सामान्य काळातील
विसावा सप्ताह
मंगळवार
१७ ऑगस्ट २०२१
संत हायसिंथ
वर्तनसाक्षी (१९८५-१२५७)
माणसांना हे अशक्य आहे, 'देवाला सर्व काहीं शक्य आहे'.
" याव्हे- शालोम (शांतिदाता परमेश्वर) ".
मिद्यान्यांच्या हातून इस्त्राएली जनतेला सोडविण्यासाठी परमेश्वराने गिदोनला पाचारण केले. परमेश्वराचे पाचारण स्वीकारण्यास गिदोनाने नकार दिला व शाश्वतीदाखल चिन्ह मागितले. परमेश्वराने त्याची निवड योग्य ठरविण्यासाठी गिदोनाला चिन्ह दिले. गिदोनाला जे कठीण वाटत होते ते देवाठायी शक्य झाले. देवाला स्वीकारणे शक्य आहे ह्याची प्रचिती आजच्या पहिल्या वाचनात दिसून येते.
'स्वर्गाच्या राज्यात धनवानांना प्रवेश होणे कठीण आहे,' ह्या वाक्याने शिष्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला. मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? ह्या प्रश्नाला उत्तर देताना प्रभू येशू म्हणत आहे, 'माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व काही शक्य आहे. आपल्या मनात सुद्धा तारणाविषयी व स्वर्गराज्या विषयी संभ्रम असू शकतो मात्र प्रभू येशूठायी सर्वकाही शक्य आहे. आजचा दुसरा प्रश्न शिष्यांनी प्रभूला विचारला की आम्ही सर्व काहीं सोडून आपल्यामागे आलो आहेत, आमचे काय? त्यावेळी प्रभू येशू म्हणाले की, 'ज्या कोणी घरे, भाऊ-बहिणी, बाप-आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडली आहेत त्यांना अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल'.
सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून आपण प्रभू येशूने दिलीली त्याग, समर्पण, प्रेम व परोपकाराची शिकवण आचरणात आणणे गरजेचे आहे. प्रभूठायी आपल्याला सर्व शक्य आहे. प्रभूच्या प्रेरणेने आपण देवराज्याच्या दिशेने वाटचाल करु या.
पहिले वाचन : शास्ते ६:११-२४
वाचक :शास्ते या पुस्तकातून घेतलेले वाचन
"गिदोन, इस्त्राएलला मिद्यान्यांच्या हातून सोडव, मी तुला पाठवले आहे."
परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योबाश अबियेजरी ह्याच्या एला वृक्षाखाली बसला. त्या वेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यान्यांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करीत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, "हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे." गिदोन त्याला म्हणाला, “महाराज, परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हाला इजिप्तमधून बाहेर नाही का आणले, असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे.” तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, “तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्राएलला मिद्यान्यांच्या हातून सोडव, मी तुला पाठवले आहे." तो त्याला म्हणाला, “प्रभो इस्राएलला मी कसा सोडवणार? माझे कुळ मनश्शे वंशात सर्वात दुर्बळ आहे, तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे." परमेश्वर त्याला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर निश्चित असेन. जसे एका माणसाला मारावे तसे एकजात साऱ्या मिद्यान्यांना तू मारशील." तो त्याला म्हणाला, "तुझा माझ्यावर प्रसाद झाला असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस ह्याचे मला काही चिन्ह दाखव. मी आपले अर्पण आणून तुझ्यासमोर सादर करीपर्यंत कृपया येथून जाऊ नकोस." तो म्हणाला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबेन."
गिदोनने आत जाऊन एक करडू सिद्ध केले आणि एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी केल्या, त्याने मांस टोपलीत घालून आणि रसा पातेल्यात घालून ते एका वृक्षाखाली आणूण त्याला सादर केले. तेव्हा देवाचा दूत त्याला म्हणाला, "मांस आणि बेखमीर भाकरी घेऊन ह्या खडकावर ठेव आणि त्यावर रसा ओत." त्याप्रमाणे त्याने केले. मग परमेश्वराच्या दूताने आपला हात पुढे करून हातातल्या काठीच्या टोकाने त्या मांसाला आणि बेखमीर भाकरींना स्पर्श केला तेव्हा खडकातून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस आणि त्या बेखमीर भाकरी भस्म केल्या, ह्यानंतर परमेश्वराचा दूत त्याच्यापुढून अंतर्धान पावला. हा परमेश्वराचा दूत होता हे गिदोनच्या लक्षात आले तेव्हा तो म्हणाला, "हाय, हाय, हे प्रभो परमेश्वरा! खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे.” परमेश्वर त्याला म्हणाला, “तुला शांती असो. भिऊ नकोस, तू मरणार नाहीस." मग गिदोनने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली आणि तिचे नाव याव्हे- शालोम (शांतिदाता परमेश्वर) असे ठेवले.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८५:९, ११-१४
प्रतिसाद : परमेश्वर आपल्या लोकांशी शांतीबद्दल बोलेल.
१) परमेश्वर देव जे काही बोलेल ते मी ऐकून घेईन
कारण तो आपल्या लोकांशी
आणि आपल्या भक्तांशी शांतीबद्दल बोलेल,
मात्र त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये.
२) दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत,
नीती व शांती ह्यांचे मीलन झाले आहे.
पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे.
स्वर्गातून नीतिमत्त्व अवलोकन करत आहे.
३) जे उत्तम ते परमेश्वर देईल,
आणि आमची भूमी, आपले फळ देईल.
त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल
आणि त्याची पावले इतरांना मार्गदर्शन होतील.
हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात.
शुभवर्तमान मत्तय १९:२३-३०
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला नक्की सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे." हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?" येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, "माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे." तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, "पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहो. तर आम्हांला काय मिळणार?" येशूने त्याला म्हटले, "मी तुम्हांला नक्की सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीही बारा राजासनांवर बसून इस्राएलच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले, किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडली आहेत त्यांना ते अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळजणांचे होईल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आज येशू म्हणतो, “धनवानांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे कठीण आहे.' माणसाकडे संपत्ती यायला लागली की मनुष्य लालची बनतो. अधिकाधिक संपत्ती मिळावी म्हणून बऱ्या वाईट गोष्टींचा उपयोग करतो. त्याच्या अंगी गर्विष्ठपणा संचारतो. गरिबांना तुच्छ मानतो. हळूहळ देवापासून दूर जातो. पण त्याने आपले विचार बदलले तर? गरिबांचा उद्धार, विधवांचा कैवार, भुकेल्यांस अन्न, उघड्यांना वस्त्र अशाप्रकारे गरजवंतांची केलेली सेवा फार मोठा बदल घडवू शकते. येशू म्हणाला आहे, “मला यज्ञ नको दया पाहिजे.” हा दयेचा मंत्र जो आचरणात आणतो तो येशूच्या जवळ येतो. “माणसांनी आपले विचार बदलले तर देवसुद्धा आपली योजना बदलतो.” धनवानांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश सुलभ होईल. हे देवाला शक्य आहे. पुढे येशू आपल्या शिष्यांना अभिवचन देतो की, “मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा तुम्हीही बारा राजासनावर बसून इस्रायलाच्या बारा वंशाचा न्याय निवाडा कराल” ह्यापेक्षा महान प्रतिफळ कोणते ?
प्रार्थना:हे प्रभू येशू, तुझ्या वचनांचे चिंतन करुन तुझ्या शिकवणुकी प्रमाणे आचरण करण्याच आम्हाला प्रेरणा दे, आमेन !
0 टिप्पण्या