Marathi Bible Reading | 6th Week of the Easter | 13th Thursday May 2021

  

पुनरुत्थान 

सहवा सप्ताह 

गुरुवार 

१३ मे  २०२१ 


 फातिमा मातेचा सण

✝️

गुरूवार १३ मे २०२१ (
(प्रे. कृ. १८:१-८, स्तोत्र ९८:१-४, योहान १६:१६-२०) किंवा प्रकटी ११:१९अ, १२:१-६अ, १०,
स्तोत्र ४५:११-१२, १४-१७, लूक ११:२७-२८ " 

संत मेरी माझरेल्लोचा सण 
“प्रत्येक वेळी घड्याळाचा ठोका वाजतो तेव्हा मी मनाशी म्हणते, एका तासाने ह्या पृथ्वीवरील जीवन कमी झाले. एका तासाने आपण सार्वकालिक जीवनाच्या जवळ आलो, पवित्र मरियेवर भरवसा ठेवा ती तुम्हाला सर्व बाबतीत मदत करील.” - संत मेरी माझरेल्लो.

 पवित्र मरियेने देवाचे वचन आत्मसात करून ते आपल्या जीवनात आचरणात आणले. मात्र मरियेसारखे जीवन असणे खूप महत्त्वाचे आहे. 

आज ख्रिस्त सभा फातिमा गावी दर्शन दिलेल्या मरिया मातेचा सन्मान व सण साजरा करीत आहे. पवित्र मरिया मातेने सुद्धा प्रभूची वचने पाळण्याचेच आवाहन आपल्या दर्शनातून दिलेले आहे. पवित्र मरियेकडे आशेने विनंती करणाऱ्या सर्वांना ती  सांगत आहे की, 'तो जे सांगेल ते तुम्ही करा.' म्हणजेच येशूची वचने  पाळण्याचे आवाहन मरिया माता आपल्याला सतत करीत असते. आजच्या  शुभवर्तमानातील येशूचा संदेश, वचन ऐकण्याचा व वचन पाळण्याचा आहे. आपण त्यावर चिंतन करू या.

प्रभू येशूची वचने आचरणात आणण्यासाठी आपण आपल्या मनाचा निर्धार करू या कारण त्यातच खरे जीवन सामावलेले आहे. मरियेसारखे आदर्श जीवन जगण्यासाठी आपण प्रेरणा घेऊ या. मरियेने दिलेला पश्चातापाचा आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्याचा संदेश आमलात अणू या.
✝️

"तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल."
✝️
             
पहिले वाचन प्रे. कृ.  १८:१-८
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन

पौल त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून व्यवसाय चालवला. तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करीत असे."

पौल अथेन्स सोडून करिंथ येथे गेला. तेव्हा पंत येथील अक्किला नावाचा कोणीएक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौदियसने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटलीहून नुकताच आला होता. त्यांच्याकडे पौल गेला. त्यांचा आणि ह्यांचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालवला. त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहुद्यांची आणि हेल्लेण्यांची खात्री करून देत असे.
सीला आणि तीमथी हे मासेदोनियाहून आले तेव्हा येशू हाच ख्रिस्त आहे, अशी यहुद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात पौल गढून गेला होता. परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, "तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर! मी निर्दोष आहे. आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार.” मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता त्याच्या घरी तो गेला. तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने आपल्या सर्व घराण्यांसह प्रभूवर विश्वास ठेवला आणि ते ऐकून पुष्कळ करिंथकरांनी विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ९८:१-४

प्रतिसाद : परमेश्वराने आपले तारण राष्ट्रांना प्रकट केले आहे.

१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत.   त्याच्या उजव्या हाताने त्याच्या पवित्र बाहूने तारण साधले आहे.

२) परमेश्वराने आपण सिद्ध केलेले तारण विदित केले आहे.  राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. इस्राएलच्या घराण्यावरील आपली दया आणि सत्यता यांचे त्याने स्मरण केले आहे.

३) पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण पाहिले आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो,परमेश्वराचा जयजयकार करा.
उच्च स्वरात आनंदाने गा; त्यांची स्तोत्रे गा.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

ख्रिस्त मेलेल्यातून खरोखरच उठला आहे. हे आपणांला माहित आहे.
हे विजयशाली राजा, आम्हांवर दया कर.

आलेलुया!

शुभवर्तमान योहान १६:१६-२०

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

"तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.” ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांस म्हणाले, “हा आम्हांस, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, शिवाय मी पित्याकडे जातो, असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय ?" ते म्हणत होते, “थोड्या वेळाने, असे जे हा म्हणतो ह्याचा अर्थ काय ? तो काय म्हणतो हे आम्हांला समजत नाही.” आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, हे जे मी म्हणालो, त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारीत आहा काय ? मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :एकाच वेळी रडणे आणि आनंद करणे कसे काय होऊ शकते? जे लोक देवावर भाव ठेवतात, अशा लोकांच्या वर्तमानकाळातील दुःखाची तुलना ही भावी काळातील गौरवाशी होईल, असे येशू सांगतो. इस्राएल लोकांसाठी वेळ ही दोन भागात विभागली गेली होती, सध्याचे युग आणि भावी युग संदेष्ट्यांनी भाकीत केले होते की, मसिहाचे आगमन, हे नव्या युगाची सुरुवात असेल. येशू आपल्या शिष्यांना दोन महत्त्वपूर्ण सत्ये सांगतो. पहिले सत्य, येशूला पित्याकडे परत जावे लागेल. दुसरे सत्य, युगाच्या समाप्ती वेळी देवराज्याच्या नवीन युगाची सेवा करण्यासाठी येशू पुन्हा येईल. येशूचे पहिले आगमन आणि युगाच्या समाप्ती वेळी होणाऱ्या आगमनाची दिशा, ही जागतिक विचारांच्या विरुद्ध आहे. जग म्हणते, या जीवनात जितकं सुख मिळेल तितके मिळवा आणि त्याचा आस्वाद घ्या. येशू मात्र आपले लक्ष आत्मिक आणि आध्यात्मिक जीवनाकडे वेधतो. येशूद्वारे क्रुसाचे अनुकरण करावयाचे असल्यास आपण दुःख आणि वेदना टाळू शकत नाही. मात्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रुसामध्ये आपल्याला स्वातंत्र्य, विजय आणि आनंद सापडतो. म्हणून थॉमस अक्वायनस म्हणतात, 'कोणीही आनंदाशिवाय जगू शकत नाही.' तुम्ही प्रभूमध्ये आनंद अनुभवला आहे का ?

प्रार्थना : हे पवित्र फातिमा माता, तुझ्या दर्शनाने तू ख्रिस्ताचे दर्शन आम्हाला घडविले आहे. सर्वदा प्रार्थना करण्यास व देवाची वचने आत्मसात करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या