सामान्य काळातील
विसावा रविवार
१५ ऑगस्ट २०२१
"स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य!
पवित्र मरियेचे स्वर्गनयन
व स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ख्रिस्तसभा आज धन्य कुमारी मरियेच्या स्वर्ग नयनाचा (Assumption) सण साजरा करीत आहे.
'ग्लोरीज ऑफ मेरी' या आपल्या आध्यात्मिक साहित्यकृतीत संत अल्फान्सोस लिगरी ह्यांनी पवित्र मरियेच्या स्वर्गनयन रहस्याविषयी पुढील उद्गार काढलेले आहेत : 'मरण हे पापाचे वेतन असल्यामुळे वास्तविक पवित्र मरियेला देवाने मरणाच्या अनुभवापासून दूर ठेवायला पाहिजे होते. परंतु पवित्र मरियेने सर्व बाबतीत आपल्या प्रभू येशू ख्रिस्तासारखे असावे अशी खुद्द देवाची इच्छा असावी, मात्र पवित्र मरियेला मरणाची कटुता जाणवली नाही तर तिला अत्यंत सुखाचे मरण आले.'
मानवाला मरणाची कटुता वा भय तीन गोष्टींमुळे वाटते. या जगाविषयी आसक्ती, आपल्या पापांविषयी भीतीची भावना आणि स्वतःच्या तारणाविषयी शंकित वृत्ती! पवित्र मरियेचे जीवन मात्र ह्या तिन्ही गोष्टींपासून मुक्त होते. या जगातल्या कुठल्याही ऐहिक सुखाविषयी तिच्या मनात आसक्ती नव्हती. ती तर पूर्णपणे देवाशी एकरूप झालेली होती. ती मूळ पापावाचून संभवलेली असल्यामुळे तिला कोणत्याही पापाविषयी अपराधीपणाची भावना असणे अशक्य होते आणि शेवटी ती देवाच्या कृपेने पुरेपूर भरलेली असल्यामुळे आपल्या तारणाविषयी ती निश्चित होती.
'मरणाद्वारे आपण आपल्या प्रभूशी एकरूप होणार असल्यामुळे मरणाविषयी तिच्या मनात यत्किंचितही भय नव्हते. ती कोणत्याही प्रकारच्या आजारामुळे मरण पावली नाही तर केवळ देवावरील तिचे प्रेम तिला देवाजवळ घेऊन गेले.' असे अनेक धर्मपंडितांचे मत आहे.
'येशूच्या स्वर्गारोहणानंतर पवित्र मरिया येशूचा जिवलग शिष्य योहान ह्याच्या घरी राहिली (योहान १९:२७). येशूचे शिष्य तिच्या संपर्कात होते. तिने त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. क्रेतचे संत ॲण्ड्रयू आणि संत जॉन दमासिनसारखे अभ्यासू ख्रिस्तीजन म्हणतात की, 'पवित्र मरियेचा मृत्यूसमय जवळ आला तेव्हा सर्व शिष्य चमत्कारिकरित्या तिच्या मृत्यूशय्येभोवती गोळा झाले.' मरिया त्यांना म्हणाली, “मी तुम्हाला अनाथ असे सोडून जात नाही, स्वर्गामध्ये देवाजवळ मी तुमच्यासाठी मध्यस्थी करीत राहीन.”'पवित्र मरियेने देवावर सर्व देवदूतांनी केलेल्या प्रेमाहून अधिक प्रेम केलेले असल्यामुळे देवाने तिला त्यांच्याहून उंच केले आणि आपल्या राज्यात सामावून घेतले.' ट्रेंटची विश्वपरिषद म्हणते त्याप्रमाणे, 'पवित्र मरियेने कुठलेही पाप केले नाही तिने कुठलीही कृपा गमावली नाही किंवा आपल्याला मिळालेली ईश्वरी कृपादाने वाईट कारणासाठी वापरली नाहीत अथवा तशीच ठेवून दिली नाहीत.' संतांमध्ये प्रत्येकाला विशिष्ट कृपादाने देण्यात आलेली होती. मरिया मात्र सर्व कृपादानांनी भरलेली होती. सर्व संतांची सर्व कृपादाने पवित्र मरियेठायी एकवटलेली होती म्हणून ती 'सर्व पवित्रांची राणी' म्हणून गौरविली आहे.
शेवटी संत अल्फान्सोस लिगरी म्हणतात, 'आता पवित्र मरिया देवाच्या स्वर्गीय राज्यात आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे सहाय्य करण्यासाठी तयार असल्यामुळे आपण देवाचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.'
पवित्र मरिया नक्की कोणत्या ठिकाणी (जेरुसलेम की एफसस) मरण) पावली ह्याविषयी धर्मपंडितांमध्ये एकवाक्यता नाही तसेच नक्की कधी मरण पावली (येशूच्या स्वर्गारोहणानंतर ३ वर्षांनी? १५ वर्षांनी?) तेही निश्चित नाही. कारण तसा ऐतिहासिक पुरावा नाही.
तिच्या स्वर्गनयनाचा सण पोप पायस बारावे ह्यांनी इ.स. १९५० साली घोषित केला. मात्र इ.स. ४५१ साली काल्सेदोन येथे भरलेल्या धर्मपरिषदेमध् 'पवित्र मरिया सदेह स्वर्गात घेतली गेली' ह्याची वाच्यता केली गेलेली होती.
पवित्र मरियेच्या गुणांचे अनुकरण आपल्याला करता यावे म्हणून तिच्या मध्यस्थीने आपण सर्वांसाठी प्रार्थना करु या.
शुभवर्तमान लूक १:३९-५६
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १:३९-५६
"सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत, त्याने दीनजनांस उंचावले आहे. "
मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावाला त्वरेने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलीशिबेला अभिवादन केले. अलीशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळाने हालचाल केली व अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठयाने बोलली, "स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून ? पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल.”
तेव्हा मरिया म्हणाली :
"माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा
त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे,
कारण त्याने आपल्या दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे.
पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील,
कारण सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत
आणि त्याचे नाव पवित्र आहे.
जे त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यान्पिढ्या असते.
त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे,
जे आपल्या अंत:करणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे.
त्याने अधिपतींना राजासनावरून ओढून काढले आहे आणि दीनजनांना उंचावले आहे,
त्याने भुकेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानांना रिकामे लावून दिले आहे.
आपल्या पूर्वजांना त्याने सांगितले त्याप्रमाणे आब्राहाम आणि त्याचे संतान ह्यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला सहाय्य केले आहे.
नंतर मरिया सुमारे तीन महिने अलीशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली.

0 टिप्पण्या