Marathi Bible Reading | Friday 20th August 2021 | 20th week in ordinary Time

          सामान्य काळातील 

विसावा सप्ताह 

शुक्रवार 

२० ऑगस्ट २०२१

“तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, व स्वत:सारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. "

संत बर्नर्ड  

- वर्तनसाक्षी 

संत बर्नर्ड २० ऑगस्ट १९५३ रोजी मरण पावले, त्यांना १९७४ साली

संतपद आणि १८३० साली धर्मपंडित हे पद बहाल करण्यात आले..

चिंतन : जो मनुष्य निष्काळजीपणे प्रार्थना करतो आणि देवाकडून मोठ्या कृपादानांची अपेक्षा करतो तो गिरणीत वाईट धान्य टाकून चांगल्या पीठाची अपेक्षा करणाऱ्या माणसासारखा आहे. संत बर्नर्ड


 ख्रिस्ती धर्माचे पूर्ण सार देवप्रीति आणि परस्पर बंधु प्रीतिच्या आज्ञेत  सामावलेले आहे. आजच्या शुभवर्तमानात सर्वात मोठ्या आज्ञेविषयी  विचारलेल्या प्रश्नाला प्रभू येशूने स्पष्ट उत्तर दिले. 'तू आपला देव परमेश्वर  ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर व तू आपल्या  शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीति कर.' 

प्रभू येशूने म्हटले आहे की, देवप्रीति व परस्परप्रीतिच्या आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो तसेच आपण सुद्धा त्याच्यावर प्रेम करावे ही देवाची आज्ञा आहे, कारण आपल्या जीवनात उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टी परमेश्वरानेच आपल्याला देणगी दाखल दिलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले आहे की, 'जसा परमेश्वर पिता प्रेमळ व दयाळू आहे तसेच आपण सुद्धा असावे.'

 'देव प्रीती आहे' आणि त्याची संपूर्ण निमिर्ती त्याच्या परिपूर्ण प्रीतीचे स्वरुप आहे.  देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने क्रुसावरील मरणापर्यंत आपल्या सर्वांवर प्रेम केले व देवप्रीति आणि परस्पर प्रीतिचा उच्चांक गाठला.

 खरोखरच आपण देवावर प्रीति करतो का? देवाला आपल्या जीवनात अग्रस्थान आहे का ? तसेच स्वतःसारखे इतरांवर प्रेम करण्यास व दया दाखविण्यास आपण तयार असतो का? संत पेत्र म्हणतो, 'एकमेकांवर मनापासून प्रेम करा.' संत पौल  म्हणतो, 'प्रीति हे तुमचे ध्येय असू द्या.

✝️             

पहिले वाचन : रूथ  १:१,३-६,१४,१६,२२

वाचक :रूथ  या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"नामी रुथ मवाबीकर हिला घेऊन परतली आणि त्या दोघी बेथलेहेमला आल्या. "

शास्त्यांच्या अमदानीत देशात दुष्काळ पडला. त्यासमयी बेथलेहेम-यहुदा येथील एक पुरुष आपली पत्नी आणि दोन पुत्र घेऊन मवाब देशात काही दिवस राहायला गेला. पुढे नामीचा पती अलीमलेख हा मरण पावला आणि नामी आणि तिचे दोन पुत्र मागे राहिले. त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया बायका केल्या एकीचे नाव अर्पा आणि दुसरीचे नाव रुथ होते. ती तेथे सुमारे दहा वर्षे राहिली. नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले. याप्रमाणे नामी आपली दोन मुलगे आणि आपला पती यांना अंतरली.
परमेश्वराने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांना अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मवाब देशात कळले, तेव्हा त्या देशातून आपल्या दोघी सुनांसह परत जायला ती निघाली. अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला आणि ती निघून गेली. पण रुथ तिला बिलगून राहिली.
तेव्हा ती म्हणाली, पाहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे आणि आपल्या देवाकडे परत गेली आहे तर तूही आपल्या जाऊच्या मागून जा. रुथ म्हणाली, "मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.
याप्रमाणे ती आपली सून मवाबीकर रुथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली. त्या दोघी बेथलेहेमला आल्या. तेव्हा सातूच्या हंगामाला आरंभ झाला होता.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र   १४६:५-१०

प्रतिसाद : हे माझ्या मना, परमेश्वराचे स्तवन कर.

१) ज्याच्या साहाय्याकरिता याकोबचा देव आहे, 
ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे, 
तो धन्य त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र आणि 
त्यातील सर्वकाही निर्माण केले.

२) तो सदा आपले सत्यवचन पाळतो, 
तो छळलेल्यांचा निवाडा करतो. 
भुकेल्यांना अन्न देतो, 
परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.

३) परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो,
 परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो, 
अनाथ आणि विधवा ह्यांची दाद घेतो.

४) परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो, 
परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो, 
परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो, हे सियोन, 
तुझा देव पिढ्यान्पिढ्या राज्य करतो. 
परमेश्वराचे स्तवन करा.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया ! 
तुम्ही आपली मने आज कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
 आलेलुया!


शुभवर्तमान मत्तय २२:३४-४०

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर आणि स्वतःसारखी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर. "

येशूने सदुक्यांना निरुत्तर केले हे ऐकून परुशी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परिक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे ? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, तू आपल्या शेजाऱ्यांवर स्वतः सारखी प्रीती कर. ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:आजचे शुभवर्तमान आपणांस ईश्वरप्रीती व शेजारप्रीती विषयी सांगत आहे. ईश्वर प्रीती व शेजारप्रीती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रभू येशूने जुन्या करारातील दहा आज्ञा व सर्व नियम एकत्र करून आपणांसाठी एकच आज्ञा दिलेली आहे. “तुम्ही एकमेकांवर प्रीती करा.” ख्रिस्ती धर्मियांचे “प्रीती" हे विश्वसनीय ओळखपत्र आहे. ईश्वरप्रीती बरोबर शेजारप्रीती करणे अगत्य आहे. अडीअडचणीत, आजार - त्रासात, संकटात शेजारीच एकमेकांच्या मदतीसाठी धाव घेतात. शेजारधर्म पाळणे हें। देवाला आनंददायी आहे. शेजारात कलह असला, एकमेकांविषयी द्वेष, मत्सर असला तर तेथे देवाची शांती लोप पावते. पण एकमेकांवर प्रीती केल्याने आपण ख्रिस्ताचे खरे अनुयायी होऊ शकतो. आपल्या शेजारात देवाच्या शांतीचे राज्य सतत राहावे म्हणून आपण काय करणार आहोत ?

प्रार्थना: हे प्रभू परमेश्वरा, प्रीति ह्या सर्वोत्कृष्ट दानाबद्दल तुझे मनापासून आभार, तुजवर व बंधू-भगिनींवर प्रीति करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या