सामान्यकाळातील ८वा सप्ताह
मंगळवार
२५ मे २०२१
✝️
(संत बीड/ संत ग्रेगरी)
“जो आपल्या शेजाऱ्यावर शुद्ध अंत:करणाने प्रेम करतो तोच उत्पन्नकर्त्या देवावर प्रेम करू शकतो.” संत बीड
आजच्या पहिल्या वाचनात अर्पण आणि समर्पण ह्या विषयी खूप चांगला बोध करण्यात आला आहे. 'आज्ञा पाळणे म्हणजे शांत्यर्पण करणे, उपकाराची फेड म्हणजे सपीठ अर्पण करणे, दानधर्म करणे म्हणजे स्तुत्यार्पण होय.' अर्पण म्हटल्यावर आपण आपल्याजवळ असलेल्या गोष्टींतून थोडे देतो. मात्र देवाला आपण आपल्या मोकळ्या मनाने, उदार अंतःकरणाने आणि संतोषाने अर्पण करणे महत्वाचे आहे.
अर्पणामध्ये त्याग आहे तर स्वतःच्या जीनवाचे समर्पण करण्यामध्ये स्वार्थत्याग आहे. देवाच्या व तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमात पडलेल्या शिष्यांनी आपले सर्वस्व समर्पण करुन प्रभूला अनुसरण्याचा निर्णय घेतला होता. प्रभू येशूने आपल्या सर्व शिष्यांना आश्वासन देऊन म्हटले 'सुवार्ते करिता सर्वस्वाचा त्याग करणाऱ्यांस शंभरपटीने मिळेलच व त्याबरोबर सार्वकालिक जीवन मिळेल.' देवाला आपण काय समर्पण करणार आहोत ह्यावर आज चितंन करु या. प्रभू येशूला आपण अनुसरत असताना आणि त्याच्या वचनानुसार जीवन जगत असताना आपण ख्रिस्तासाठी कोणता त्याग केला आहे ?
सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रत्येकाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळावा म्हणून आपण प्रभू येशू बरोबरचे आपले ऐक्याचे संबंध तपासून पाहू या. ज्या प्रभूने आपला प्राण आमच्या तारणासाठी समर्पित केला, त्याला काय देणार आहोत ?
✝️
पहिले वाचन :बेन सिरा ३५:१-१२
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून
"आदेशांचे पालन करणे म्हणजे शांतिबली अर्पण करण्यासारखे आहे."
कायद्याचे पालन करणे म्हणजे पुष्कळ दानार्पण करण्यासारखे आहे; आदेशाचे पालन करणे म्हणजे शांतिबली अर्पण करण्यासारखे आहे. उपकाराची परतफेड करणे म्हणजे अन्नबली अर्पण करण्यासारखे आणि शिक्षादान देणे म्हणजे उपकारबली अर्पण करण्यासारखे होय.दुष्कर्मापासून दूर राहिल्याने परमेश्वर संतुष्ट होतो आणि दुराचरणाचा त्याग हे पापाचे प्रायश्चित्त होते. रिकाम्या हातांनी परमेश्वरापुढे जाऊ नका, कारण ह्या सर्व गोष्टी आदेशांना धरून आहेत. सदाचारी माणसाच्या दानार्पणाने वेदीचा अभिषेक होतो आणि त्याचा आल्हाददायक सुवास सर्वोच्च प्रभूपर्यंत पोहोचतो.
सदाचारी माणसाचे बलिदान प्रभूला स्वीकारणीय आहे आणि त्याचे विस्मरण कधी होत नाही. उदार मनाने प्रभूची पूजा करा आणि तुमची प्रथमफळे अर्पण करण्यास कुचराई करू नका.
प्रत्येक दान प्रसन्न चित्ताने अर्पण करा आणि उल्हासित मनाने दशांश द्या. ज्या प्रमाणात सर्वोच्च देवाकडून तुम्हाला मिळाले आहे त्या प्रमाणात यथाशक्ती सर्वोच्च परमेश्वराला दान द्या. कारण प्रभू सदैव परतफेड करणारा आहे, तो सात पटीने परत करील. त्याला लाच दाखवू नका, ती तो स्वीकारत नाही. परमेश्वर असा न्यायाधीश आहे. तो पक्षपाती न्याय करत नाही म्हणून अधार्मिक बलिदानावर विसंबून राहू नका.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ५०: ५-८,१४,२३
प्रतिसाद : जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन.
१) "ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे,
त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा."
आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते,
देव स्वतः न्याय करणारा आहे.
२)“माझ्या लोकांनो, ऐका, मी बोलत आहे;
हे इस्राएल, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो:
मी देव, तुझा देव आहे.
तुझ्या यज्ञासंबंधाने मी तुला बोल लावत नाही.
तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच.
३)“देवाला आभाररूपी यज्ञ कर,
परात्परापुढे आपले नवस फेड,
जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो.
आणि जो सरळ मार्गाने चालतो
त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मला सरळ मार्गाने ने.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क १०:२८-३१
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्हांला सांप्रतकाळी आणि येणाऱ्या युगात छळवणुकीबरोबर शंभरपटीने सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही."
पेत्र येशूला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत.” येशूने उत्तर दिले, "मी तुम्हांला नक्की सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता आणि सुवार्तेकरिता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे, किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळवणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आईवडील, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. तरी पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आपल्या जीवनात आपण सर्वात उत्तम अशी कोणती गुंतवणूक करू शकतो ? शुभवर्तमान आपणासमोर एक विरोधाभास सादर करीत आहे. जे आपण जमवितो ते आपण गमावतो पण जे काही आपण इतरांना देतो त्यात आपण अधिक मिळवितो. आपण जेव्हा प्रभूयेशूसाठीजीवन जगतो त्याद्वारे आपणांस अनमोल अशी संपत्ती आणि कायमस्वरूपी त्याचा वारसा मिळतो. आपण जे देवाला व देवासाठी देतो ते आपणास शंभर पटीने परत मिळत असते. औदार्य, हे कृतज्ञतेने भरलेल्या हृदयातून येत असते. त्यातूनच देवाने दिलेली विपुल दया आणि कृपा वाहत असते. तुम्ही मोकळेपणाने, मोठ्या मनाने आणि औदार्याने देता का ? तुम्ही कशासाठी देता ? काही परत मिळविण्यासाठी की केवळ देवावरील प्रेमाखातर देता? एका श्रीमंत मनुष्यांने येशूचे अनुकरण करण्यास अनुत्साह दाखविल्यानंतर पेत्र व इतर शिष्यांना एका प्रश्नाचे उत्तर शोधायचे होते की आम्ही विनाशर्त आणि मुक्तपणे येशूचे अनुयायी होण्याचे मान्य केले आहे मग आम्हाला काय मिळेल? येशूने त्यांना स्पष्टपणे सांगितले की, ज्यांनी माझ्यासाठी सर्वकाही सोडले आहे, त्याला ह्या जीवनात शंभरपट जीवन आणि नव्या युगात शाश्वत जीवन लाभेल.
प्रार्थना : हे प्रभू येशू, माझे हे जीवन तुझेच दान आहे. मी सर्वस्वी तुला शरण येतो. माझ्या संपूर्ण जीवनाचा ताबा, तू घे आणि तुझ्या इच्छा प्रमाणे मला वरदान दे, आमेन.

0 टिप्पण्या