सामान्य काळातील
एकोणिसावा सप्ताह
शनिवार
१४ ऑगस्ट २०२१
"बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे."
संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे
धर्मगुरू, रक्तसाक्षी (१८९४-१९४१)
मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे ह्यांचा जन्म पोलंड देशात ८ जाने. १८९४ रोजी झाला. आपल्या तारुण्यावस्थेतच तो 'फ्रायर्स मायनर कन्व्हेंच्युयल्स' नावाच्या एका व्रतस्थ धार्मिक संस्थेत दाखल झाला आणि इ.स. १९१८ साली रोम शहरात त्याला धर्मगुरुपदाची दीक्षा देण्यात आली.
फा. मॅक्सिमिलियन ह्यांचे धन्य कुमारी देवमाता मरिया हिच्यावर विशेष प्रेम होते. त्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या धर्मग्रामात 'निष्कलंक मरियेची फौज' (आर्मी ऑफ इमॅक्युलेट मेरी) नावाची संघटना सुरू केली. लवकरच या संघटनेचा प्रसार संपूर्ण पोलंड देशात आणि इतर देशांमध्ये झाला..
फा. मॅक्सिमिलियन पुढे जपान देशात मिशनरी म्हणून गेले तेथे त्यांनी धन्य कुमारी निष्कलंक मरिया हिच्या आश्रयाखाली आणि मार्गदर्शनाने ख्रिस्ती श्रद्धेचा प्रसार करण्यास सुरुवात केली. तेथून परतल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना 'कॉन्सेंट्रेशन कॅम्प'मध्ये बराच काळ पुष्कळ हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्याचवेळी एका प्रापंचिक गृहस्थाला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली होती. त्याला कुटुंब होते, बायकोमुले होती. फा. कोल्बे क्षणार्धात पुढे झाले. त्यांनी म्हटले, 'मी पोलंड देशातील एक कॅथलिक धर्मगुरू आहे. या माणसाला कुटुंब आहे. त्याला मुक्त करा. त्याच्या जागी मला ठार करा.' अशाप्रकारे आपल्या प्रभूच्या शिकवणुकीनुसार शेजारप्रीतीपायी त्यांनी आपला स्वतःचा प्राण दिला.
१४ ऑगस्ट १९४१ रोजी मरण पावलेल्या फा. मॅक्सिमिलियन कोल्बे ह्यांना पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी १० ऑक्टोबर १९८२ रोजी संतपदाचा बहुमान दिला.
चिंतन : जितक्या प्रमाणात आपण आत्म्याचे तारण करण्यासाठी धडपडू तितक्या प्रमाणात आपले पावित्र्य वाढत राहील. संत मॅक्सिमिलियन कोल्बे
पहिले वाचन : यहोशवा २४ :१४-२०
वाचक :यहोशवा या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा."
यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, “तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने आणि खऱ्या मनाने करा आणि महानदीपलीकडे आणि इजिप्त देशात ज्या देवाची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहा त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार."
तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो; कारण आमचा देव परमेश्वर ह्यानेच आम्हाला आणि आमच्या पूर्वजांना इजिप्त देशातून, दास्यगृहातून काढून आणले, त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला व ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे तेथे त्याने आमचे संरक्षण केले. ह्या देशात राहणाऱ्या अमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्यापुढून घालवून दिले. आम्हीही परमेश्वराचीच सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे."
यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची सेवा करणार नाही, कारण तो पवित्र देव आहे, तो ईर्ष्यावान देव आहे, तो तुमच्या अपराधांची आणि पापांची क्षमा करणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवांची सेवा कराल तर, जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील.” लोक यहोशवाला म्हणाले, “नाही, आम्ही परमेश्वराचीच सेवा करणार.” यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्ही सेवेसाठी परमेश्वराला निवडले आहे, ह्याविषयी तुमचे तुम्हीच साक्षी आहा.” ते म्हणाले, “आम्हीच साक्षी आहो." यहोशवा म्हणाला, “आपल्यामधले परके देव तुम्ही टाकून द्या, आपले मन इस्राएलचा देव परमेश्वर ह्याच्याकडे लावा.” लोक यहोशवाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार.” तेव्हा यहोशवाने त्या लोकांबरोबर करार केला आणि शखेम येथे त्यांना विधी आणि नियम लावून दिले. ह्या गोष्टी यहोशवाने देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहून ठेवल्या आणि एक मोठी शिला घेऊन परमेश्वराच्या पवित्रस्थानाजवळील एका एला झाडाखाली ती उभी केली. यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, “पहा, ही शिला आपल्याविरूद्ध साक्षीदार होईल कारण परमेश्वराने आम्हांला सांगितलेली सर्व वचने हिने ऐकली आहेत; एखाद्या वेळी तुम्ही परमेश्वराला नाकाराल तेव्हा ही तुमच्याविरूद्ध साक्षीदार होईल.” मग यहोशवाने प्रत्येक माणसाला आपआपल्या वतनाकडे रवाना केले.
ह्या गोष्टी घडल्यानंतर परमेश्वराचा सेवक नूनचा मुलगा यहोशवा आपल्या वयाच्या एकशेदहाव्या वर्षी मरण पावला.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १६:१-२,५,७-८,११
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तूच माझा वाटा सांभाळणारा आहेस.
१) हे देवा, माझे रक्षण कर,
कारण मी तुझा आश्रय घेतला आहे.
मी परमेश्वराला म्हटले, “तूच माझा प्रभू आहेस."
परमेश्वर माझ्या वतनाचा आणि
प्याल्याचा वाटा आहे.
माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.
२) परमेश्वराने मला बोध केला आहे
त्याला मी धन्यवाद देतो,
माझे अंतर्यामही मला रात्री मार्गदर्शन शिक्षण देते.
मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे;
ती माझ्या उजवीकडे आहे,
म्हणून मी ढळणार नाही
३) जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील;
तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे.
तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहेत.
आलेलुया, आलेलुया !
आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथमफळ व्हावे, आलेलुया!
म्हणून पित्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला.
शुभवर्तमान मत्तय १९:१३-१५
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे."
येशूने बालकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. तेव्हा येशू म्हणाला, “बालकांना माझ्याकडे येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे." मग त्याच्यावर हात ठेवल्यानंतर तो तेथून निघून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आजच्या शुभवर्तमानात येशू म्हणतो, “स्वर्गाचे राज्य ह्या बालकांचे आहे.” लहान बालके निरागस असतात. त्यांचे अंतःकरण शुद्ध, निर्मळ व पवित्र असते. त्यांच्या मनात कुणाविषयी राग नसतो, हेवा नसतो, द्वेष नसतो की मत्सर नसतो. खलील जिब्रान म्हणतात, “तुमची मुले ही तुमची नाहीत. विधात्याने तुमच्याजवळ पालन पोषण करण्यासाठी दिलेली त्याची संपत्ती आहे.' जसे धनुष्य, जेवढे जास्त वाकवाल तसा त्याच्यातून सुटलेला बाण सुसाट वेगाने इच्छूक स्थळी पोहोचतो. तसेच तुम्ही जेवढे जास्तीत जास्त वाकाल म्हणजे श्रम कराल तेवढी आपली मुले बाणाच्या वेगाने स्वतःची प्रगती करतील. त्यांची निरागसता आपल्या अंगी रुजविण्याचा प्रयत्न करा. येशू उत्तम शिक्षक होता. मुलांना येशूची नीतिमूल्ये शिकवा. म्हणजे आपली मुले त्यांच्या जीवनात येशूच्या मार्गाने चालतील, ती येशूच्या अधिकाधिक जवळ येतील. ह्यातच येशूचा आनंद सामावलेला आहे, होय ना ?
प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझ्या स्वर्गाराज्याचे वारस बनण्यास आम्हामध्ये नम्रता, प्रामाणिकपणे, आज्ञाधारकपणा व शुद्धता वाढीस लाव, आमेन.
0 टिप्पण्या