Marathi Bible Reading | 6th Week of the Easter | 12th Wednesday May 2021

पुनरुत्थान 

सहवा सप्ताह 

बुधवार 

१२ मे  २०२१ 


 संत नेरियस, आखिलियुस आणि डॉमिटिला
- रक्तसाक्षी (पहिले शतक)
✝️

पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने संत पौलाने अरीपगातील अनेक दैवतांची पूजा करणाऱ्या अथेनैकरांना खऱ्या देवाची ओळख करून दिली. त्यांच्या दैवतापैकी 'अज्ञात देवाची वेदी' म्हणजेच खरा निर्माणकर्ता प्रभू परमेश्वर असल्याची खात्री संत पौलाने त्यांना पटवून दिली.  संत पौल म्हणतो की, 'अज्ञात देव म्हणजेच पृथ्वीचा निर्माता आहे. तोच  जीवन देतो, तो आपल्या पैकी कोणापासूनहि दूर नाही.' आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहो. आपण वास्तविक त्याचा वंश आहोत. सर्वांनी पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करितो. तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतीमत्वाने करणार आहे. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे व त्याच्या  कार्याविषयीचे मार्गदर्शन दिले. 'सत्त्याचा आत्मा येईल तेव्हा, तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्त्यात नेईल' असे आश्वासन शिष्यांना मिळाले. प्रभू येशूच्या वचनावर व आश्वासनावर विश्वास ठेवून प्रेषितांनी मोठ्या धैर्याने सुवार्ता प्रचारास सुरुवात केली.
संत पौलाने जशी सत्या विषयी साक्ष दिली तशी आपणा प्रत्येकाला प्रेरणा  लाभावी म्हणून पवित्र आत्म्याठायी आपण प्रार्थना करु या. 

✝️

"सत्याचा आत्मा तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. "
✝️
             
पहिले वाचन प्रे. कृ.  १७:१५,२२-१८:१

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन

“ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता त्या देवाला मी तुम्हांला जाहीर करतो. "

पौलला पोहोचविणाऱ्यांनी त्याला अथेन्सपर्यंत नेले आणि सीला आणि तीमथी ह्यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्याची आज्ञा घेऊन ते निघाले. पौल अरीयपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला :
“अहो अथेन्सकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहा असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, अज्ञात देवाला, ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या देवाने जग आणि त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन, प्राण आणि सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे. त्यांचे नेमलेले समय आणि त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत; त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो आणि आहो. तसेच तुमच्या कवींपैकीही कित्येकांनी म्हटले आहे,
"आपण वास्तविक त्याचा वंश आहो."
तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने आणि कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो. आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे, त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांना पटवले आहे."
तेव्हा मृताच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू." इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही माणसांनी त्याला चिकटून राहून विश्वास ठेवला, त्यात दिओनुस्य अरीयपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री आणि त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते. त्यानंतर तो अथेन्स सोडून करिंथ येथे गेला.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १४९:१-२,११-१४

प्रतिसाद : तुझ्या ऐश्वर्याने आकाश आणि पृथ्वी भरली आहे.

१)  परमेश्वराचे स्तवन करा! आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. अहो त्याच्या सर्व दूतांनो, त्याचे स्तवन करा. त्याच्या सर्व सैन्यांनो, त्याचे स्तवन करा.

२) पृथ्वीवरील राजे आणि सर्व प्रजा, अधिपती आणि पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश; कुमार आणि कुमारी, वृद्ध आणि तरूण त्याचे स्तवन करा,

३) ही सगळी परमेश्वराच्या नामाचे स्तवन करोत कारण केवळ त्याचेच नाम उच्च आहे त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या आणि आकाशाच्या वर आहे.

४ ) त्याने आपल्या लोकांचा उत्कर्ष केला आहे. हे त्याच्या सर्व भक्तांना त्याच्याजवळ असलेल्या लोकांना म्हणजे इस्राएलच्या संततीला स्तुतिपात्र झाले आहे. परमेश्वराचे स्तवन करा.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

सर्व वस्तूंचा मस्तक असलेला ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे. त्याने सर्व मानवजातीवर दया केली आहे.

आलेलुया!

शुभवर्तमान योहान १६:१२-१५

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

 "सत्याचा आत्मा तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. "

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मला अद्यापि तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; तो आपल्या स्वतः चे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल, तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील. तो माझा गौरव करील, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवीन.


प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :तुम्ही सत्याचे भुकेले आहात का? येशूने म्हटले की, तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे. आपण सत्य निर्माणही केले नाही आणि त्याचा शोधही लावला नाही. देव सत्य आहे. सत्य ही देवाची देणगी आहे. येशू आपल्या शिष्यांना सांगतो, जे सत्य, न्याय, योग्य आणि चांगले ते उघड करणे, ही पवित्र आत्म्याची भूमिका आहे. सत्य वस्तुनिष्ठ आहे आणि सत्य विश्वसनीय व योग्य आहे हे ठासून सांगावे, आणि हे विश्वसनीय, अधिकृत आणि बंधनकारक असे सादर करावे. काही लोकांना सत्याची भीती वाटते, कारण त्यामुळे त्यांच्या विचार, निर्णय आणि कार्य यावरील स्वातंत्र्यात अडथळा निर्माण होईल असे त्यांना वाटते. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की, सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. सत्य आपणास असत्य, दिशाभूल, संशय आणि भ्रामक गोष्टींपासून मुक्त करते. देवांमध्ये असत्य, खोटारडेपणा नाही. कारण परिपूर्ण सत्य, चांगुलपणा आणि न्याय आहे. देव सत्य आणि चांगुलपणाचा उगम असून जितके आपण देवाजवळ जाऊ तितके देवाचा शब्द ऐकून आपल्यासाठी त्याची इच्छा समजून घेऊ शकू. असे आपण देवाच्या ज्ञानात, त्याच्या महान प्रेमात शहाणपणात आणि आपल्यासाठी असलेल्या त्याच्या योजनेत वाढत राहू.

प्रार्थना : हे पवित्र आत्म्या, ये आणि तुझ्या अगाथ शहाणपणाने व ज्ञानाने  आम्हाला भरुन टाक, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या