सामान्यकाळातील ८वा सप्ताह
शुक्रवार
२८ मे २०२१
✝️
संत जर्मेनुस हे सहाव्या शतकातील फ्रान्सचे वैभव मानले जाते. इ. स. ४९६ साली अॅटन प्रांतात त्यांचा जन्म झाला. धर्मगुरू पदाची दीक्षा घेतल्यानंतर लागलीच त्यांना मठाधिपती म्हणून नियुक्त करण्यात आले. आपल्या साध्या आणि विरक्तवृत्तीने त्यांनी अनेक पश्चात्तापी पापी लोकांना ख्रिस्ताकडे परत आणले. इ. स.५५४ साली स्थानिक बिशपांच्या मृत्यूनंतर फा. जर्मेनूस ह्यांना महागुरूपदाची दीक्षा देण्यात आली.
महागुरू म्हणून देखील त्यांनी साधी वस्त्रे आणि फर्निचर ह्यांचाच वापर करण्यास सुरूवात केली. त्यांचे निवासस्थान सदैव गोरगरिबांनी भरलेले असायचे. अनेक भिकारी त्याच्याबरोबर जेवायला बसत. शहरातील सर्व स्तरांवरील लोकांसह ते गोडीगुलाबीने वागत. त्यामुळे थोड्याच अवधीत पॅरीस शहराचा चेहरामोहरा त्यांनी बदलून टाकला.
बिशप जर्मेनूस ह्यांना चमत्कारांचीही देगणी होती. एकदा राजा चिल्डेबर्ट आजारी पडला. बरेच वैद्य येऊन गेले परंतु गुण पडेना. शेवटी बिशप जर्मेनु राजाच्या भेटीला आले. त्यांनी राजाच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि क्षणार्धात राजाला आराम पडू लागला. काही दिवसांतच त्याची प्रकृती एकदम सुधारली. आजारी पडेपर्यंत राजा ऐहिक सुखविलासात दंग होता. या चमत्कारानंतर त्याला आध्यात्मिक आरोग्याचेही वरदान लाभले. त्याने अनेक धार्मिक स्थळे उभारली आणि गोरगरिबांना वाटण्यासाठी बिशपांकडे मोठा निधी पाठवून दिला. वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत बिशप जर्मेनूस ह्यांच्यामधील उत्साह कणभर देखील कमी झालेला नव्हता. शिवाय विरक्ती व वैराग्यवृत्ती आता पराकोटीला पोहोचलेली होती. २८ मे ५७६ साली झालेल्या त्यांच्या मृत्यूने सर्व थरांतील लोकांनी शोक व्यक्त केला.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने अंजिराच्या झाडाचा दाखला देऊन देवावरील विश्वास दृढ बनण्यासाठी आवाहन करीत आहे. प्रभू म्हणतो, 'तुम्ही प्रार्थना करुन जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा.’ मात्र विश्वास व प्रार्थनेला शुद्ध अंत:करणाची गरज आहे, म्हणूनच ' प्रभू येशू आवाहन पूर्वक आपल्या अपराध्यांना क्षमा करण्यास सांगत आहे.
आपण मंदिराचे पावित्र्य राखून विश्वासाने व पश्चात्तापाने प्रार्थना करावी म्हणून प्रयत्नशील बनू या.
✝️
"तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा"
✝️
पहिले वाचन : बेन सिरा ४४:१,९-१३
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन
" आमचे पूर्वज अगदी उदार माणसे होती आणि त्यांचे नाव पिढ्यान्पिढ्या अमर आहे."
आता आपण पुण्य पुरुषांची, पिढ्यान्पिढ्या होऊन गेलेल्या आपल्या पूर्वजांची स्तुती करू या. असेही लोक होऊन गेले की, ज्याचे कुणाला स्मरण देखील राहिले नाही. ते अशा तऱ्हेने नष्ट झाले की जणू काही ते झालेच नव्हते. जणू काही ते जन्मालाच आलेच नव्हते अशी त्यांची गत झाली आणि त्याच्या पश्चात त्याच्या संतानांचीदेखील तीच गत झाली, परंतु आपले पूर्वज नीतिमान पुरुष होते, त्यांच्या सत्कृत्यांचे विस्मरण कोणाला झाले नाही; त्यांचा समृद्ध वारसा त्यांच्या वंशजांना मिळाला आणि त्यांची संपत्ती त्यांच्या कुटुंबात राहिली.
त्यांचे वंशज आणि त्यांच्यामुळे त्यांची मुलेसुद्धा कराराचे पालन करीत आहेत. त्यांचा वंश नेहमी वाढत राहील आणि त्यांची कीर्ती कधी लोप पावणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १५०:१-६,९
प्रतिसाद : प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे.
१) नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा, भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्रे गा. इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो. सियोनची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हास पावोत.
२) ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत, डफ आणि वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत. कारण प्रभू आपल्या लोकांवर संतुष्ट आहे. तो दीनांना तारणाने सुशोभित करतो..
३ )भक्त गौरवामुळे उल्हासतो, ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो; हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेश्वराचे स्तवन करा !
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, माझे नेत्र उघड,
म्हणजे तुझ्या धर्मशास्त्रातील अलौकिक गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क ११:११-२६
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील. देवावर विश्वास ठेवा."
येशू येरुशलेमला आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली, म्हणून तो आपल्या बारा शिष्यांसह बेथानी येथे निघून गेला.
दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पानांनी डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो त्याकडे गेला. परंतु अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता म्हणून पानांवाचून त्याला काही आढळले नाही. तेव्हा तो उद्गारला, “कोणीही ह्यापुढे तुझे फळ कधीही न खावो.” त्याचे शिष्य हे ऐकत होते.
मग ते येरुशलेमला येऊन पोहचल्यावर तो मंदिरात गेला आणि मंदिरात क्रयविक्रय करणाऱ्यांना बाहेर घालवून देऊ लागला; त्याने व्यापाऱ्यांचे चौरंग आणि कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलथून टाकल्या, त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून ने आण करू दिली नाही. मग तो त्यांना शिक्षण देऊ लागला आणि म्हणाला, "माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील," असा शास्त्रलेख आहे ना? पंरतु तुम्ही तर ही लुटारुंची गुहा करून टाकली आहे." मुख्य याजकांनी आणि शास्त्र्यांनी हे ऐकले आणि त्याचा घात कसा करावा ह्याविषयी ते युक्ती योजू लागले. कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाल्याकारणाने ते त्याला भीत होते.
रोज ते शहराच्या बाहेर जात असत. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्रला आठवण होऊन तो येशूला म्हणाला, "गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पाहा.” येशूने त्यांना उत्तर दिले, "देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हांला नक्की सांगतो की, जो कोणी ह्या डोंगराला 'तू उपटून समुद्रात टाकला जा,' असे म्हणेल आणि आपल्या अंत:करणात शंका न बाळगता, आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दांप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरूद्ध काही असेल तर त्यांची क्षमा करा; परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- अंजिराचे झाड व मंदिराचे शुद्धीकरण अशा दोन वेगवेगळ्या घटना शुभवर्तमानात आढळतात. आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी पहिल्या घटनेवर आपण लक्ष केंद्रीत करूया. येशूने अंजिराच्या झाडाला का शाप दिला? यहुदी लोकांसाठी अंजिराचे झाड हे सर्वत्र आढळणारे झाड आहे. मात्र हे झाड त्याच्या अन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत होते. खराब अंजीर अथवा सडणारे अंजिराचे झाड हे, वाईट कृत्य आणि आध्यात्मिक नाशाशी जोडले गेले होते. निष्फळ अंजिराचे झाड हे देवाच्या शब्दाला प्रतिसाद न देणाऱ्या इस्रायली लोकांचे चिन्ह होते. संदेष्ट्यांनी अंजिराच्या झाडाची प्रतिमा ही विनाश व आपत्ती आणि इस्रायली लोकांनी परमेश्वराशी केलेली प्रतारणा, असे त्याचे | चित्रण केले आहे. इस्रायलचा इतिहास मसिहाच्या आगमनाची दीर्घ तयारी करीत होता. ज्या लोकांनी त्यांच्या अविश्वासामुळे येशूला नाकारले, त्यांच्यात देवाचे अभिवचन पूर्ण झाले नाही. विश्वासहा फलदायी असावा त्यासाठी देवाच्या वचनाने त्याचे पोषण नित्यनियमाने व्हायला हवे. देवाचे अभिवचन पूर्ण होण्यासाठी विश्वासात सतत जागृत राहण्याचा प्रयत्न करूया.
प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझ्या प्रार्थना घराचा योग्यतो सन्मान करुन विश्वासाने जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

0 टिप्पण्या