सामान्य काळातील
एकविसावा सप्ताह
बुधवार
२५ ऑगस्ट २०२१
“तुम्ही आंत ढोंगाने व अनीतिने भरलेले आहेत."
संत लुईस नववे
राजा, वर्तनसाक्षी (१२१४-१२७०)
“पाप करण्याऐवजी कोणतेही दुःख सहन करण्यास तयार असा.”- संत लुईस नववे -
'जो देव आपल्या राज्यात व गौरवांत तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे चालावे.’ संत पौल सर्वांना सात्विकतेने आणि प्रेमाने आचरण करण्याचा बोधपर सल्ला देत आहे.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू पुन्हा एकदा ढोंगी माणसांचा निषेध करीत आहे. बाह्य गोष्टींना प्राधान्य व महत्व देऊन केवळ सोयीस्करपणे कर्मकांड पाळणाऱ्यांना आत्मपरीक्षण करायला सांगत असून त्यांचे आध्यात्मिक जीवन तपासून पहायला सांगत आहे.
प्रभूच्या आजच्या वचनावर चिंतन करीत असताना आपण सुद्धा आपल्या आचरणावर मनन करु या. आपल्या विचारातून व कृतीतून धार्मिकता व नीतिमत्ता ह्याचे दर्शन इतरांना घडते का ?
सुंदरता, नीतिमत्ता आणि धार्मिकता ही सर्व आपल्या अंतर्मनात उगम पावलेली असतील तर ती आपोआप आपल्या शब्दातून व कृतीतून दिसून येत असतात. आपल्यामध्ये अशी आध्यात्मिकता असेल तर ती सर्व परिस्थितीत आरपार जाणवते. अशा माणसांच्या सहवासात येणाऱ्या सर्वांना देवाच्या अस्तित्वाची जाणीव होते. इतकेच नव्हे तर त्यांचे जीवन सात्विकतेने व प्रेमाने भरलेले आहे असे दिसून येते.
आपण आज श्रद्धेने व अंत:करणापासून देवाची सहभागिता अनुभवण्यास देवाकडे प्रेरणा मागू या.
पहिले वाचन : १ थेस्सलनिकाकरांस २:९-१३
वाचक : पौलचे थेस्सलनिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
" आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुम्हापुढे देवराज्याच्या सुवार्तेची घोषणा केली."
बंधूंनो, आमचे श्रम आणि कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे, तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने, नीतीने, आणि निर्दोषतेने कसे वागलो ह्याविषयी तुम्ही साक्षी आहा आणि देवही आहे, कारण तुम्हांला ठाऊकच आहे की, बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करत, धीर देत आणि आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो की, जो देव आपल्या राज्यात आणि गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.ह्या कारणामुळे आम्हीही देवाची निरंतर उपकारस्तुती ह्यामुळे करतो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकार ते माणसाचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते असेच आहे, ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये कार्य करत आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १३९:७-१२
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस.
१)मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ ?
मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ ?
मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस..
तू अधोलोकी मी आपले अंथरूण केले,
तरी पाहा, तेथे तू आहेस.
२) मी पहाटेचे पंख धारण करून
समुद्राच्या अगदी पलीकडल्या
तीरावर जाऊन राहिलो.
तरी तेथेही तुझा हात मला चालवील
तुझा उजवा हात मला धरून ठेवील.
३ )अंध:कार मला लपवो,
माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख होवो,
असे जरी मी म्हणालो, तरी अंधःकारदेखील
तुझ्यापासून काहीएक लपवत नाही,
रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव.
शुभवर्तमान मत्तय २३:२७-३२
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहा."
येशू म्हणाला, “अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहा, त्या बाहेरून खरोखरच सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी आणि सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तसेच तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने आणि अनीतीने भरलेले आहा."
“अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमान लोकांची थडगी सजविता आणि म्हणता, आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो, तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो. ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहा, अशी स्वतः विरुद्ध साक्ष देता, तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:“जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य!” आजच्या शुभवर्तमानात येशू शुद्ध अंतःकरणावर विशेष भर देत आहे. शास्त्री परुशांना अत्यंत परखडपणे सांगत आहे. “तुम्ही कबरांसारखे आहा. कबरा बाहेरून सुंदर दिसतात पण आत मृत व्यक्तीची हाडे व दुर्गंधी असते. तसेच तुम्ही नीतिमान दिसता पण आत ढोंगीपणा व अनीती भरलेली आहे.” आजचे शुभवर्तमान आपल्याकडे अंगुली निर्देश करीत आहे. आपल्या अंतःकरणात सुद्धा राग, द्वेष, मत्सर असतो. आपल्या मुखात प्रभूची वाणी पण अंतःकरणात अनीतीची कहाणी असे असल्यास त्याचा काय लाभ ? तरीही आपण चर्चमध्ये जाऊन अशा मलीन अंतःकरणात ख्रिस्तशरीर स्वीकारतो, तर ते किती योग्य आहे. आपणास आपल्या अंतर्यामीची शुद्धता करणे अगत्य आहे असे येशू आपणांस सांगत आहे. शुद्ध अंतःकरण म्हणजे निखळ आनंद. हा आनंद येशूला देण्यास आपली तयारी आहे ना ?
प्रार्थना:प्रभू येशू, मनापासून तुझी उपासना करण्यास व सेवा करण्यास सामर्थ्य दे, आमेन.
0 टिप्पण्या