुम्हांला खरे ते सांगतो: मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी आणि न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करील. ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत ह्यावरून पापाविषयी, मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही ह्यावरून नीतिमत्त्वाविषयी आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, ह्यावरून न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करीन

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :कधी कधी देव आपल्यापासून दूर गेला आहे, असे आपल्याला का वाटते ? बऱ्याचदा, आपणास विभक्त होणे आणि नातेसंबंध गमावणे ह्यामुळे दुःख आणि वेदना होतात. येशू प्रेषितांना, त्याचे पित्याकडे परत जाण्याविषयी ठळकपणे सांगतो. हे ऐकून प्रेषितांना फार वाईट वाटते. येशू त्यांना स्पष्ट करतो की, त्याचे पित्याकडे परत जाणे हे त्यांच्याच हिताचे आहे. असे असले तरी येशू त्यांना वचन देतो की, तो त्यांना अनाथ सोडणार नाही. येशू त्यांना कैवारी म्हणजे पवित्र आत्मा त्यांच्यावर पाठवील. संत पॉल आपणास आठवण करून देतो की, येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या देवाच्या प्रेमापासून कोणीही आणि काहीही आपणास विभक्त करू शकत नाही. प्रभू येशू आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याची तीन महत्त्वाचे कार्य सांगत आहे. पाप, नीतिमत्त्व आणि न्यायनिवाडा ह्याच्या अस्तित्वाविषयी जगाला खात्री पटवून देणे. पवित्र आत्मा आपणांस पापमुक्त करणार आहे. आपण अविश्वासू व पापी असल्याची पवित्र आत्मा खात्री पटवून देतो आणि आपणास नम्रतेने प्रभू येशूच्या क्रुसाच्या पायाशी घेऊन जातो. पवित्र आत्मा आपणास देवाची प्रीती आणि क्षमाशीलता याविषयी आणि आपण देवाची दया आणि कृपेवर संपूर्णतः अवलंबून असल्याची खात्री करून देतो. आपल्याला अविश्वासू पापी मार्गापासून सोडवून प्रेम व सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची आवश्यकता आहे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्यावरील श्रद्धेत वाढण्यास व तुझी तारणदायी कृपा  मिळविण्यास पात्र बनावेत म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या