Marathi Bible Reading | Thursday 19th August 2021 | 20th week in ordinary Time

         सामान्य काळातील 

विसावा सप्ताह 

गुरुवार 

१९ ऑगस्ट २०२१

“बोलाविलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.”


संत जॉन यूड्स

- वर्तनसाक्षी (१६०१-१६८०)

इतरांशी कसलाही व्यवहार करण्यापूर्वी त्यांच्या रक्षकदुतांकडे आणि आश्रयदात्या संताकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, ते करीत असलेल्या कार्याद्वारे देवाचा गौरव व्हावा. -संत जॉन यूड्स

अम्मोनी लोकांच्या पाडाव करण्यासाठी देवाने इफ्ताहाची निवड केली. इफ्ताहाने सर्वस्व पणाला लावून देवाच्या सामर्थ्याने अम्मोन्यांचा पाडाव केला. आपल्या माणसांनी नाकारलेल्या इफ्ताहाला त्यांचा प्रमुख होण्यासाठी देवाने निवडले. 

प्रभू येशू लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत देऊन देवाचे निवडलेले लोक कोण आहेत ह्याचे स्पष्टीकरण करीत आहे. प्रभू परमेश्वर त्याच्या स्वर्गीय मेजवानीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांना बोलावित असतो. अनेकजण त्या आमंत्रणाकडे दुर्लक्ष करीत असतात. अनेकजण जागतिक मोहजाळात इतके गुरफटलेले व व्यस्त असतात की ते त्या आमंत्रणाला नकार देतात. काहीजण तर आमंत्रण स्वीकारतच नाही. तरी सुद्धा प्रभू त्यांना बोलावित असतो. शेवटी चव्हाट्यावर व रस्त्यावरील माणसांना बोलाविले जाते व ते सर्वजण मेजवानीत सहभागी होतात. तरी पण योग्य असा पोषाख नसलेला एक माणूस मंडपात शिरतो, मात्र त्याला हाकलून दिले जाते. प्रभू सर्वांना बोलावितो, तरीपण थोडक्यांनाच त्याच्या प्रीति भोजनाचा आस्वाद मिळतो.

जागतीक मोहजालात आणि दररोजच्या कामात भरपूर व्यस्त असल्यामुळे  आपल्याला त्याची वाणी ऐकू येत नाही. विशेषतः प्रभू येशू त्याच्या सार्वकालीक जीवन देणाऱ्या प्रीति भोजनात सहभागी होण्यासाठी  दररोज बोलावित असतो. पवित्र मिस्सा बलिदानात सहभागी होऊन त्याच्या अमर्याद कृपेचा आपण अनुभव घेऊ या.

✝️             

पहिले वाचन : शास्ते ११:२९-३९

वाचक :शास्ते या पुस्तकातून घेतलेले वाचन

"माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा येईल, त्याचे मी हवन करीन." 
इफ्ताहवर परमेश्वराचा आत्मा उतरला आणि इफ्ताह, गिलाद आणि मनश्शे ह्या प्रदेशातून कूच करून गिलादी मिस्पा येथून अम्मोनी लोकांवर चालून गेला. इफ्ताहने परमेश्वराला असा नवस केला की, “तू खात्रीने अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलेस तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो कोणी माझे स्वागत करण्यास मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन.” मग अम्मोनी लोकांशी युद्ध करावयाला इफ्ताह त्यांच्यावर चालून गेला आणि परमेश्वराने त्यांना त्याच्या हाती दिले. अरोएरपासून मित्रीथपर्यंतच्या वीस नगरात आणि पुढे आबेल करामीमपर्यंत त्याने त्यांची मोठी कत्तल उडवून त्याचा मोड केला. अशा प्रकारे इस्राएल लोकांनी अम्मोनी लोकांचा नक्षा उतरवला.

इफ्ताह मिस्पा येथे आपल्या घरी आला तेव्हा त्याची मुलगी डफ वाजवीत आणि नाचत त्याला सामोरी आली. ती त्याची एकुलती एक मुलगी होती, तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा अथवा मुलगी नव्हती. तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून तो म्हणाला, "हाय! हाय! मुली, तू माझे मन खचविले आहेस. तू माझ्यावर मोठे संकट आणले आहेस. परमेश्वराला मी शब्द दिला आहे, आता मला माघार घेता येत नाही." ती त्याला म्हणाली, "बाबा, परमेश्वराला तुम्ही शब्द दिला आहे तेव्हा तुमच्या तोंडून निघालेल्या शब्दाप्रमाणे माझ्या बाबतीत करा, कारण परमेश्वराने तुमचे शत्रू जे अम्मोनी लोक त्यांचा सूड तुमच्या वतीने घेतला आहे." ती आपल्या बापाला पुढे म्हणाली, "मात्र माझ्याकरिता एवढे करा. मला दोन महिन्यांचा अवधी द्या म्हणजे मी माझ्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरातून फिरत मला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करीन." तो म्हणाला, "जा आणि त्याने तिला दोन महिन्यांकरिता पाठवून दिले. मग ती आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरावर फिरत आपल्याला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करत राहिली. दोन महिन्यांनंतर ती आपल्या बापाकडे परतली. तेव्हा नवस केल्याप्रमाणे त्याने तिथे हवन केले.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र   ४०:५,७-१०

प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी आलो आहे.

१ )जो माणूस परमेश्वराला आपला भावविषय करतो, 
गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या 
वाऱ्याला उभा राहत नाही तो धन्य! 

२) यज्ञपशू आणि अन्नार्पण ह्यात तुला संतोष नाही. 
तू माझे कान उघडले आहेत. 
होम आणि पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. 
ह्यावरून मी म्हणालो, पहा, मी आलो आहे. की,

३) ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे 
हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात 
मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.

४) महामंडळात मी नीतिमत्त्वाचे सुवृत्त सांगितले. 
हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया ! 
हे परमेश्वरा आपला मार्ग मला दाखव मला सरळ मार्गाने ने.
 आलेलुया!


शुभवर्तमान मत्तय २२:१-१४

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"जितके तुम्हांला आढळतील तितक्यांला लग्नाच्या मेजवानीस बोलवा. "

मुख्य याजक आणि वडीलजन यांच्याशी दाखले देऊन येशू बोलू लागला : “स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाच्या मेजवानी दिली आणि त्या लग्नाच्या मेजवानीचे ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठवले. परंतु ते येईनात पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले आणि त्यांना म्हटले की आमंत्रितांना असे सांग, 'पाहा, मी जेवण तयार केले आहे,माझे बैल आणि पुष्ट पशू कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीला चला.' तरी हे मनावर न घेता कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला आणि त्यांना जिवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला आणि त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासांना म्हणाला, “लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चवाठ्यांवर जाऊन जितके तुम्हांला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा." मग त्या दासांनी रस्त्यांवर जाऊन बरेवाईट असे जितके त्यांना आढळले त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप जेवणाऱ्यांनी भरून गेला."

"मग राजा जेवणाऱ्यांना पाहायला आत आला, तेव्हा लग्नाचा पोषाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोषाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांस सांगितले, ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडेच आहेत."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:आजच्या शुभवर्तमानात येशू दाखला देऊन सांगतो की, स्वर्गाचा राजा लग्नाची मेजवानी देतो. तो आपल्या दासांस आमंत्रण करावयास पाठवितो. प्रथम यहुदी, जे देवाचे निवडलेले लोक होते, त्यांना आमंत्रण देतो. पण ते येत नाहीत. मग परराष्ट्रीयांस आमंत्रण देतो तेही येत नाहीत. आपणसुद्धा असेच वागतो. देव आपणास बोलावत आहे पण आपण त्याकडे दुर्लक्ष करून ऐहिक सुखाच्या मागे लागतो. अनेक कारणे पुढे करतो. आपले घर, कुटुंब, संपत्ती, इतर कामे ह्यामध्ये आपण मग्न असतो. आध्यात्मिक जीवन सुद्धा आहे, ह्या जीवनाशी आपण बांधिल आहोत हे आपण विसरतो व क्षणभंगूर सुखाच्या मागे लागतो. स्वर्गराज्य हीच आपली खरी संपत्ती आहे. ह्याचा आपणास विसर पडतो. शेवटी दीन-दुबळे, गरजवंत, भुकेले, तहानलेले, अडलेले, नडलेले अशाना देव बोलावतो. स्वर्गाचे राज्य त्याचे आहे. आपण ऐहिक जीवनातील काही वेळ आध्यात्मिक जीवनासाठी देऊन, पश्चात्ताप करून शुद्ध अंतःकरणाने, साक्रामेंताच्या पेटीत असलेल्या येशूच्या जेवणावळीस येणार ना ? तो तर आपणास दर दिवस बोलावत आहे.

प्रार्थना:हे प्रभू येशू, तुझ्या स्वर्गीय मेजवानीत योग्यप्रकारे सहभागी होण्यास आम्हाला, प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या