Marathi Bible Reading | Tuesday 24th August 2021 | 21st Week in ordinary Time

  सामान्य काळातील 

एकविसावा सप्ताह 

मंगळवार 

२४ ऑगस्ट २०२१

“पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, ह्याच्याठायी कपट नाही.”



संत बार्थोलोम्यू
प्रेषित, रक्तसाक्षी (पहिले शतक)

बार्थोलोम्यू म्हणजे 'थोलोमीचा पुत्र. संत योहानच्या शुभवर्तमानातील पहिल्याच अध्यायात ज्या नथनेलला फिलिप्पने येशूकडे आणले त्यालाच बार्थोलोम्यू असे मानले जाते. येशूने त्याच्याकडे पाहताच 'हा खराखुरा इस्त्रायली आहे. ह्याच्याठायी कपट नाही' असे म्हटले होते. मात्र ह्या प्रेषिताविषयी पुरेशी माहिती इतिहासात उपलब्ध नाही.
तो गालिलातील काना गावचा असावा. त्याने अरेबियामध्ये येशूची सुवार्ता सांगितली. त्याला आर्मेनिया येथे जिवंत जाळून ठार केले गेले..
ऑरिजेन ह्या धर्मपंडिताचा गुरू पॅन्टेनिअस हा दुसऱ्या शतकात भारतात येऊन गेला. त्यावेळी त्याला कळले की, बार्थोलोम्यू त्याच्याही आधी भारतात आलेला होता. त्याने संत मत्तयचे हिब्रू भाषेतील शुभवर्तमान भारतात आणले होते.
गेली एक हजार वर्षे त्याचे अवशेष रोम शहरातील तिबेर बेटावरील एका चर्चमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. संत बार्थोलोम्यू हा गवंडी, चांभार आणि मटणविक्रेते ह्यांचा आश्रयदाता संत आहे. फिट्स येणाऱ्या माणसाला आराम पडण्यासाठी त्याचा धावा केला जातो. 


आजच्या पहिला वाचनात स्वर्गीय येरुशलेम आणि त्यातील प्रकाशमय वैभवाचे वर्णन करण्यात आले आहे. विशेषतः स्वर्गीय नगरीवर देवदुतांचा पहारा व प्रेषितांच्या नावांचा उल्लेख नगरीच्या तटावरील वेशीवर होता, असा दृष्टांत योहानाला झालेला प्रकटीकरातून वर्णन करण्यात आला आहे.
नथनेलने प्रभूवर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनाचा स्वामी म्हणून स्वीकारले. त्याच्याठायी कपट नव्हते, त्याने खऱ्या अंत:करणापासून  प्रभूच्या सुवार्तेचे कार्य केले. प्रभू येशूची सुवार्ता सांगत असताना त्याला जिवंत  जाळून ठार मारण्यात आले. प्रभूने म्हटले आहे, 'जगात तुमचा छळ होईल तरी  धीर धरा, मी जगाला जिंकले आहे ' (योहान १६:३३). नथनेल अर्थात बार्थोलोमिओ प्रभूच्या स्वर्गराज्यात स्वर्गीय येरुशलेममध्ये स्वर्गदुतांसंगे  विराजमान झाला. 
देवाची सुवार्ता घोषविणाऱ्यांना प्रभू येशूने स्वर्गराज्याचे अभिवचन दिलेले आहे. आपण संपूर्ण शक्तीने व विश्वासाने प्रभू येशूची शिकवण आत्मसात करुन सुवार्ता पसरविण्यास व देवाचे सेवाकार्य करण्यास प्रभूकडून कृपा व प्रेरणा मागू या.
✝️             

हिले वाचन प्रकटीकरण  २१:९-१४

वाचक : प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन २१:९-१४

"बारा पायांवर कोकराच्या बारा प्रेषितांची बारा वे होती."
देवदूत माझ्याबरोबर बोलला, तो म्हणाला, “ये, वधू म्हणजे कोकराची पत्नी मी तुला दाखवतो.” तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठया उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. तिच्या ठायी देवाचे तेज होते, तिची कांती अतिमोलवान रत्नासारखी होती, ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्फे खड्यासारखी होती. तिला मोठा उंच तट होता, त्याला बारा वेशी होत्या आणि वेशींजवळ बारा देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती, ती इस्राएलच्या संतानाच्या बारा वंशांची होती. पूर्वेकडे तीन वेशी, उत्तरेकडे तीन वेशी, दक्षिणेकडे तीन वेशी आणि पश्चिमेकडे तीन वेशी होत्या. नगरीच्या तटाला बारा पाये होते, त्यांवर कोकराच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती.
हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र   १४५:१०-१३,१७-१८

प्रतिसाद :  प्रभो, तुझे भक्त तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य जाहीर करतात.
१) हे परमेश्वरा, तुझे सर्व प्राणीमात्र तुझी स्तुती गातात, 
तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. 
ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात 
आणि तुझा पराक्रम कथन करतात.

२) ते तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य
ही मानवजातीला जाहीर करतात.
तुझे राज्य युगानुयुगे राहणारे राज्य आहे, 
तुझा राज्याधिकार पिढ्यान्पिढ्या टिकणारा आहे.

३) परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे, 
तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.
जे कोणी त्याचा धावा करतात,
जे मनापासून त्याचा धावा करतात,
त्या सर्वांच्या तो समीप आहे.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलचे राजे आहात.

 आलेलुया!


शुभवर्तमान योहान १:४५-५१

वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, ह्याच्याठायी कपट नाही !"

फिलिपला नथनेल सापडल्यावर तो त्याला म्हणाला, "ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्टयांनी लिहिले तो म्हणजे योसेफचा मुलगा येशू नाझरेथकरआम्हांला सापडला आहे." नथनेल त्याला म्हणाला, “नाझरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय?” फिलिप त्याला म्हणाला, “येऊन पाहा.” नथनेलला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, ह्याच्याठायी कपट नाही.” नथनेल त्याला म्हणाला, "आपणाला माझी ओळख कोठली?” येशूने त्याला उत्तर दिले, “फिलिपने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले” नथनेल त्याला म्हणाला, "गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलचे राजे आहा.' येशू त्याला म्हणाला, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठया गोष्टी पाहशील." आणखी तो त्याला म्हणाला, “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल.' "

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:फिलीप नथनेलास म्हणाला, “आम्हाला नाझरेथकर येशू सापडला आहे.” नथनेलाचा विश्वास बसेना. फिलीप त्याला म्हणाला, “येऊन पाहा.” नथनेलाला येताना पाहून येशू त्याच्या विषयी म्हणाला, “हा खराखुरा इस्रायली आहे, ह्याच्या ठायी कपट नाही.” पुढे येशू म्हणतो, “तू जेव्हा अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हा मी तुला पाहिले आहे.” हे ऐकून नथनेलाचे अंतःकरण येशूविषयी आदराने भरून गेले. तो म्हणाला, “गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलाचे राजे आहात.' नथनेलास येशूची खरी ओळख झाली व तो येशूचा शिष्य बनला. नथनेलाचे दुसरे नाव बार्थोलोम्यू. ह्याचा आज सण आहे. येशूच्या स्वर्गरोहणानंतर बार्थोलोम्यू सुवार्ता प्रसारासाठी भारतात आला. नंतर अर्मेनियात गेला. तेथे पुष्कळ लोक ख्रिस्ती झाले. येशूने पहिल्याच भेटीत नथनेला विषयी काढलेले आदरयुक्त उद्गार आपल्या बाबतीत सुद्धा काढावेत असे आपणास वाटते. होय ना?

प्रार्थना:हे प्रभू येशू, तुझ्या स्वर्गराज्याचे वारसदार बनण्यास आम्हाला पात्र बनव. तुझा शब्द आत्मसात करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या