Marathi Bible Reading | Friday 13th August 2021 | 19th Week in Ordinary Time

     सामान्य काळातील 

एकोणिसावा सप्ताह 

शुक्रवार 

१३ ऑगस्ट २०२१

"देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये." 


संत हिप्पोलिटस व पोन्तिआतुस

धर्मगुरू, रक्तसाक्षी व परमगुरु रक्तसाक्षी (२३५)

परमेश्वराने मानवाला पुरुष व स्त्री असे निर्माण करुन नवनिर्मितीचा अद्वित्तीय आशीर्वाद त्यांना दिला आहे. 'फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा' म्हणजेच नवनिर्मितीचा महान असा आशीर्वाद देत असतानाच, नर-नारी ऐक्याची, सहभागितेची आणि एकनिष्ठेची अप्रतिम योजना परमेश्वराने उभारली आहे.

प्रभू येशूने उत्पत्तीच्या पुस्तकातील संदर्भ देऊन स्पष्ट केले की, पती-पत्नी मधील ऐक्य हा देवाच्या प्रेमाचा आविष्कार आहे. पुरुष आणि स्त्री विवाह संस्काराने एकमेकांशी व देवाशी करार करतात व देवाचा आशीर्वाद त्यांना मिळतो. म्हणूनच प्रभू आठवण करुन देत आहे की, 'देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.' ऐक्य,अखंडत्व आणि मुलांना जन्म देणे व त्या मुलांचे श्रद्धासंवर्धन करणे हे विवाहाचे  प्रमुख घटक आहेत. सहभागिता व परस्पर प्रेमावर कौटुंबिक जीवन उभारलेले आहे. म्हणूनच ख्रिस्तसभा सुद्धा वैवाहिक जीवनाचे ऐक्य अबाधित  राहण्यासाठी घटस्फोट निषिद्ध ठरवते.

देवनिर्मितीचा वारसा चालू ठेवून पती-पत्नी दोघांनी देवप्रीतीच्या धाग्यातून परस्पर प्रीतीचे जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील असावे. सध्याच्या  परिस्थितीत अनेक विवाहित दांपत्ये शांतीने, प्रेमाने व समेटाने जीवन न जगता वेगळे होऊ इच्छित आहेत. चला सर्वांसाठी आज आपण विशेष प्रार्थना करुया. 

✝️             

पहिले वाचन : यहोशवा २४ :१-१३

वाचक :यहोशवा या पुस्तकातून घेतलेले वाचन

"तुमचा पिता आब्राहाम ह्याला नदीच्या पलीकडून मी आणले. मी तुम्हांला इजिप्त देशातून काढून आणले. मी तुम्हांला देशात आणले."

यहोशवाने इस्राएलच्या सर्व वंशांना शखेम येथे जमवले आणि इस्त्रायलचे वडीलजन, प्रमुख, न्यायाधीश आणि अमंलदार ह्यांना बोलावणे पाठवले आणि ते देवासमोर हजर झाले. तेव्हा यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, प्राचीन काळी तुमचे पूर्वज आब्राहाम आणि नाहोर ह्यांचा बाप तेरह फरात महानदीपलीकडे राहात आणि अन्य देवांची सेवा करीत. तुमचा पिता आब्राहाम ह्याला नदीच्या पलीकडून मी आणले, कनान देशभर फिरवले, त्याचा वंश बहुगुणित केला आणि त्याला इसहाक दिला. मग मी इसहाकला याकोब आणि एसाव दिले आणि एसावला सेईर डोंगर वतन करून दिला, याकोब आपल्या मुलाबाळांसह इजिप्त देशात गेला. नंतर मी मोशे आणि अहरोन ह्यांना पाठवून इजिप्त देशात जी कृत्ये केली त्या कृत्यांनी त्या देशाला पीडले. नंतर मी तुम्हाला बाहेर आणले. मी तुमच्या पूर्वजांना इजिप्त देशातून काढून आणले, मग तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहोचला आणि इजिप्तच्या लोकांनी रथ आणि स्वार ह्यासह तांबड्या समुद्रापर्यंत तुमच्या पूर्वजांचा पाठलाग केला. त्यांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने तुमच्या आणि इजिप्त वासियांच्या मध्ये अंधार पाडला आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना गडप केले; इजिप्त देशात मी जे काही केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. नंतर तुम्ही पुष्कळ दिवस रानात राहिला. मग मी तुम्हाला यार्देनच्या पूर्वेस राहणाऱ्या अमोरी लोकांच्या देशात आणले; ते तुमच्याशी लढले. मी त्यांना तुमच्या हाती दिले आणि तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला, तुमच्याकरिता मी त्यांचा संहार केला. नंतर मवाबचा राजा बालाक बिन सिप्पोर ह्याने इस्राएलशी युद्ध केले; तुम्हांला शाप देण्यासाठी त्याने बौरचा मुलगा बलाम ह्याला बोलावून घेतले; पण मी बलामचे ऐकायला तयार नव्हतो, म्हणून त्याने तुम्हांला उलट आशीर्वाद दिला; अशाप्रकारे मी तुम्हांला त्याच्या हातातून सोडवले. तुम्ही यार्देन नदी उतरून यरिहोत आला तेव्हा यरिहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, निर्गाशी, हिव्वी आणि यबूसी ह्यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले. मी तुमच्या आघाडीला गांधीलमाशा पाठविल्या आणि त्यांनी अमोऱ्यांचे दोन राजे तुमच्यापुढून हाकून दिले. मग जी जमीन तुम्ही कसली नाही, ती मी तुम्हांला दिली, जी नगरे तुम्ही बांधली नाहीत त्यात तुम्ही राहात आहा आणि जे द्राक्षांचे मळे आणि जैतुनांचे बाग तुम्ही लावले नाहीत त्यांचे उत्पन्न तुम्ही खात आहा."

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १३६:१-३,१६-१८,२१,२२,२४

प्रतिसाद :  परमेश्वराची दया सनातन आहे.

१) परमेश्वराचे स्तवन करा, 
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, 
कारण तो चांगला आहे, 
कारण त्याची दया सनातन आहे.

२) देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा, 
कारण त्याची दया सनातन आहे 
प्रभूचे उपकारस्मरण करा. 
कारण त्याची दया सनातन आहे.

३ )ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे, 
कारण त्याची दया सनातन आहे. 
ज्याने मोठमोठे राजे मारून टाकले त्याने, 
कारण त्याची दया सनातन आहे.

४) ज्याने प्रतापी राजे ठार केले त्याचे, 
कारण त्याची दया सनातन आहे. 
ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे, 
कारण त्याची दया सनातन आहे.

५) ज्याने आपला सेवक इस्राएल ह्याला 
तो वतन करून दिला त्याचे, 
कारण त्याची दया सनातन आहे.
 ज्याने आम्हांला आमच्या शत्रूपासून सोडवले त्याचे, 
कारण त्याची दया सनातन आहे.



जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे.
मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक आहे
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १९:३-१२

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"तुमच्या अंत:करणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला आपल्या बायका टाकू दिल्या, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. "

परुशी येशूकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, “कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय ?" त्याने उत्तर दिले, “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी निर्माण केली आणि म्हटले, ह्याकरिता पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. ह्यामुळे ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले ते माणसाने तोडू नये. ते त्याला म्हणाले, मग सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली ?" तो त्यांना म्हणाला, "तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला आपल्या बायका टाकू दिल्या, तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या • कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो."

शिष्य त्याला म्हणाले, "बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे." तो त्यांना म्हणाला, “सर्वजण हे वचन स्वीकारू शकत नाहीत. पण ज्यांना हे दान दिले आहे, तेच स्वीकारू शकतात. कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, माणसांनी केलेले असेही नपुंसक आहेत आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणाला नपुंसक करून घेतले असेही नपुंसक आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन देव बोलला, “ती दोघे एक देह होतील." म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसांनी तोडू नये. लग्नसंस्कार हे एक पाचारण आहे. कुटुंब ही एक ख्रिस्तसभा आहे. ही देवाची एक देणगी आहे. म्हणून सूटपत्रास ख्रिस्तसभेची मान्यता नाही. “म्हातारपणापर्यंत आम्हाला एकमेकांच्या सहवासात राहू दे.” ही तोबीयसची, लग्नानंतर देवाकडे केलेली प्रार्थना. लग्नसाक्रामेंताचा अर्थ तोबीयसला हजारो वर्षापूर्वी समजला होता. आताच्या विवाहितांना कधी समजेल ? सहजीवन म्हणजे प्रकाशमय व आनंदी जीवन. सूटपत्र म्हणजे अंधकारमय व दुःखीकष्टी जीवन. तुम्हाला कोणते जीवन हवे आहे ? पुढे येशू आपणास समर्पित जीवनाविषयी सांगत आहे. पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत, म्हणून सुवार्ता घोषविण्यासाठी व दीन-दुबळे, निराश्रित, दुर्लक्षित, गरजवंत यांच्या सेवेसाठी येशू आपणांस बोलावत आहे. ह्या पाचारणास “हो” म्हणून जास्तीत जास्त तरुण स्वीकारण्यास पुढे येतील का ?

प्रार्थना:  हे प्रभू परमेश्वरा, पती-पत्नी मधील प्रेम, विश्वास, निष्ठा व ऐक्य अबाधित राहावे म्हणून त्यांना आशीर्वादित कर, आमेन

     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या