Marathi Bible Reading | Wednesday 18th August 2021 | 20th week in ordinary Time

        सामान्य काळातील 

विसावा सप्ताह 

बुधवार 

१८ ऑगस्ट २०२१

"जे योग्य ते मी तुम्हाला देईन.”


संत हेलेना

सम्राज्ञी (--- २५०-३३०)

कॉन्स्टॅन्टाईन द ग्रेट ह्या सम्राटची माता हेलेना ही पूर्वी बिथानिया येथल्या उतारशाळेची प्रमुख होती. अत्यंत नम्र वृत्तीची असलेल्या या स्त्रीच्या जीवनात आर्मी ऑफिसर असलेला कॉन्स्टॅन्शिअस हा अधिकारी आला आणि तिचे जीवन पूर्णपणे बदलून गेले.

मात्र वीस वर्षानंतर कॉन्स्टॅन्शिअस ह्याने राज्यपदावर असताना तिला घटस्फोट दिला आणि केवळ राजकीय कारणास्तव तिला टाकून दिले. परंतु पुढे कॉन्स्टॅन्टाईन द ग्रेट हा तिचा मुलगा जेव्हा वडिलांच्या जागेवर आला तेव्हा तो आपल्या आईशी एकनिष्ठ राहिला आणि त्याने तिला मोठ्या सन्मानाची वागणूक दिली.

इ. स. ३१३ साली कॉन्स्टॅन्टाईन राजाने मॅक्सेन्शिअसवर विजय मिळविला आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्याच्याबरोबर राजमाता हेलेना हिने देखील ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. तिची नम्र आणि सौजन्यशील आणि तितकीच अधिकारवाणीने युक्त असलेली प्रतिमा ख्रिस्ती श्रद्धा पसरविण्यास सहाय्यभूत ठरली.

आपल्या ऐश्वर्याचा व दानशूरवृत्तीचा वापर करून राणी हेलेना हिने युरोपभर अनेक ख्रिस्तमंदिरांची उभारणी केली, शेवटी वयाच्या ७५ व्या वर्षी तिने पवित्र नगरी जेरूसलेमची यात्रा सुरू केली. तिथे गेल्यावर येरूशलेमनजीक 'स्वर्गारोहणाचा पर्वत म्हटलेल्या ठिकाणी आणि बेथलेहेम गोठ्याच्या गुहेजवळ अशी दोन चर्चेस बांधली. '

रोममध्ये तिने आपल्या राजमहालाचे रूपांतर एका भव्य ख्रिस्तमंदिरात केले. आजही त्या मंदिरात ख्रिस्ताला ज्या क्रुसावर ठार मारण्यात आले तो क्रूस व पिलाताचा लेख ठेवण्यात आलेला आहे. संत हेलेना ही सुई व खिळे तयार करणाऱ्यांची आश्रयदाती संत मानली गेलेली आहे.

                                -------------

परमेश्वर सृष्टीचा आणि माणसांचा निर्माता आहे व आपल्या निर्मितीची तो काळजी घेत असतो. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जिवाची त्या विधात्याला  काळजी आहे. जन्माला येणारा प्रत्येक माणूस देवाला महत्वाचा आहे व प्रत्येकासाठी त्याची विशिष्ठ योजना तयार केलेली आहे..

प्रभू येशू द्राक्षमळ्याच्या मालकाचा दाखला देऊन देवाची उदारता आपल्याला स्पष्ट करुन देत आहे. परमेश्वराठायी कोणताच भेदभाव किंवा दुजाभाव नाही. गरीब श्रीमंत, लहान-मोठा, उच्च-नीच न पाहता देव सर्वांना समानतेने ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे पुरवठा करीत असतो. अनेकदा जीवनात आपण कूरकूर करीत असतो. अनेकवेळा खूप प्रयत्न करुन सुद्धा अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. परमेश्वराचे मार्ग व योजना आपल्या बुद्धी आकलना पलिकडच्या असतात, म्हणूनच प्रभू म्हणत आहे. 'जे  योग्य ते मी तुम्हाला देईन.' 

आपण सर्वजण देवाप्रमाणे, उदार असावे, कूरकूर न करता आपल्या वाट्याला आलेले ते सर्व स्वीकारावे आणि शेवटी स्वर्गराज्याचे वारसदार बनण्यास पात्र असावे म्हणून देवावरील विश्वास मजबूत बनवू या. 

✝️             

पहिले वाचन : शास्ते ९:६-१५

वाचक :शास्ते या पुस्तकातून घेतलेले वाचन

"तुम्ही म्हणालात की, एखाद्या राजाने आमच्यावर राज्य करावे; परंतु तुमचा राजा तर परमेश्वर आहे."

शखेमातील सर्व प्रमुख नागरिक आणि बेथ-मिल्लो येथील सर्व लोक एकत्र झाले आणि त्यांनी शखेमच्या स्तंभाजवळील मोठ्या वृक्षापाशी अबीमलेखला राजा केले.
हे वर्तमान ऐकून योथाम हा गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर गेला आणि उभा राहून मोठ्याने म्हणाला, "शखेमकरांनो, माझे ऐका, म्हणजे देव तुमचे ऐकेल. एकदा झाडे कोणाला तरी अभिषेक करून आपणावर राजा नेमावे म्हणून निघाली. ती जैतुनाकडे जाऊन म्हणाली, 'तू आमच्यावर राज्य कर.' जैतुन त्यांना म्हणाला, 'जिच्या योगाने देवांचा आणि माणसांचा सन्मान होतो ती माझी स्निग्धता देण्याचे सोडून झाडांसमोर हालत डोलत राहू का ?' मग झाडे अंजिराला म्हणाली, “चल, तू आमच्यावर राज्य कर. अंजीर त्यांना म्हणाला, "मी आपले माधुर्य आणि उत्तम फळे देण्याचे सोडून झाडांसमोर हालत डोलत राहू का ?" मग झाडे द्राक्षवेलीकडे जाऊन म्हणाली, "चल, तू आमच्यावर राज्य कर." द्राक्षवेली म्हणाली, "देवांना आणि मानवाला संतुष्ट करणारा माझा रस देण्याचे सोडून मी झाडांसमोर हालत डोलत राहू का ?" तेव्हा ती सर्व झाडे काटेरी झुडपाला म्हणाली, “चल, तू आमच्यावर राज्य कर.” ते काटेरी झुडूप झाडांना म्हणाले, “तुम्ही खरोखर मला अभिषेक करून आपणावर नेमणार असला तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या, नाहीतर काटेरी झुडपातून अग्नी निघून तो लबानोनचे गंधसरू भस्म करील."

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र   २०:२-७

प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो.

१ ) हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो. 
तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्हास होतो! 
त्यांच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाहीस.

२) कल्याणदायी वरदाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस, 
तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालतोस, 
त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले, 
तू त्याला युगानुयुगाचे दीर्घ आयुष्य दिलेस.

३) तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचा मोठा गौरव होतो. 
तू त्याला प्रताप आणि महिमा ह्यांनी भूषित करतोस, 
त्याने सर्वकाळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करतोस. 
तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करतोस.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया ! 
माझ्या देवा, तुझा पथ मला प्रकट कर, तू आपल्या सत्पथाने मला चालव.
 आलेलुया!


शुभवर्तमान मत्तय २०:१-१६

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत का सलते ?"

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “स्वर्गाचे राज्य कोणा एका घरधन्यासारखे आहे, तो आपल्या द्राक्षमळयात मोलाने कामकरी लावावयास मोठ्या पहाटेस बाहेर गेला आणि त्याने कामकऱ्यांना रोजचा शेकेल ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. मग तो तिसऱ्या तासाच्या सुमाराला बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हांला देईन आणि ते गेले." पुन्हा सहाव्या आणि नवव्या तासाच्या सुमाराला त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग अकराव्या तासाच्या सुमाराला तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, “तुम्ही संबंध दिवस तेथे रिकामे का उभे राहिले आहा?" ते त्याला म्हणाले, “आम्हांला कोणी कामावर घेतले नाही म्हणून." त्याने त्यांना म्हटले, “तुम्हीही द्राक्षमळ्यात जा." मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, "कामकऱ्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे." तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना एकेक शेकेल मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरी त्यांनाही एकेक शेकेल मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरूद्ध कुरकुर करत म्हटले, “ह्या शेवटल्यांनी एकच तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातान्हांत कष्ट केले आणि आम्हाला आणि त्यांना आपण सारखे लेखले." तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, "गड्या मी तुझ्यावर अन्याय करीत नाही. तू माझ्याबरोबर शेकेलचा ठराव केला की नाही? तू आपला शेकेल घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करायला मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय? ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होतील.".

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: देवाचा मार्ग आपला मार्ग नाही. देवाचा न्याय आपला न्याय नाही. देव सर्वांना समानतेने वागवितो. देव जेव्हा आपणास देतो तेव्हा आपण किती लायक आहोत हे पाहात नाही तर आपली गरज किती आहे ते पाहतो. आजच्या शुभवर्तमानात द्राक्षमळ्याचा धनी भल्या पहाटे बाहेर जाऊन प्रत्येकी एक रुपया प्रमाणे कामगार मळ्यात पाठवितो. मग तिसऱ्या तासाला, सहाव्या तासाला, अकराव्या तासाला आणखी कामगार पाठवितो. संध्याकाळी सर्वांना सारखाच पगार देतो. तेव्हा सकाळी लवकर आलेले कामगार धन्याविरुद्ध कुरकुर करतात. वास्तविक पहाता शेवटच्यांना पहिल्या एवढेच पैसे देतो ह्यात मालकाचे औंदार्य व त्याचा चांगुलपणा दिसून येतो. देवाचे कार्य असेच असते. देव आपणास आपल्या गरजेपेक्षा जास्त देतो. आपण मात्र दुसऱ्याकडे पाहून तुलना करतो व कुरकुर करतो. देव आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करीत नाही. देवाच्या राज्यात कुणीही या, कधीही या सर्वांचे बक्षीस समान असते. देवाच्या चांगुलपणातून आपणा सर्वांना समान मिळते. आपली प्रवृत्ती कशी आहे ?

प्रार्थना:हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या विपूल कृपादानांबद्धल आम्ही तुझे आभार
मानतो, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या