Marathi Bible Reading | 21st Sunday in ordinary Time | 22nd August 2021

 सामान्य काळातील 

एकविसावा रविवार 

२२ ऑगस्ट २०२१



पवित्र मरियेचे राणीपद

पवित्र मरियेच्या स्वर्गनयन सोहळ्यानंतर अवघ्या आठवड्याभरात ख्रिस्तसभा पवित्र मरियेच्या राणीपदाचा सोहळा साजरा करते, याकोबच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करणाऱ्या देवपुत्राची ती कुमारी माता होती म्हणून देवाने तिला स्वर्ग आणि पृथ्वीची राणी म्हणून गौरविले. पवित्र मरियेच्या जीवनातील आणि तारणाच्या वीस रहस्यांतील मरियेचा हा सर्वात मोठा सन्मान समजला जातो. 
ख्रिस्ती धर्मपरंपरेतील पुष्कळ विद्वान पंडितांनी पवित्र मरियेचा उल्लेख 'प्रभूची माता' 'राजांच्या राजाची आई' 'विश्वाच्या सम्राटाची जननी' असा केलेला आहे. संत ग्रेगरी नाझियांझन ह्यांच्या मते 'संपूर्ण जगाला ख्रिस्ताच्या रूपाने एका सम्राटाची देणगी देवाने जिच्यातर्फे दिली अशी ती कुमारी माता होय.' 'पवित्र) •मरिया ही सर्व चराचर सृष्टीची राणी आणि या पृथ्वीतलावरील सर्व मनुष्य प्राण्यांची सम्राज्ञी मानली जाते.'

बहकलेल्या आणि गोंधळलेल्या इस्त्राएली जनतेला परमेश्वराने वेळो वेळी त्याच्या कृपाछत्राखाली आणण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी विश्वासाने परमेश्वराची आज्ञा मान्य केली व आचरणात आणली त्याला परमेश्वराने आशीर्वाद दिला . 

परमेश्वर पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराच्या दयेचा, क्षमेचा व प्रेमाचा संदेश देऊन सार्वकालिक जीवनाचा महा मंत्र दिला. मात्र अनेकांचा विश्वास अपूरा पडला. अनेकांना येशूची शिकवण अमलात आणता आली नाही. तर काहींजण प्रभू येशू पासून फरकत घेऊन मार्गस्थ झाले. स्तोत्रत म्हटले आहे, 'ज्यांस तुझ्या नावाची ओळख आहे ते तुजवर भाव ठेवतील' (स्तोत्र १:१०). 

 आजच्या शुभवर्तमानावर चिंतन करीत असताना आपण आत्मापरिक्षण करु या. प्रभू पासून आपण बहकलो असल्यास त्याला शरण जाऊ या. त्याच्या राजासना समोर लोटांगण घालू या.

संत पौल अजच्या दुसऱ्यावाचनात आपल्याला जाणीव करून देत आहे कि आपण सर्वजण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. प्रभूच्या दये विना व कृपेविना आपले जीवन शुन्य आहे. आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक जीवनात प्रभू येशूला व त्याच्या शिकवणुकीला प्राधान्य देऊन प्रभूच्या सहवासाचा अनुभव घेऊ या.

✝️             

पहिले वाचन :यहोशवा  २४: १-२, १५-१८

वाचक : यहोशवा या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"आम्ही परमेश्वराचीच सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे."

यहोशवाने इस्त्राएलच्या सर्व वंशांना शखेम येथे जमवले आणि इस्राएलचे वडीलजन, प्रमुख, न्यायाधीश आणि अमंलदार ह्यांना बोलावणे पाठवले आणि ते देवासमोर हजर झाले. तेव्हा यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, “परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहा त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवाची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.'

तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो; कारण आमचा देव परमेश्वर ह्यानेच आम्हाला आणि आमच्या पूर्वजांना इजिप्त देशातून, दास्यगृहातून काढून आणले, त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला व ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे तेथे त्याने आमचे संरक्षण केले. ह्या देशात राहणाऱ्या अमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्यापुढून घालवून दिले. आम्हीही परमेश्वराचीच सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे."

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र   ३४:२-३,१५-२२

प्रतिसाद :  परमेश्वर किती चांगला आहे हे अनुभव घेऊन पाहा.

१) मी परमेश्वराला सर्वदा धन्यवाद देईन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल, माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील. दीनजन हे ऐकून हर्ष करतील.

२) परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो.

३) ते धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करतो. परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.

४) नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो, त्याची सर्व हाडे तो सांभाळतो, त्यातले एकही मोडत नाही.

५) दुष्टाचे मरण दुष्टाईतच होणार, नीतिमानाचे द्वेष्टे दंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकांचा उद्धार करतो, त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.


दुसरे वाचन इफिस ५:२१-३२ 

वाचन : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"हे रहस्य मोठे आहे, मी ख्रिस्त आणि मंडळी ह्यांच्यासंबंधाने बोलतो आहे. "
ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टींमध्ये आपआपल्या पतीच्या अधीन असावे.
पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपआपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःला तिच्यासाठी समर्पण केले, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्रव निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो, जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो. आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहो. “म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एकदेह होतील." हे रहस्य मोठे आहे पण मी ख्रिस्त आणि मंडळी ह्यांच्यासंबंधाने बोलतो आहे.
हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया ! 
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतःचक्षु प्रकाशित करो, म्हणजे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही आम्ही ओळखावी.
 आलेलुया!


शुभवर्तमान योहान ६:६०-६९

वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाजवळ आहेत."

येशूच्या शिष्यांपैकी पुष्कळजण येशूचा हा उपदेश ऐकून म्हणाले, “हे वचन कठीण आहे, हे कोण घेऊ शकतो ?" आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुम्ही अडखळता काय ? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता, तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर ? आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही, मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा आणि जीवन अशी आहेत. तरी विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत." कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपणांला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, ह्याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की, पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्यावाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही." ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. म्हणून येशू बारा शिष्यांना म्हणाला, “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?" शिमोन पेत्रने उत्तर दिले, “प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत, आम्ही विश्वास ठेवला आहे आणि ओळखले आहे की, देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहा.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: 'आपण ज्या गोष्टींच्या किंवा व्यक्तीच्या प्रेमात पडतो ती गोष्ट किंवा ती व्यक्ती आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी ठरवित असते.' असे उद्गार संत पाद्रे पिओ ह्यांनी काढलेले आहेत. ते पुढे म्हणतात, 'येशूच्या प्रेमात पडा, तो तुमच्या भल्यासाठी असलेल्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी ठरवील.' आजची तिन्ही वाचने जीवनात योग्य ती निवड करण्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात. पहिले वाचन खऱ्या परमेश्वराची उपासना करण्याविषयी, दुसरे वाचन कुटुंबात उचित मूल्ये जोपासण्याविषयी तर शुभवर्तमान सार्वकालिक जीवनाची निवड करण्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करते. • माणूस मात्र जीवनात चुकीची निवड का करतो ? कारण त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीची पुरेशी जडणघडण झालेली नसते. मॉरल थिओलॉजी (नीतिशास्त्र) आपल्यासमोर सद्सद्विवेकबुद्धीचे एकूण पाच प्रकार सादर करते ? 
१) मृत सद्सद्विवेकबुद्धी : अशा व्यक्तीला पाप करताना काहीच वाटत नाही. हेरोद, फारो, पिलाद यासारखी माणसे दुसऱ्यांचा मुडदा पाडतात तरी त्यांना काहीच वाटत नाही. अशा व्यक्तीने आपल्या पाषाणमय हृदयाच्या जागी आपल्याला मांसमय हृदय मिळावे म्हणून प्रार्थना करायची असते. 
२) टोचणी देणारी अतिकोमल सद्सद्विवेकबुद्धी : अशा व्यक्ती फार हळव्या असतात. बारीक-सारीक गोष्टी त्यांना पापा इतक्या गंभीर वाटतात. त्या नेहमी अस्वस्थ असतात. अशा व्यक्तींना परमेश्वराची सतत भीती वाटत असते. तोच परमेश्वर क्षमाशील पिता आहे हे त्यांनी ध्यानात घ्यायचे असते. 
३) गोंधळलेली सदसदविवेकबुद्धी : अशा व्यक्तींच्या मनात सतत गोंधळ असतो. एखादी गोष्ट बरोबर आहे की नाही ह्याची त्यांना खात्री नसते. त्यांना स्वतःची निर्णय स्वतः घेता येत नाही. त्या इतरांच्या मतावर विसंबून असतात. अशा व्यक्तींनी शांततेत मनन-चिंतन केले तर त्यांच्या मनाचा गोंधळ कमी होऊ शकतो. 
४) जागृत सदसदविवेकबुद्धी : इथे गोंधळ नसतो. चांगले काय ठाऊक असूनही ते करत नाही. वाईट काय हे माहीत असूनही ते टाळता येत नाही. अशी ह्या व्यक्तींची गत झालेली असते. त्यांनी अंतर्यामी बलसंपन्न होऊन शिस्तप्रिय जीवन अंगिकारणे गरजेचे असते. 
५) परिपक्व सदसदविवेक अशा व्यक्तींना बरेवाईट ठाऊक असते. त्या अंतर्यामी बलवान असतात. योग्य निर्णय घेण्यापासून त्यांना कोणतीही व्यक्ती किंवा परिस्थिती रोखू सकत नाही. चांगले करण्यासाठी किंवा वाईट टाळण्यासाठी त्या प्राणाचे बलिदान करण्यास तयार असतात.

आत्मपरीक्षणः माझ्या जीवनात कोणत्या प्रकारची सद्सद्विवेकबुद्धी कार्यरत आहे ? माझ्या सद्सद्विवेकबुद्धीची जडणघडण करण्यासाठी मी कोणते प्रयत्न करतो ?

प्रार्थना: हे परमेश्वर बापा, तुझ्याशी ऐक्य साधन्यास व प्रभू येशू बरोबर एकरुप होण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या