Marathi Bible Reading | 8th week in ordinary Time| Thursday 27th May 2021

 

सामान्यकाळातील ८वा सप्ताह  

गुरुवार 

२७ मे २०२१ 

✝️



कॅटरबरीचे संत अगस्तीन सण .

• महागुरू, वर्तनसाक्षी (... ६०५)

“मी जर प्रेमाने जगत नसेल तर मी मृतवत आहे. जो प्रेमाने जगतो त्याला कुठल्याही वेदनेचे दुःख होत नाही आणि जरी वेदना असलीच तरी ती प्रेमाने कुरवाळतो.” कॅटरबरीचे संत अगस्तीन


प्रभू येशूला आपली योग्य विनवणी नक्कीच मान्य असते. कारण आजच्या शुभवर्तमानातील आंधळ्याला त्याने विचारले, 'मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे.' म्हणाला, 'मला दृष्टी प्राप्त व्हावी.' आपल्या प्रत्येकाला ओळखतो व त्याला आपल्या सर्व गरजा ठावूक आहेत.  'प्रभू येशू  आंधळ्या बार्तीमयला विचारलेला प्रश्न तो आज आपल्या प्रत्येकाला विचारीत आहे. आपण प्रभूला कोणते उत्तर देणार आहोत? आपल्याला अशक्य वाटत असलेली कोणतीही गोष्ट प्रभू येशू सहजपणे करु शकतो. मात्र आपल्या  विनंतीचा उद्धेश शुद्ध आणि स्पष्ट असायला हवा. आंधळा भिकारी त्याचे वस्त्र टाकून उठला व येशूकडे गेला, त्याप्रमाणे आपण आपला दुष्ट, पापी स्वभाव आणि जे काही देवाकडे जाण्यास आपल्याला अडथळा बनत आहे त्याचा त्याग करून येशूजवळ येणे गरजेचे आहे.
प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला जीवनाचे मौल्यावान दान देण्यास थांबलेला आहे. आपण काय मागायचे ते आपल्याला समजावे व योग्य ते आपण मागावे म्हणून आपल्या जीवनावर व आचरणावर चिंतन करु या. ! 

✝️
             

पहिले वाचन : बेन सिरा   २:१५-२५
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन

"प्रभूचे कार्य त्याच्या गौरवाने भरलेले आहे."

प्रभूच्या कार्याचे मी आता स्मरण करीन आणि जे काय मी पाहिले आहे ते जाहीर करीन. प्रभूच्या शब्दांनी सर्व वस्तू अस्तित्वात येतात. सूर्य आपला प्रकाश सर्वांवर पाडतो आणि प्रभूचे कार्य प्रभूच्या गौरवाने भरलेले आहे; आपला गौरव सदोदित व्हावा म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वराने विश्व निर्माण केले आहे; ह्या त्याच्या सर्व अद्भुत कार्यांचे वर्णन करायची शक्ती प्रभूने आपल्या पवित्र दूतांना दिली नाही. तो पाताळाचा आणि मानवाच्या अंतःकरणाचा थांग घेतो आणि त्यांच्या सर्व कुटील योजना जाणतो. कारण सर्वश्रेष्ठ परमेश्वर सर्वज्ञानी आहे आणि तो काळाची चिन्हे जाणतो.
तो भूतकालिन आणि भविष्यकालिन गोष्टी जाहीर करतो आणि गूढ गोष्टी प्रकाशात आणतो. कुठलाही विचार त्याच्यापासून लपून राहत नाही आणि कुठलाही शब्द त्याच्यापासून गुपित नाही. त्याने आपल्या शहाणपणाच्या अलौकिक कृतींना सुव्यवस्था लावून दिली आहे आणि त्याचे अस्तित्व अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत आहे. त्याच्यात काही भर घालता येत नाही किंवा त्याच्यातून काही काढून टाकता येत नाही आणि त्याला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. त्याच्या सर्व कृती किती आल्हाददायक आणि नेत्रदीपक आहेत! ह्या सर्व गोष्टी चिरकाल टिकतात आणि त्याच्या आज्ञेत राहून त्याची सर्व उद्दिष्टे पुरी करतात. सर्व वस्तू दुहेरी आहेत, त्या परस्परविरोधी आहेत आणि त्याने कुठलीही वस्तू अर्पण ठेवली नाही. एक वस्तू दुसऱ्या वस्तूतील उणीव भरून काढते आणि प्रभूचा महिमा पाहून कोण कधी तृप्त होईल काय ?

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ३२:२-९ 

प्रतिसाद : परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले.

१.  वीणेवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा, दशतंतू वाद्यावर त्यांचे गुणगान गा. त्याच्यापुढे नवे गीत गा, जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा.

२. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत, परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.

३. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले, त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करतो, महासागरांचे निधी साठवतो.

४ अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो, जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत. कारण तो बोलला आणि अवघे झाले. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
हे प्रभो, तुझे सर्व आदेश विश्वसनीय आहेत, ते सदासर्वदा अढळ आहेत.
आलेलुया!

शुभवर्तमान  मार्क १०:४६-५२

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी."

येशू, त्याचे शिष्य आणि मोठा लोकसमुदाय यरिहो सोडून जात असता, तिमयाचा मुलगा बार्तीमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. हा नाझरेथकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा!” तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले; पण तो अधिकच ओरडू लागला, “अहो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!" तेव्हा येशू थांबून म्हणाला, “त्याला बोलवा.” मग ते आंधळ्याला बोलावून म्हणाले धीर धर, ऊठ, तो तुला बोलावत आहे.” तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला आणि येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे ? आंधळा त्याला म्हणाला, "गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी.” येशू त्याला म्हणाला, “जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे." तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन :जीवनातील अशी एखादी सुवर्णसंधी ज्याचे तुम्ही सोने करू शकत नाही, असा कधी तुम्हाला अनुभव आला आहे का ? बार्तीमय नावाच्या अंध मनुष्याला अशी संधी लाभली होती. त्याची गरज भागवेल अशा व्यक्तीच्या जवळ जाण्याचा त्याने दृढ निश्चय केला होता. येशू कोण आहे हे बार्तीमयला ऐकून ठाऊक होते. येशूने अनेकांना आरोग्यदान दिल्याचे त्यांनी ऐकले होते. येशू शहरातून बाहेर पडताच त्याच्याभोवती गर्दी झाली होती. बार्तीमयला येशूच लक्ष वेधून घेण्यासाठी खूप धैर्य आणि चिकाटी दाखवावी लागली. आंधळ्या बार्तीमयच्या सतत ओरडण्याने लोक संतापले होते, कारण तो लोकांच्या शांततेचा भंग करीत होता आणि येशूच्या शिकवणुकीला अडथळा आणीत होता. लोकांनी बार्तीमयला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो त्याच्या भावनिक आक्रोशाने अधिकच ओरडू लागला. येशूपर्यंत पोहोचण्यासाठी होणाऱ्या विरोधाला तोंड देण्याची तयारी त्याने दर्शविली होती. बार्तीमयला येशूची अत्यंत गरज होती तर येशू फक्त त्याच्या वेदनेशी सहानुभूती दाखवत नाही तर त्याला आजारातून मुक्त करण्यासाठी येशू तयार होता. एखादा महान वक्ता आपल्या भाषणाने लोकांचे लक्ष व सन्मान मिळवितो तर एखादा स्त्री-पुरुष गरजवंतांची गरज भागवून मोठ्या मनाने सेवा करून अधिक प्रेम करीत असतो.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तू माझा देव आहेस, श्रद्धेने मी तुजकडे काय मागावे हे मला शिकव, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या