पुनरुत्थान
सहवा सप्ताह
शुक्रवार
१४ मे २०२१
संत मत्थियास विषयीची माहिती आपल्याला प्रेषितांची कृत्ये अध्याय १ मध्ये वाचावयास मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर ज्युदासची जागा भरून काढण्यासाठी अकरा प्रेषितांनी चिठ्ठ्या टाकून निवड केली.
संत मत्थियास हा ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्यापासून स्वर्गारोहणापर्यंतच्या सर्व घटनांचा साक्षीदार होता. एका ख्रिस्ती परंपरेनुसार संत मत्थियास ह्याने यहुदीया व इथिओपिया येथे ख्रिस्ताची सुवार्ता पसरविताना क्रुसावरील मरण पत्करले. काहींच्या मते त्याचा येरुशलेममध्ये शिरच्छेद करण्यात आला.
संत मत्थियास हा शिंपी, सुतार आणि व्यसनमुक्त लोकांचा आश्रयदाता आहे. देवी रोगावर उपचार म्हणून त्याचा धावा केला जात होता.
✝️
प्रभू येशूने त्यांना म्हटले की 'तुम्ही माझ्या प्रीतिला राहा.' हीच परस्पर प्रीति प्रेषितांना सेवा कार्य करण्यास प्रवृत्त करणारी होती. देव प्रीतिच्या प्रेरणेनेच निवडलेल्या प्रेषितांनी सुवार्ता पसरविली. आपण सर्वजण प्रभू येशूठायी देवराज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी निवडलेले असे लोक आहोत. ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याठायी ज्यांचे तारण व्हावे अशी परमेश्वराची योजना असते त्यांना निवडले जाते. निवडलेल्या सर्वांना प्रभू येशूने प्रितीची व सेवेची आज्ञा दिली आहे. प्रभू येशू म्हणतो, 'ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे. देवराज्यात परिपूर्तता व त्यागमयी जीवन अपेक्षित आहे. त्यासाठी आपण तयार असायला हवे. आपल्या जीवनात आपल्याला वैवाहिक, कौटुंबिक, सामाजिक व व्यवसायिक जीवन जगण्यासाठी पाचारण असते. ह्या सर्व स्तरावर आपण आपल्या ख्रिस्ती जीवनाचा आदर्श इतरांसमोर कसा प्रदर्शित करतो ?
ख्रिस्ताच्या नावाने स्नानसंस्कार स्विकारलेल्या प्रत्येक श्रद्धावंताला प्रभू येशू देवराज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी आवाहन करीत आहे. आपण तयार आहोत का ?
✝️
“जसे मी तुम्हावर प्रेम केले तसे तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे अशी माझी आज्ञा आहे.
✝️
पहिले वाचन प्रे. कृ. १:१५-१७,२०-२६
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मथियासची चिठ्ठी निघाली, तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले."
पेत्र बंधुवर्गामध्ये (सुमारे एकशेवीस माणसांच्या जमावामध्ये ) उभा राहून म्हणाला, “बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखवणाऱ्या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदच्या मुखावाटे जे भविष्य वर्तविले ते पूर्ण होण्याचे अगत्य होते. त्याची आपल्यामध्ये गणना होती आणि त्याला ह्या सेवेचा वाटा मिळाला होता. स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे,
'त्याचे घर उजाड पडो,
आणि त्यात कोणीही न राहो'
आणि
त्याचा हुद्दा दुसरा घेवो.'
म्हणून योहानच्या स्नानसंस्कारापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत, म्हणजे तो आपणामध्ये येत जात असे त्या सगळ्या काळात, ही जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.” तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते तो बर्सुबा म्हटलेला योसेफ आणि मथियास, ह्या दोघांना त्यांनी पुढे आणले. मग त्यांनी अशी प्रार्थना केली: “हे सर्वांची हृदये जाणणाऱ्या प्रभू, हे सेवकपद आणि प्रेषितपद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहूदाचे पद ज्याला मिळावे असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव." मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्या टाकल्यावर मथियासची चिठ्ठी निघाली, तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११३:१-८
प्रतिसाद : परमेश्वर गरिबांना आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. किंवा आलेलुया !
१) परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे सेवकहो, तुम्ही त्याचे स्तवन करा, परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा. येथून पुढे सर्वकाळ परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो.
२) सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे, त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे.
३) परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे, जो आकाश आणि पृथ्वी ह्यांचे अवलोकन करण्यास लवून पाहतो, त्याच्यासारखा कोण आहे ?
४) तो कंगालांना धुळीतून उठवतो, गरिबांना उकिरड्यावरून उचलतो आणि त्यांना अधिपतींच्या, पंक्तीला बसवतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे, ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १५:९-१७
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही, परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे. "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जसे पित्याने माझ्यावर प्रेम केले तसे मीही तुम्हावर प्रेम केले आहे, तुम्ही माझ्या प्रेमात राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रेमात राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रेमात राहाल. माझा आनंद तुम्हांमध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
“जसे मी तुम्हावर प्रेम केले तसे तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा मोठे प्रेम दुसरे नाही. मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा. मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे. ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हांला ह्या आज्ञा करतो.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- प्रेषितांची कृत्ये १:१५-२६ नुसार स्वर्गारोहणाच्या काही दिवसानंतर पेत्र, बंधू वर्गामध्ये म्हणजे १२० अनुयायांसमोर उभा राहिला. यहुदाने प्रेषितीय कार्याचा विश्वासघात केला होता. पेत्र म्हणाला, दुसऱ्याने ही रिकामी झालेली प्रेषितांची जागा भरणे आवश्यक आहे. म्हणून जी माणसे तीन वर्षे येशूसोबत होती, त्यांच्यातून एकाने आपल्या बरोबर येशूच्या पुनरुत्थानाचा साक्षीदार झाले पाहिजे. मग त्यांनी बर्सबा म्हटलेला योसेफ आणि मथियास यांची नावे दिली. त्यांच्यावर प्रार्थना करून चिठ्या टाकल्या. ती चिट्ठी मथियासची निघाली. व त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले. मथियास कसा काय पवित्र होता ? अर्थात येशूच्या बाप्तिस्म्यापासून ते स्वर्गारोहणापर्यंत त्याच्या अनुभवातूनच तो प्रेषित पदासाठी पात्र झाला होता. तो वैयक्तिकरित्या देखील योग्य होता. नाहीतर, त्याची इतक्या मोठ्या जबाबदारीसाठी नेमणूक करण्यात आली नसती. येशूने आनंदाने त्याचा स्वर्गीय पित्याशी, पवित्र आत्म्याद्वारे पावित्र्याशी संबंध जोडला होता. ह्याची आपण आठवण ठेवायला हवी. प्रेषितांनी त्यांच्या साक्षीने आपल्या श्रद्धेचा पाया रचला आहे, ह्याचेही आपणांस विस्मरण होता कामा नये. पावित्र्य ही पूर्णपणे देवाची देणगी आहे. आपणा प्रत्येकाला ही देवाची देणगी दिली आहे. ह्या देणगीचा स्वीकार करण्यासाठी देव आपणांस स्वातंत्र्यशक्ती देतो.
प्रार्थना : हे प्रभू, तुझ्या मळ्यात सेवाकार्य करण्यास मला प्रेरणा दे, तुझ्या सुवार्ता प्रसाराचे मला साधन बनव, आमेन.

0 टिप्पण्या