Marathi Bible Reading | Monday 23rd August 2021 | 21st Week in ordinary Time

 सामान्य काळातील 

एकविसावा सप्ताह 

सोमवार 

२३ ऑगस्ट २०२१

अहो परुश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार!


लिमाची संत रोझ

कुमारिका (१५८६-१६१७)

पेरू देशाची राजधानी लिमा येथे एका गरीब घराण्यात इजाबेला डी फ्लोरेझ हिचा जन्म झाला. वयाच्या ११ व्या वर्षी जेव्हा तिला आर्चबिशप (संत) तुरिबियुस (सण २३ मार्च) ह्यांनी दृढीकरण संस्कार दिला तेव्हा तिने रोझ मारी असे नाव धारण केले. सिएनाच्या संत कॅथरीनप्रमाणे (सण २९ एप्रिल) ती प्रार्थनामय आणि साधे वैराग्यवृत्तीचे जीवन जगू लागली. उपासतापास आणि आत्मक्लेश ह्याद्वारे ती आपल्या कुटुंबातच व्रतस्थाचे जीवन जगत असे. घरची गरिबी असल्यामुळे भरतकाम आणि इतर हलकी फुलकी कामे करून ती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चार पैसे कमावीत असे.
आपल्या घरापाठीमागे असलेल्या बागेत तिने व तिच्या भावाने भाजलेल्या विटांची एक छोटीशी झोपडी उभारली होती. तिथे ती प्रार्थना करी, रात्री काचेचे तुकडे व फुटलेल्या भांड्यांचे तुकडे यावर फक्त थोडे तास विश्रांती घेई. दिवसभर गोरगरिबांना मदत करणे आणि अतिपवित्र साक्रामेंताची भक्ती यामध्ये ती गढलेली असे. त्या विचित्र वातावरणात तिला दररोज कम्युनियन देण्याची व्यवस्था तिच्या आध्यात्मिक सल्लागार धर्मगुरूंनी केली होती.
तब्बल २० वर्षांनी तिच्या कुटुंबातील वातावरण तिच्या दृष्टीने पोषक बनले. आता ती तिच्या मनाप्रमाणे उघडपणे व्रतस्थाचे जीवन जगू शकत होती. कुटुंबातील थट्टामस्करी व विरोध आता मावळला होता. तिने लगेच डॉमनिकन संघात प्रवेश घेतला.
इथे तिने आपल्या आत्मक्लेशाचे प्रमाण वाढविले. क्वचितच कधीतरी जेवण घेणे, कमरेभोवती काटेरी साखळदंड करकचून आवळून बांधणे आणि डोक्याला काटेरी मुकूट घालणे अशा विविध मार्गांनी तिने आपल्या लहानसहान पापांबद्दल पश्चात्ताप करायला व प्रायश्चित्त घ्यायला सुरुवात केली. शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी तिने बऱ्याच यातना सहन केल्या.
तिच्या मते 'प्रत्येक दुःखसहनामध्ये स्वर्गीय आनंद दडलेला असतो.मात्र त्या दु:खाकडे मानवी नजरेतून न पाहता देवाच्या दृष्टीने पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते.'
२४ ऑगस्ट १६१७ रोजी झालेल्या तिच्या मृत्यूनंतर असंख्य चमत्कार घडून येऊ लागले. त्यावेळी तिचे वय अवघे ३१ वर्षे इतके होते. पोप क्लेमेंट दहावे ह्यानी १६७१ साली तिला संतमालिकेत समाविष्ट केले. अमेरिकेतून झालेली ती पहिलीच संत होय. तिला लॅटीन अमेरिका व फिलिपाईन्स या देशांची आश्रयदाती संत मानले जाते.

आपण आज आपल्या ख्रिस्ती जीवन आचरणावर चिंतन करु या. आपल्यामध्ये तसा स्वार्थी, अन्यायी व ढोंगी शास्त्री परुशी दडलेला तर नाही ना ? देवाच्या नावाने कार्य करणारा माणूस विश्वासू व निःस्वार्थीपणे लोकांना चुकीच्या मार्गापासून परावृत करीत असतो. दयाळूपणा व प्रेमळपणा हे ख्रिस्ती माणसाचे खरे गुण विशेष असताना दुसऱ्यांच्या दुःखा बद्दल व असहायतेबद्दल त्यांना अनुकंपा वाटते आणि त्यानुसार ते सर्वांना मदतीच्या हात देत असतात. म्हणूनच प्रभू येशूने म्हटले आहे. 'जासा स्वर्गीय पिता प्रेमळ व दयाळू आहे तसेच आपण सुद्धा असावे' (मत्तय ५:७).

✝️             

हिले वाचन : १ थेस्सलनी  १:२-५.८-१०

वाचक : पौलचे थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

“त्याच्या पुत्राची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास, तुम्ही मूर्तीपासून देवाकडे वळला, पुत्राला देवाने मेलेल्यातून उठवले."

आम्ही पौल, सिल्वान आणि तीमथी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो. देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हांला ठाऊक आहेच. कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने आणि पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली. तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हांला ठाऊक आहे.
देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे, ह्यामुळे त्याविषयी आम्ही सांगावयाची काही गरजच राहिली नाही. कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास, तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगता, त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठवले आणि तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणारा आहे."

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र   १५०:१-६,९

प्रतिसाद :   परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे.

१ )परमेश्वराचे स्तवन करा. 
नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा, 
भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. 
इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो,
सियोनची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हास पावोत.

२) ती नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत, 
डफ आणि वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत. 
कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे.
 तो नम्रजनांना तारणाने सुशोभित करतो.

३) भक्त गौरवामुळे उल्हासोत, 
ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत. 
परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो.
 हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल.
परमेश्वराचे स्तवन करा.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. 
 आलेलुया!


शुभवर्तमान मत्तय  २३:१३-२२

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“अहो, आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. "

येशू म्हणाला, “अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता, तुम्ही स्वतःही आत जात नाही आणि आत जाणाऱ्यांना जाऊ देत नाही. अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता आणि ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता, ह्यामुळे तुम्हाला अधिक शिक्षा होईल. अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही एका मतानुयायी मिळवण्यासाठी समुद्र आणि भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणाहून दुप्पट असा नरकपुत्र करता. "“अहो, आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही म्हणता, कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु जो कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर मात्र तो बांधला जातो. अहो, मूर्खानो आणि आंधळ्यांनो, ह्यातून मोठे कोणते ? ते सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर ? तुम्ही म्हणता, कोणी वेदीची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर तो बांधला जातो. अहो आंधळ्यांनो, ह्यातून मोठे कोणते ? अर्पण किंवा अर्पण पवित्रकरणारी ती वेदी ? म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची आणि तिच्यावर जे काही आहे त्याची शपथ घेतो आणि जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची आणि त्यात राहणाऱ्यांची शपथ घेतो आणि जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या राजासनाची आणि त्याच्यावर बसणाऱ्याची शपथ घेतो."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: येशू नेहमी आपल्या लोकांबरोबर बोलताना प्रेमाने, शांतीने व आपुलकीने बोलायचा. पण त्या दिवशी अत्यंत कठोर पणाने ओरडून, शास्त्री पुरुश्यांची भीड न बाळगता बोलला. कारण ते स्वतः स्वर्गात न जाता, जे जाऊ पाहात होते त्यांनाही जाऊ देत नव्हते. ते विधवांची पिळवणूक करीत, त्याची घरे लुटत, त्याच्यावर दया दाखवण्याचे सोंग करीत. ते दूरवर प्रवास करून अनुयायी आणून त्याला दुप्पट नरकपुत्र करीत. लोकांना चुकीच्या वस्तूंची शपथ घ्यायला लावीत. लांबलांब प्रार्थना करीत. ह्या गर्विष्ठ, ढोंगी, शास्त्री परुश्याविषयी येशू म्हणतो, “तुमची केवढी दुर्दशा होणार.” आपण हा गर्विष्ठ व ढोंगी मार्ग, दुर्दशेचा मार्ग या ऐवजी सत्याचा मार्ग अवलंबावा. जेथे गरिबांचा उद्धार होतो, विधवांचा कैवार घेतला जातो, अनाथांना आधार मिळतो. अशा सेवेच्या, येशूच्या मार्गाने चालावे असे आपणास वाटते ना ?

प्रार्थना:हे प्रभू येशू, निष्ठेते व प्रामाणिकपणे तुला अनुसरण्यास व तुझी सुवार्ता घोषविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या