सामान्य काळातील
विसावा सप्ताह
शनिवार
२१ ऑगस्ट २०२१
संत पायस दहावे
परमगुरू, वर्तनसाक्षी (१८३५-१९१४)
पोप पायस दहावे ह्यांनी जीवनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत प्रभूसाठी परिश्रम घेतले. २० ऑगस्ट १९१४ साली त्यांची प्राणज्योत मालवली. पोप पायस बारावे ह्यांनी २९ मे १९५४ रोजी त्यांना संतपदाच्या पुष्पहारात गुंफले.
चिंतन: जो मनुष्य आपले विचार, शब्द आणि कृती ह्यावर बारीक लक्ष ठेवून असतो तो आपल्या जीवनात सद्गुणांची जोपासना करण्यात आणि दुर्गुण टाळण्यात वाकबगार बनतो असा इतिहास आहे.- संत पायस दहावे
“तुमच्यापेक्षा जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे.'
अनेकदा आपल्या बोलण्यात आणि वागण्यात विसंगती आढळून येते. आपण चांगले बोलतो व चांगुलपणाचा सल्ला इतरांना देतो मात्र तसे आपले स्वत:चे आचरण नसते. धर्मशास्त्राचे खूप ज्ञान असणे आणि त्याविषयी केवळ बढाई मारणे हे योग्य नाही. आपल्या बोलण्यात व आचरणात सुसंगती असायला हवी तरच आपण सत्यवादी बनू शकतो. खरा धार्मिक माणूस नम्र असतो व सर्वप्रसंगी दुसऱ्यांची सेवा करायला तत्पर असतो. आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की मवाबी रुथने नम्रपणे आपल्या सासूची सेवा करुन सर्वांची मने जिंकली कारण तिच्याठायी देवाचे भय होते.
आजच्या शुभवर्तमानात स्वतःला धार्मिक, नीतिमान व सेवक मानणाऱ्या शास्त्री परुश्यांना प्रभू येशूने सावधानतेचा इशारा दिला. तसेच सामान्यजनांना स्पष्ट केले की शास्त्री परुश्यांसारखे तुम्ही आचरण करु नका. आपल्यातील अहंकार व खोटा अभिमान आपण काढून टाकायला हवा. आपल्यामध्ये असलेला स्वार्थ व ढोंगीपणा बाजूला सारुन प्रामाणिकणा व सत्यनिष्ठा आपण आचरणात आणायला हवी. म्हणूनच प्रभू येशू पुढे म्हणत आहे. ‘तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.'
आपल्यामध्ये देवाठायी नम्रता धारण करता यावी म्हणून आपण सतत प्रयत्नशील बनू या.
पहिले वाचन : रूथ २:१-३,८-११;४:१३-१७
वाचक : रूथ या पुस्तकातून घेतलेले वाचन
“परमेश्वराने तुला तुझे वतन सोडवणाऱ्या जवळच्या आप्ताविना ठेवले नाही. तो इशायचा बाप व दावीदचा आजा होय."
नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता. तो अलीमलेख याच्या कुळातला असून मोठा धनवान माणूस होता. त्याचे नाव बवाज असे होते. मवाबी रुथ नामीला म्हणाली, मला शेतात जाऊ द्या म्हणजे कोणाची माझ्यावर कृपादृष्टी झाल्यास त्याच्यामागून मी धान्याचा सरवा वेचीत जाईन. ती म्हणाली, “मुली, जा.” ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागून सरवा वेचू लागली. सुदैवाने शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेखच्या कुळातल्या बवाजचा होता. बवाज रुथला म्हणाला, “मुली ऐकतेस ना? तू त्याच्या शेतात सरवा वेचावयास येथून जाऊ नकोस, येथेच माझ्या नोकरिणींबरोबर राहा. हे ज्या शेताची कापणी करीत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा. तुला काही त्रास पोहोचू नये अशी आज्ञा मी या गड्यांस दिली आहे. तुला तहान लागल्यास तू भांड्यांकडे जाऊन त्या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी. तेव्हा ती त्याला दंडवत घालून म्हणाली, “माझ्यासारख्या परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे काय कारण बरे ?" बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस आणि तू कशाप्रकारे आपली मातापितरे आणि जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकांत आलीस, ही सविस्तर हकीकत मला समजली आहे.
मग बवाजने रुथशी लग्न केले आणि ती त्याची पत्नी झाली. परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. तेव्हा स्त्रिया नामीला म्हणाल्या, “परमेश्वर धन्य आहे, त्याने तुला तुझे वतन सोडवणाऱ्या जवळच्या आप्ताविना ठेवले नाही. त्याचे नाव इस्राएलमध्ये प्रख्यात होवो ! हा तुझे पुनरुज्जीवन करणारा आणि वृद्धापकाळी तुझा प्रतिपाळ करणारा होवो, कारण तुझी सून जी तुझ्यावर प्रीती करते आणि जी तुला सात पुत्रांहून अधिक आहे तिला हा पुत्र झाला आहे.” मग नामीने ते मूल उचलून आपल्या उराशी धरले आणि ती त्याची दाई बनली. "नामीला पुत्र झाला," असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद असे ठेवले. तो इशायचा बाप आणि दावीदचा आजा होय.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १२८:१-५
प्रतिसाद : पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या माणसाला आशीर्वाद मिळेल.
१) जो माणूस परमेश्वराचे भय धरतो,
जो त्याच्याच मार्गानी चालतो तो धन्य!
तू आपल्या श्रमाचे फळ खाशील.
२) तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल,
तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल,
तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील.
३) पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या माणसाला
असा आशीर्वाद मिळेल.
परमेश्वर सियोनातून तुला तुझ्या
आयुष्याचे सर्व दिवस आशीर्वाद देवो!
हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत, ते सदासर्वकाळ अढळ आहेत.
शुभवर्तमान मत्तय २३:१-१२
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत."
येशू लोकसमुदायांना आणि आपल्या शिष्यांना म्हणाला, शास्त्री आणि परुशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतील ते सर्व आचरत आणि पाळत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांदयावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावणार नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करतात, ते आपली मंत्रपत्रे रुंद आणि आपले गोंडे मोठे करतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे, आणि लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यास आवडते. तुम्ही तरी आपणाला गुरुजी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एक आहे आणि तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणाला स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:गर्विष्ठ व्यक्ती म्हणजे विवेक शून्य व्यक्ती, गर्विष्ठ व्यक्ती इतरांना तुच्छ मानते. माझ्यासमान दुसरा कुणीही नाही असे त्यांना वाटते, शास्त्री आणि परुशी मोशेच्या आसनावर बसले होते, पण ते मोशेप्रमाणे वागतच नव्हते. नियम आणि अटी फक्त लोकांनी पाळावयाचे. स्वतः मात्र उंच कपडे घालून लोकांसमोर मिरवायचे, जेवणावळीत व सभास्थानात त्यांना उच्च स्थानी बसणे आवडायचे, सार्वजनिक ठिकाणी लोकांनी त्यांना नमस्कार करावेत अशी त्याची इच्छा असायची. येशूला त्यांची ही वागणूक अर्थातच आवडली नाही. म्हणून लोकांना सावध करून येशू म्हणाला, “ते जे काही सांगतील तसे करा परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका. तुमच्यामध्ये जो मोठा आहे त्याने इतराचा सेवक व्हावे.” तुम्ही स्वतःला नम्र करून इतरांची सेवा करण्यास सज्ज आहात का ?
प्रार्थना: हे प्रभू येशू, नम्रपणे तुझा खरा अनुयायी बनून सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
0 टिप्पण्या