सामान्य काळातील
एकविसावा सप्ताह
शुक्रवार
२७ ऑगस्ट २०२१
"तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही."
संत मोनिका
- विधवा (३३१-३८७)
जन्माने ख्रिस्ती असलेल्या मोनिका हिचे लग्न वयाच्या २० व्या वर्षी उत्तर आफ्रिकेतील तागास्ते शहरातील पॅट्रिशिअस नामक श्रीमंत (परंतु मूर्तीपूजक) अधिकाऱ्याशी झाले. हा अधिकारी मोनिकापेक्षा वयाने खूप मोठा होता. त्यांना तीन मुले झाली.
तिचे पती परधर्मीय असल्यामुळे आणि अत्यंत तापट स्वभावाचे असल्याने मोनिकाला खूप मनस्ताप सहन करावा लागला. त्याने मुलांना ख्रिस्ती शिक्षण देणे खूप जिकिरीचे केले. परंतु मोनिकाच्या प्रार्थनेचे सामर्थ्य इतके विलक्षण होते की तब्बल अठरा वर्षांच्या वैवाहिक जीवनातील कसोटीच्या काळानंतर अखेर पॅट्रिशिअस हा अधिकारी विश्वाचा सम्राट प्रभू येशू ख्रिस्त ह्याला शरण आला. त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. परंतु लवकरच मृत्यूने त्याला मोनिकाच्या जीवनातून हिरावून नेले. एका डोळ्यात पतीनिधनाचे दुःख, तर दुसऱ्या डोळ्यात त्याने ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारल्याचे समाधान अशा मिश्र भावनांनी मोनिकाचे जीवन व्यापले गेले.
आता मोनिकाने आपले सर्व लक्ष आपल्या मुलांवर केंद्रित करण्यास सुरुवात केली. तिचा मोठा मुलगा अगस्तीन हा कार्थेज येथे अभ्यास करीत असताना 'मानिकेइझम' नावाच्या पाखंडी विचारसरणीचा बळी बनलेला होता. या विचारसरणीनुसार जगात 'चांगली व वाईट' अशा दोन शक्ती आहेत असे मानले जाते. अगस्तीनने ह्या विचारसरणीनुसार जीवन जगायला सुरुवात केली होती. तब्बल १५ वर्षे तो एका स्त्रीच्या मोहपाशात अडकून पडलेला होता.
आपल्या मुलाचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून मोनिका अश्रू ढाळून प्रार्थना करीत असे. तिला भेटलेल्या एका बिशपांना तिने विनंती केली की, 'तुम्ही तरी अगस्तीनला समजावून सांगा.' हे बिशप स्वतः मानिकेइझम ह्या पाखंडवादाच्या विचारसरणीतून बाहेर पडलेले होते. त्यांनी अगस्तीनची अवस्था पाहिल्यावर या तरुणाचा कायापालट होण्यास खूप वेळ लागेल हे जाणले आणि तात्पुरते का होईना मोनिकाचे सांत्वन करीत म्हटले, “ज्या तुझ्या मुलासाठी तू अश्रू ढाळीत आहेस तो तुझा मुलगा कधीच वाया जाणार नाही.” त्या विशपांचे नाव होते संत अंब्रोज (सण : ७ डिसेंबर).
पुढे अगस्तीनला रोम शहरात भाषाशास्त्र शिकविण्याची संधी चालून आली. मोनिकाने त्याच्याबरोबर रोम शहरात जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. परंतु त्याने एकटेच जाण्याचा मनोदय तिच्याकडे व्यक्त केला आणि एका जहाजाने तो रोम शहरात पोहोचला. तेथून तो मिलान शहरात गेला व त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करू लागला. मोनिकाने तिथेही त्याचा पाठलाग केला आणि मिलानचे बिशप अंब्रोज ह्यांच्याशी तिने जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. बिशप अंब्रोज ह्यांच्या वक्तृत्वाने व पावित्र्याने अगस्तीन इतका भारावून गेला की त्याने तात्काळ ख्रिस्ताला आपले जीवन अर्पण केले व इ.स. ३८७ सालच्या इस्टरच्या दिवशी त्याने बाप्तिस्मा घेतला.
मोनिकाची आयुष्यभराची आशा सफळ झाली. ती म्हणाली, “माझ्या मुला, माझ्या जीवनात तुला कॅथलिक झालेला पाहणे इतकेच एक ध्येय होते. देवाने मला माझ्या अपेक्षेपेक्षा अधिकच दिले आहे. येशूचे अनुकरण अधिक
जवळून करता यावे म्हणून या जगातील सर्व ऐहिक सुखांचा त्याग करण्याचे दान देवाने तुला बहाल केलेले आहे इतके मला पुरे आहे! माझे शरीर कुठेही पुरले तरी चालेल मात्र “तू देवाच्या वेदीपाशी जाशील तेव्हा माझी आठवण ठेव!"
कार्थेज येथे परतण्याच्या हेतूने मायलेक दोघे रोमहून निघाले. वाटेत ऑस्ट्रिया बंदरावर थांबलेले असतानाच मोनिकाने आपल्या मुलाच्या, अगस्तीनच्या बाहुपाशात सुखाने प्राण सोडला. त्यावेळी तिचे वय ५६ वर्षे इतके होते.
चांगल्याने वाईटावर मात कशी करायची ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत मोनिका हिचे जीवन! तिच्याच स्मरणार्थ पॅरीस येथे 'ख्रिश्चन मदर्स असोशिएशनची स्थापना करण्यात आलेली आहे. हाताबाहेर गेलेल्या पती व मुलांसाठी या स्त्रिया विशेष प्रार्थना करीत असतात.
चिंतन : तिचे माझ्यावर किती प्रेम होते ते शब्दबद्ध करणे कठीण आहे. तिच्या केवळ शब्दांनीच नव्हे तर करुणायुक्त नजरेने ती आमची हृदये प्रभूकडे लावण्यास आम्हाला प्रेरणा देई... हे माझ्या देवा, 'मी जर तुझे बाळ असेन तर ते केवळ तू मला दिलेल्या प्रेमळ आईमुळेच होय.-संत अगस्तीन
पहिले वाचन : १ थेस्सलनिकाकरांस ४:१-८
वाचक : पौलचे थेस्सलनिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"तुमचे पवित्रीकरण व्हावे अशी देवाची इच्छा ही आहे."
बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो आणि प्रभू येशूमध्ये बोध करतो की, तुम्ही कसे वागून देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले आणि तुम्ही त्याप्रमाणे वागत आहा त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांला दिल्या त्या तुम्हांला ठाऊक आहेत. कारण देवाची इच्छा आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे कामवासनेने नव्हे तर पवित्रतेने आणि अब्रूने तुम्हांतील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे. कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये, कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हांला आगाऊ सांगितले होते आणि बजावलेही होते. देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९७:१-२,५-६,१०-१२
प्रतिसाद : अहो, नीतिमान जनहो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा.
१) परमेश्वर राज्य करतो, पृथ्वी उल्हास करो,
द्वीपसमूह हर्ष करो, ढग आणि अंधार
त्याच्या सभोवती आहेत, नीती आणि
न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.
२) परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर
पर्वत मेणाप्रमाणे वितळले.
आकाशाने त्याची नीती प्रकट केली,
सर्व लोकांनी त्याचा गौरव पाहिला.
३) वाइटाचा द्वेष करणारांवर परमेश्वर प्रीती करतो,
तो आपल्या भक्तांच्या जीवांचे रक्षण करतो
तो त्यांस दुर्जनांच्या हातातून सोडवतो.
४) नीतिमानांसाठी प्रकाश आणि जे सरळ
अंत:करणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.
अहो नीतीमान जनहो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा.
त्याच्या पवित्र नामाचे कृतज्ञतापूर्वक स्तवन करा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
शुभवर्तमान मत्तय २५:१-१३
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला."
येशूने आपल्या शिष्यांना हा दाखला सांगितलाः “स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे होईल, त्या आपले दिवे घेऊन वराला सामोच्या जायला निघाल्या. त्यात पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण आपणांबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले आणि भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला आणि सर्वांना डुलक्या आल्या आणि झोप लागली. तेव्हा मध्यरात्री हाक आली की, पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपआपले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खानी शहाण्यांना म्हटले, तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून काही दया, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले की, कदाचित आम्हांला आणि तुम्हांला पुरणार नाही, तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन स्वत:करिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला, तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर लग्नाला आत गेल्या आणि दरवाजा बंद झाला. नंतर त्या दुसऱ्यांही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभो आम्हासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हांला नक्की" सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: प्रभू येशू आपणांस दहा कुमारिकांचा दाखला देत आहे. पाच शहाण्या कुमारी पूर्ण तयारी करून सावधपणे वराला सामोरे गेल्या. पाच मात्र पूर्ण तयारी न करता बेसावध होत्या. वर आला व पाच शहाण्या कुमारी आत गेल्या. देव येणार आहे. पण तो कधी येईल हे आपणास ठाऊक नाही. म्हणून आपण स्वतःला प्रार्थनेत मग्न ठेवले पाहिजे. आज संत मॉनिकाचा सण. तिची देवावर फार श्रद्धा. अहोरात्र ती प्रार्थनेत मग्न असायची. तिचा मुलगा आगुस्तीन, पापी जीवन जगत होता. त्याच्या आईचा प्रार्थनेचा दिवा देवासमोर अखंड तेवत होता. आगुस्तीनचे परिवर्तन झाले. आज आगुस्तीन ख्रिस्तसभेचा एक महान संत आहे. संत मॉनिकाच्या प्रार्थनेने तिच्या पतीचे सुद्धा परिवर्तन झाले. संत आगुस्तीनचे इशज्ञान व तत्त्वज्ञान ख्रिस्तसभेत शिकविले जात आहे. तुम्ही सतत प्रार्थना करणार तर देव येईल तेव्हा त्याचे स्वागत करण्यास तत्पर राहणार ना ?
प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहून तुला अनुसरण्यास धैर्य व प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या