Marathi Bible Reading | Monday16th August 2021 | 20th week in ordinary Time

       सामान्य काळातील 

विसावा सप्ताह 

सोमवार 

१६ ऑगस्ट २०२१


हंगेरीचे संत स्टीफन

- राजा, वर्तनसाक्षी (९६९-१०३८) 

चल, माझ्या मागे ये."

देवाची आज्ञा न पाळता अन्य देवातांची सेवा करुन इस्त्राएली लोकांनी भ्रष्टतेचा मार्ग अवलंबिला. तरी सुद्धा देवाने शास्ते पाठवून इस्त्राएली जनतेला संरक्षण दिले. परमेश्वराच्या आज्ञा पालनामुळेच त्याची अनुकंपा जाणवते व कृपा अनुभवावयास मिळते. देव प्रीति आहे, म्हणूनच भरकटेल्या इस्त्राएली जनतेला देवाने वेळोवेळी सन्मार्गावर आणले.

आजच्या शुभवर्तमानातील तरुण नियमशास्त्रातील देवाच्या आज्ञांचे पालन करणारा जिज्ञासु माणूस होता. सार्वकालिक जीवनाची प्राप्ती आपणास व्हावी अशी त्या तरुणाची इच्छा होती; मात्र एका गोष्टीची उणीव त्याच्या मध्ये होती. कारण तो  आत्मत्याग करुन शेजाऱ्यांवर प्रीति करावयास तयार नव्हता. परमेश्वर प्रीतिआणि परस्पर प्रीतिची आज्ञा पाळण्यास प्रभू येशूने आपल्या सर्वांना आज्ञापिले आहे. विशेषरितीने प्रभूने आपल्या सर्वांना त्याचे अनुकरण करण्यासाठी आवाहन केले आहे. येशूच्या मागे जाणे म्हणजे त्याच्या वचनाप्रमाणे जीवन  जगणे. आपल्या प्रमाणेच आपण इतरांसाठी त्याग करायला शिकणे.

श्रीमंती ही स्वर्गराज्यासाठी आडकाठी बनू शकते. श्रीमंत तरुण त्याग करायला तयार नव्हता. आज आपण आपल्या जीवनावर चिंतन करु या. देवाच्या आज्ञा पाळण्यास आडकाठी बनणाऱ्या कोणत्या गोष्टी आपण सोडायला तयार नाहीत. प्रभूच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास कोणत्या स्वार्थी गोष्टींना आपण चिकटून राहतो.देवासाठी, स्वत:साठी तसेच इतरांसाठी सुद्धा आपल्याला जगता यावे म्हणून आत्मत्याग व सेवा करण्यासाठी प्रेरणा मागू या.

✝️             

पहिले वाचन : शास्ते २:११-१९

वाचक :शास्ते या पुस्तकातून घेतलेले वाचन

"परमेश्वर शास्ते उभे करी, पण लोक त्यांचे ऐकत नसत. "

इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाइट ते करीन बआल देवाची सेवा करू लागले. आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला आणि अन्य देवाच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रांतील देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागले आणि यामुळे त्यांनी परमेश्वराला राग आणावा. परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल आणि अष्टरोथ ह्यांची सेवा केली. म्हणून इस्राएलवर परमेश्वराचा कोप भडकला,त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांला लुटले. त्याने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले. म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना. परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे जेथे ते कूच करीत तेथे तेथे त्यांच्यावर परमेश्वराचा कोप होऊन त्याचे अहित होई आणि ते फार संकटात पडत.
मग परमेश्वर शास्ते उभे करी आणि ते त्यांना लुटणाऱ्यांच्या हातून सोडवीत. तरी ते आपल्या शास्त्यांचे ऐकत नसत, ते व्यभिचारी बुद्धीने अन्य देवाच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागत. त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळून चोखाळलेला मार्ग त्यांनी त्वरित सोडून दिला आणि आपल्या पूर्वजांचे अनुकरण केले नाही. जेव्हा जेव्हा परमेश्वर त्यांच्यासाठी शांस्ते उभे करी तेव्हा तेव्हा त्या प्रत्येकाबरोबर परमेश्वर असे आणि त्या शास्त्यांच्या हयातीत तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावीत असे. कारण त्यांच्यावर लोक जुलूम करीत आणि त्यांना गांजीत, ह्यामुळे ते कण्हत असत, म्हणून परमेश्वराला त्यांची कीव येई तरी पण शास्ता मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करीत आणि त्यांच्या चरणी लागून आपल्या वाडवडिलांपेक्षा अधिक बिघडत, ते आपला दुराचार आणि दुराग्रह सोडीत नसत.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र   १०६:३४-३७, ३९-४०.४३,४४

प्रतिसाद :  परमेश्वरा, तू माझी आठवण कर.

१) परमेश्वराच्या आज्ञेचे त्यांनी उल्लंघन केले. 
म्हणजे त्यांनी इतर राष्ट्रांचा विध्वंस केला नाही.
 तर ते त्या राष्ट्रांत मिसळले आणि त्यांचे आचार शिकले.

२ )त्यांनी त्यांच्या मूर्तीची पूजा केली,
 त्या त्यांना शापरूपी झाल्या, 
त्यांनी आपले पुत्र आणि कन्या ह्यांचे बळी भुतांना दिले.

३ )ते आपल्या कृत्यांनी भ्रष्ट झाले,
ते आपल्या कृतींनी अनाचारी बनले, 
त्यामुळे परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला, 
त्याला आपल्या वतनाचा वीट आला. 

४ )अनेक वेळा त्याने त्यांना मुक्त केले 
तरी ते आपला हेका न सोडता बंडखोरच राहिले, 
तथापि त्यांची आरोळी ऐकून परमेश्वराने 
त्यांच्या संकटांकडे दृष्टी लावली.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया ! 
हे परमेश्वरा, बोल तुझा दास ऐकत आहे,
 सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
 आलेलुया!


शुभवर्तमान मत्तय १९:१६-२२

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तूझे असेल नसेल ते विकून गरिबांना दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल."

एकजण येऊन येशूला म्हणाला, “गुरुजी मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे ?” तो त्याला म्हणाला, "मला चांगल्याविषयी का विचारतोस ? चांगला असा एकच आहे. तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ." तो त्याला म्हणाला, “कोणत्या?” येशू म्हणाला, “खून करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजांच्यावर प्रीती कर." तो तरूण त्याला म्हणाला, “मी हे सर्व पाळले आहे, माझ्या ठायी अजून काय उणे आहे ?” येशू त्याला म्हणाला, “पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून गरिबांना दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये." पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता बरीच होती.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन आजच्या शुभवर्तमानात येशू तरुणाला म्हणाला, "तुझे असेल नसेल ते सर्व विकून गरिबांना वाट आणि माझ्यामागे ये.” येशूचे हे शब्द ऐकून तो तरुण निघून गेला. मनुष्य काबाडकष्ट करतो, प्रसंगी उपाशी राहतो व संपत्ती मिळवतो. त्या संपत्तीवर त्याचे प्रेम असते. म्हणून माणूस स्वार्थी झाला. ह्या जगात कुणी गरीब आहे, कुणी गरजवंत आहे, त्याला आपल्या मदतीची आवश्यकता आहे, आपण ह्या समाजाशी बांधिल आहोत अशा सेवेच्या गोष्टी विसरून गेला आहे. येशू म्हणतो, “तुम्ही ह्या जगातील नाशवंत संपत्तीसाठी झटू नका, तर स्वर्गातील अविनाशी संपत्तीसाठी झटा.” येशूचे बारा शिष्य आपले सर्वस्व सोडून येशूच्या मागे गेले. अनेक संत आपली संपत्ती गरिबांना वाटून येशूच्या मागे गेले. अनेकांनी येशूसाठी स्वतःचा प्राणसुद्धा त्याग केला आहे. जे जे आपले सर्वस्व सोडून येशूच्या मागे गेले ते आज येशू बरोबर स्वर्गीय नंदनवनात अविनाशी जीवन जगत आहेत. आपण कुणाच्या मागे जाणार ?

प्रार्थना:  हे प्रभू येशू, त्याग करुन प्रीतिची आज्ञा पाळण्यास व तुला अनुसरण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या