Marathi Bible Reading | Thursday 26th August 2021 | 21st Week in ordinary Time

    सामान्य काळातील 

एकविसावा सप्ताह 

गुरुवार 

२६ ऑगस्ट २०२१

"तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला कल्पना नाही अशा घटकेला मनुष्याचा पुत्र येईल.”

संत झेफिरिनस

परमगुरू, रक्तसाक्षी (२१७)


आजच्या वाचनात संत पौल थेस्सलनिकाकरांस विश्वासात टिकून  राहण्यास आणि प्रभू येशू मध्ये स्थिरचित्त राहण्याचा सल्ला देत आहे. संत पौल  आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करताना म्हणत आहे, 'प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र  जनांसह येईल त्यावेळी निर्दोष व स्थिर असावे.'

 प्रभू येशू सर्वांना सतत जागृत राहण्याचा सल्ला देत आहे. आपण आपल्या देवावरील विश्वासात दृढराहावे, परस्परांवर प्रेम व  दया करुन प्रभूमध्ये सर्वदा प्रार्थनेद्वारे स्थिर बनावेत. आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप  करुन देवासमोर निर्दोष बनावे. देवाच्या आज्ञा पाळून प्रभूच्या वचनांनुसार जीवन  आचरण करावे. अशी आपल्या प्रभूची अपेक्षा आहे. अशासाठी की सांप्रत काळी सर्वाना सर्वकाळचे स्वर्गीय जीवन लाभावे. मात्र जगातील केवळ क्षणभंगूर गोष्टींचा ध्यास घेऊन देवाच्या कृपेपासून आपण बहकलो तर ज्यावेळी प्रभू येशू आपल्या पवित्र जनांसह परत येईल तेव्हा आपण बेसावध नसावे, अन्यथा आपला सर्वनाश होईल. तसे होऊ नये म्हणूनच प्रभू म्हणत आहे, 'तुम्ही जागृत राहा.

 आपला मृत्यु आपल्याला ठावूक नाही म्हणूनच सर्वदा जागृत राहणे गरजेचे आहे.  
✝️             
पहिले वाचन : १ थेस्सलनिकाकरांस ३:७-१३

वाचक : पौलचे थेस्सलनिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर आणि सर्वांवर वाढवून विपुल करो."

बंधूंनो, आम्हाला आपल्या सर्व अडचणीत आणि संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हांविषयी समाधान मिळाले, कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिरचित्त असला तर आता आमच्या जिवात जीव आल्यासारखे होईल. कारण तुमच्यामुळे आम्ही आपल्या देवापुढे जो आनंदीआनंद करीत आहो त्याबद्दल तुमच्यासंबंधाने त्याचे आभार पुरतेपणे कसे मानावे ? आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हाला तोंडीतोंडी पाहावे आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी. देव आपला पिता हा स्वतः आणि आपला प्रभू येशू हा, आमचे तुम्हांकडे येणे निर्विघ्न करो! आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर आणि सर्वांवर वाढवून विपुल करो, ह्यासाठी की, आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेने निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी.
हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र   १०:३-४,१२-१४,१७

प्रतिसाद : तू आपल्या दयेने आम्हांला तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊ.

१) तू मनुष्याला पुन्हा मातीला मिळवतोस 
आणि म्हणतोस, “अहो मानवांनो, परत जा." 
कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्षे कालच्या गेलेल्या 
दिवसासारखी रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.

२) ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे 
गणण्यास शिकव की, 
आम्हांला सुज्ञ अंत:करण प्राप्त होईल. 
हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ लावशील?
आपल्या सेवकांवर करूणा कर.

३) तू आपल्या दयेने आम्हांला प्रभातीच तृप्त कर, 
म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू
परमेश्वर जो आमचा देव त्याची कृपा आमच्यावर होवो.
 आमच्या हातच्या कामाला यश दे.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंत:करण वळव 
आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.

 आलेलुया!


शुभवर्तमान मत्तय २४:४२-५१ 

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"जागृत राहा आणि सिद्ध असा."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला कल्पना नाही अशा घटकेला मनुष्याचा पुत्र येईल.”

"ज्या विश्वासू आणि बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खायला देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा कोण धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य! मी तुम्हास नक्की सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. परंतु आपला धनी यायला विलंब लागेल असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल आणि आपल्या सोबतीच्या दासांना मारू लागेल आणि झिंगलेल्यांबरोबर खाईलपिईल, तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी आणि त्याला माहीत नसलेल्या घटकेला त्या दासाचा धनी येऊन त्याला छाटून टाकील आणि ढोंग्यांना द्यावयाचा हिस्सा त्याच्या पदरी बांधील, तेथे रडणे आणि दात खाणे चालेल."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:आजच्या शुभवर्तमानात येशू आपणास सावध राहण्यास सांगत आहे. प्रभू येशू पुन्हा येणार आहे. पण तो कोणत्या दिवशी येणार हे आपणास ठाऊक नाही. येशू एका विश्वासू दासाचे उदाहरण देऊन सांगतो. जो दास विश्वास त्याच्या धन्याच्या कुटुंबियांची सेवा करतो त्या दासाला त्याचा धनी उत्तम बक्षिस देईल. ह्या विश्वात अगणित निराश्रित आहेत. अन्नाच्या एका घासासाठी, पाण्याच्या थेंबासाठी तडफडत आहेत. फाटक्या तुटक्या कपड्यात कुणाच्यातरी ओटीवर रात्र काढत आहेत, भीक मागून मिळेल ते उष्टे अन्न खात आहेत. तर कधी उपाशी पोटी झोपतात. हे येशूचे कुटुंब आहे. येशू येईल तेव्हा ह्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान, हास्य व परिपूर्ण आनंद येशूच्या नजरेस पडावा हीच येशूची इच्छा आहे. जो अशा कुटुंबाची सेवा करताना सापडेल त्याला येशू मोठे बक्षिस देईल. तुम्ही कोणाची सेवा करणार ?

प्रार्थना:हे प्रभू येशू, क्षणभंगूर जागतिक गोष्टींत समरस न होता देवाला व प्रार्थनेला प्राध्यान्य देण्यास आणि आध्यात्मिकतेत वाढण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या