Marathi Bible Reading | Thursday 12th August 2021 | 19th Week in Ordinary Time

    सामान्य काळातील 

एकोणिसावा सप्ताह 

गुरुवार  

१२ ऑगस्ट २०२१

“जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताहि त्याप्रमाणेच तुमचे करील."

St. Jane Frances De Chantal

आजच्या शुभवर्तमानातील कृतघ्न चाकराचा दृष्टांत आपल्या जीवनावर चिंतन करायला भाग पाडतो. परमेश्वराकडून आपण दयेची व क्षमेची अपेक्षा करतो. आणि  आमच्या स्वर्गीय बापा  ही  प्रार्थना करतो खरे पण ती कृतीत आपण उतरवतो किती यावर चिंतन करू या. 

आपण आपल्या अपराध्याला किती वेळ क्षमा करावी? असा प्रश्न येशूला विचारला, तेव्हा येशूने उत्तर दिले, 'साताच्या सत्तर वेळा' म्हणजेच असंख्य वेळा, कारण प्रभू म्हणतो,' जर तुम्ही प्रत्येकजण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताहि त्याप्रमाणे तुमचे करील.' 'क्षमा मागणे आणि क्षमा करणे' हे जणू देवाचे आपल्याला मिळणारे दान आहे. ते जितक्या जास्त प्रमाणात आपण देतो तितक्याच प्रमाणात आपल्याला मिळत असते. ख्रिस्ताचे अनुकरण करुन अनेक संत-महात्म्यांनी आपल्या अपराध्यांना व प्रसंगी मारेकऱ्यांना क्षमा केली. 

प्रभू येशू ख्रिस्ताने आत्मसमर्पण करून सर्वांना क्षमेचा, प्रेमाचा व समेटाचा महामंत्र दिला आहे. क्षमा केल्याने आपसातील वैरभावाचे रुपांतर समेटात आणि आनंदात होत असते.ऐक्य, सलोखा, जवळिकता, सहभागिता आणि प्रेमाचा अनुभव इतरांना क्षमा केल्याने आणि क्षमा मागितल्याने मिळत असतो. अनेक समस्यांचे व आजारांचे मूळ अपराधीपणात आणि क्षमा न करण्यात दडलेले  असते. क्षमादानामुळे आपल्याला परिवर्तनीय असे जीवन लाभते.

✝️             

पहिले वाचन : यहोशवा ३ :७-११,१३-१७

वाचक :यहोशवा या पुस्तकातून घेतलेले वाचन 

“पाहा, प्रभूच्या कराराचा कोश तुमच्यासमोरून पलीकडे जाण्यासाठी यार्देनला प्रवेश करीत आहे."

परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास आरंभ करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना कळून येईल. कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की, जेव्हा तुम्ही यार्देनच्या पाण्याच्या कडेला पोहोचाल तेव्हा यार्देनमध्ये उभे राहा." मग यहोशवा इस्राएल लोकांना "म्हणाला, "जवळ येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याची वचने ऐका, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, ह्यांना तो तुमच्यासमोरून खात्रीने हाकून देईल. पहा, अखिल पृथ्वीचा जो प्रभू, त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोरून पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करीत आहे. अखिल पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे तळपाय यार्देनच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनचे पाणी थांबून साचेल आणि त्याची रास होईल.”
लोक यार्देनपलीकडे जाण्यासाठी आपल्या डेऱ्यातून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले. कोश वाहणारे यार्देनपाशी येऊन पोहोचले आणि कोश वाहणाऱ्या याजकाचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले (सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते), तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्यांच अंतरावर म्हणजे सारतानाजवळ आदाम नगरापाशी साठून चढले आणि त्याची रास झाली आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले; मग ते लोक यरिहोसमोर पार उतरून गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले आणि सर्व इस्राएल कोरड्या जमिनीवर पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देनपलीकडे निघून गेले.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ११४:१-६

प्रतिसाद :  आलेलुया !

१) परमेश्वराचे स्तवन करा 
इस्राएल इजिप्त देशातून निघाला, 
याकोबचे घराणे परकीय भाषा बोलणाऱ्या लोकांतून निघाले, 
तेव्हा यहुदा त्याचे पवित्रस्थान झाला, 
इस्राएल त्याचे राज्य झाला.

२ ) हे पाहून समुद्र पळाला, 
यार्देन मागे हटली, पर्वतांनी मेंढ्यासारख्या 
आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या उड्या मारल्या. 

३)  हे समुद्रा तुला काय झाले म्हणून तू पळतोस ? 
हे यार्देने, तुला काय झाले म्हणून तू मागे हटतेस ? 
अहो पर्वतांनो, तुम्हाला काय झाले म्हणून
 तुम्ही मेंढ्यांसारख्या उड्या मारता? 
अहो टेकड्यांनो, तुम्हाला काय झाले म्हणून 
तुम्ही कोकरांसारख्या उड्या मारता?



जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्याद्वारे जीवन मिळवून दिले.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १८:२१-१९:१

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"सात वेळा नव्हे तर साताच्या सत्तर वेळा क्षमा कर, असे मी तुला म्हणतो."

पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, “प्रभो, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय ?" येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा.

“स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे, त्या राजाला आपल्या दासांपासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला. तेव्हा लक्षावधी शेकेलच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करावयास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की, तो, त्याची बायको, आणि मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले आणि त्याचे कर्ज सोडले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला, त्याच्याकडे त्याचे शंभर शेकेल येणे होते, तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, "मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन." पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, “अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते; मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हती काय? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणे तुमचे करील.मग हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर येशू गालीलहून निघून यार्देनच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन प्रेम, दया, क्षमा ही महान मुल्ये आपणांस ख्रिस्ती धर्माने दिली आहेत. ज्याच्या अंगी प्रेम असते त्याच्या अंगी दया असते व ज्याच्या अंगी दया असते ती व्यक्ती क्षमा करते. तुम्ही जर इतरांना क्षमा केली तर इतरही तुम्हाला क्षमा करतील. आजच्या शुभवर्तमानात येशू आपणास सांगतो की एकवेळ नव्हे, दोन वेळ नव्हे तर हजारोवेळा आपण आपल्या वैयाला क्षमा करावी. आपण जर क्षमा केली नाही तर आपल्याला जीवनात मनशांती मिळणार नाही. आपले मन बैचेन होईल व त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होईल. आपण येशूच्या प्रार्थनेत म्हणतो, “जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्याअपराधांची क्षमा कर.” जेव्हा क्षमा करण्याविषयी आपले मन अस्थिर झाले असेल तर अशावेळी येशूने शिकवलेली ही प्रार्थना श्रद्धेने म्हणा. तुमचा निर्धार पक्का होईल. तुम्ही दुसऱ्याला क्षमा केली तर स्वर्गातील पिता तुम्हाला सुद्धा क्षमा करील नाही का ?

प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझ्या क्षमादानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, इतरांना क्षमा करण्यास व नवीन जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या