Marathi Bible Reading | 8th week in ordinary Time| Wednesday 26th May 2021

सामान्यकाळातील ८वा सप्ताह

बुधवार 

२६ मे २०२१ 

✝️




संत फिलीप नेरीचा सण .

आपण आपल्या जीवनातील लहानसहान चुकांची काळजी घेतली पाहिजे. कारण अशा चुकांकडे दुर्लक्ष केल्याने हळूहळू माणसाची पापाविषयी संवेदनक्षमता बोथट बनते आणि मनुष्य आध्यात्मिकदृष्ट्या रसातळाला जातो.
-संत फिलीप नेरी.



फिलीपचा जन्म इटलीतील फ्लॉरेन्स या ठिकाणी झाला. आपले आणि आपल्या या जगाचे पावित्र्य वाढविण्याच्या हेतूने वयाच्या २६ व्या वर्षी त्याने आपला व्यवसाय बंद करून रोमच्या दिशेने प्रयाण केले. तिथे राहून त्याने तत्त्वज्ञान व इशज्ञानाचा अभ्यास केला. विरक्ती प्रायश्चित्त, कडक उपवास आणि प्रार्थनामय जीवन ह्याद्वारे त्याने स्वतःच्या शरीरावर आणि मनावर ताबा मिळविला.
संत फिलीप हा अत्युत्तम असा आध्यात्मिक मार्गदर्शक होता. त्याला अंतर्ज्ञानाची देगणी लाभलेली होती. दिवस उजाडण्यापूर्वी कामाला जाताना दररोज ४० कामगार त्याच्याकडे कुमसारासाठी येत असत. त्यानंतरही ते देवळात कुमसार ऐकण्यासाठी बसत असत. दहा कार्डिनल्स, अनेक धर्मगुरू आणि असंख्य प्रापंचिक लोक त्याच्याकडे नियमितपणे पापनिवेदन करीत. दुपार होण्याआधी अगदी प्रेमाने पवित्र मिस्सा अर्पण करीत. दुपारनंतर ते युवक, आणि मुले ह्यांना शिक्षण देण्यात, त्यांच्यासाठी खेळ घेण्यात आणि सात देवळांना भेटी देण्यात गुंग असत. कुमसाराचे महत्त्व ते केवळ पापक्षमा असे मानीत नव्हते तर आध्यात्मिक मार्गदर्शनाचे एक प्रभावी साधन असे मानीत. त्यामुळे ते आपल्या प्रवचनांद्वारे मुलांना व तरुणांना प्रसन्नता, भक्ती, नम्रता, आणि त्यागवृत्ती इत्यादीचे धडे देत असत.

संत फिलीप आध्यात्मिक सत्ये लोकांच्या मनावर अगदी प्रभावीपणे आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने बिंबवित असत. एक मनुष्य नेहमी कम्युनियन घेतल्यानंतर घाईघाईने देवळातून लगेच बाहेर पडत असे. संत फिलीप ह्यांच्या लक्षात आल्यानंतर एके दिवशी या माणसाने कम्युनियन घेताच संत फिलीप ह्यांनी दोन वेदीसेवकांना आपल्या हाती मेणबत्त्या घेऊन त्या माणसाच्या पाठोपाठ पाठविले. ह्या प्रकाराने तो मनुष्य ओशाळला आणि अगदी निवांतपणे पवित्र साक्रामेंताचा आदरसन्मान करू लागला.

दुसरी एक कथा सर्वपरिचित आहे. एका स्त्रीला लोकांची निंदा करण्याची सवय होती. फिलीपने तिच्या हाती पक्ष्याच्या पिसांनी भरलेली पिशवी दिली आणि म्हटले “डोंगराच्या उंच कड्यावरून ही पिसे वाऱ्यावर उडवून दे, ती स्त्री मोठ्या आनंदाने डोंगरमाथ्यावर गेली आणि तिने ती पिसे वाऱ्यावर उडवून दिली.' फिलीपने त्यानंतर तिला सांगितले की, हीच पिसे आता परत गोळा करून आण. ते तर तिला अशक्यच होते. तेव्हा फिलीप तिला म्हणाले, 'जशी ही पिसे गोळा करणे अशक्य आहे तसे तुझ्या तोंडून बाहेर पडलेले शब्द पुन्हा माघारी घेणे अशक्य आहे. तेव्हा शब्द जपून वापर.'
✝️
             

पहिले वाचन : बेन सिरा   ३६:१-२,५-६, ११-१७
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन

"प्रभो, तुझ्याशिवाय दुसरा देव नाही हे सर्व लोकांना कळून येवो."

हे प्रभो, परमेश्वरा, आम्हांवर दया कर, तुझी कृपादृष्टी आम्हांवर लाव आणि तुझ्या भयाची छाप सर्व लोकांवर पाड. हे प्रभो, जसे आम्हांला कळले आहे तसे त्यांनादेखील कळावे की, तुझ्याशिवाय दुसरा देव नाही. नवीन संकेतचिन्हे दाखवआणि अधिक चमत्कार कर. 
याकोबच्या सर्व पिढ्यांना एकत्र कर आणि पूर्वीप्रमाणे त्यांना संदेश दे. हे प्रभो, तुझ्या नावाने संबोधिलेल्या आणि जे तुला प्रथमपुत्राप्रमाणे आहेत त्या इस्राएल लोकांवर दया कर. तुझी पुण्यनगरी, तुझे निवासस्थान येरुशलेम ह्यावर दया कर. सियोन शहर तुझ्या अद्भुत कृत्यांच्या गुणगायनाने आणि तुझे मंदिर तुझ्या वैभवाने भरून टाक. ज्यांना तू आंरभी उत्पन्न केलेस त्यांना प्रमाणित कर आणि तुझ्या नावाने केलेली भाकिते परिपूर्ण कर. तुझी प्रतीक्षा करणाऱ्या लोकांना प्रतिफळ दे आणि तुझे संदेष्टे विश्वासपात्र ठरोत. हे प्रभो, अहरोनने तुझ्या प्रजेला दिलेल्या आशीर्वादानुसार, तुझ्या सेवकांची प्रार्थना स्वीकार, त्यामुळे पृथ्वीवरील सर्व लोकांना कळेल की तूच प्रभू आहेस, तूच शाश्वत परमेश्वर आहेस.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ७८:८, ९, ११.१३ , बेन सिरा ३६:१

प्रतिसाद :  प्रभो, आम्हांवर दया कर.

१) आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची दुष्कर्मे आठवू नकोस. तुझी करुणा आमच्यावर सत्वर होवो, कारण आमची फार दैन्यावस्था झाली आहे. 

२) हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या थोरवीकरिता आम्हाला सहाय्य कर. आपल्या नावाकरिता आम्हांस सोडव आणि आमचे अपराध धुऊन टाक.

३) बंदिवानाचे कण्हणे तुझ्या कानी येवो, ज्यांचा वध करण्याचे ठरवले आहे त्यांना तू आपल्या बाहुबलाने वाचव. मग जे आम्ही तुझी प्रजा आणि तुझ्या कुरणातली मेंढरे ते आम्ही सर्वकाळ तुझे उपकारस्मरण करत राहू. तुझी कीर्ती पिढ्यान्पिढ्या गौरवीत जाऊ.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

तुम्ही आपली मने कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
आलेलुया!

शुभवर्तमान  मार्क १०:३२-४५

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"आपण वर येरुशलेमला जात आहो, तेथे मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यात येईल."शिष्य वर येरुशलेमला जात असताना वाटेने येशू त्यांच्यापुढे चालला होता, तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग येणारे घाबरले. तेव्हा तो पुन्हा त्या बाराजणांस जवळ बोलावून घेऊन आपल्याला काय होणार ते त्यांना सांगू लागला: “पाहा, आपण वर येरुशलेमला जात आहो; तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल, ते त्याला देहान्त शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”

जब्दीचे दोन मुलगे याकोब आणि योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “गुरुजी, आम्ही आपणाजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हांसाठी करावे अशी आमची इच्छा आहे.” तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे ?" ते त्याला म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे आणि एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे.” येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही काय मागत आहा हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय? आणि जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्हांला घेववेल काय ?" ते त्याला म्हणाले, “घेववेल." येशूने त्यांना म्हटले, "जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल आणि जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे, पण माझ्या उजवीकडे आणि डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार.” हे ऐकून बाकीचे दहाजण याकोब आणि योहान ह्यांच्यावर संतापले. तेव्हा त्यांना जवळ बोलावून घेऊन येशू त्यांना म्हणाला, “परराष्ट्रीयात सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करतात आणि त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. परंतु तुमची गोष्ट तशी नाही; तर जो तुम्हांमध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे आणि जो कोणी तुम्हांमध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला आणि पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन :येशू हा मसिहा म्हणून त्याला आपल्यासाठी दुःख आणि मरण का सहन करावे लागले? येशू हा स्वतःला मानवाचा पुत्र म्हणून संबोधितो. मानवी दुःख आणि वेदनेशी एकरूप होण्यासाठी आणि येशूच्या दैवी मिशन कार्याद्वारे जगाच्या स्थापनेपासून निर्माण केलेले जगाचे वैभव पुनर्स्थापित करण्यासाठी येशूला मरण आणि दुःख सहन करावे लागले. येशू मसिहा ह्या जगात लोकांना भयंकर छळापासून, जुलमापासून सोडविण्यासाठी, पापाची गुलामगिरी, सैतान आणि मृत्यू यापासून मुक्त करण्यासाठी आला होता. शुभवर्तमानात तीन निरनिराळ्या प्रसंगी येशू त्याच्या वाटेला येणाऱ्या विश्वासघात, अटक दुःखसहन आणि वेदनादायक मृत्यू याचे भाकीत करतो. यहुदी लोकांना येशूला दगडमार करायची होती तर रोमन अधिकाऱ्यांना येशूला क्रुसावर खिळावयाचे होते. एखाद्या गुन्हेगाराला संपविण्यासाठी केलेल्या शिक्षेसारखी अत्यंत वेदनादायक आणि अपमानास्पद शिक्षा म्हणून येशूला क्रुसावर मृत्यू दिला. सहाजिकच ह्या घटनेने प्रेषित दुःखी, निराश आणि उदास झाले होते. त्यांच्या गुरूच्या वाटेला असे मरण आले तर त्यांच्याही वाट्याला दुःख व मरण अपेक्षित होते. येशूने आपल्यासाठी मोकळेपणाने, स्वेच्छेने त्याच्या जीवनाचे क्रुसावर समर्पण का केले ? आपणा सर्वांना पापांची क्षमा देऊन तारण मिळवून देण्यासाठी.

प्रार्थना : हे प्रभू येशू, मी सर्वस्वी तुला शरण येऊन स्वतःला तुजसमोर  समर्पित करीत आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे व योग्यते कृपादान तू मला बहाल कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या