Marathi Bible Reading | Wednesday 11th August 2021 | 19th Week in Ordinary Time

   सामान्य काळातील 

एकोणिसावा सप्ताह 

बुधवार 

११ऑगस्ट  २०२१

संत क्लेअर

कुमारिका (१९९३-१२५३)

इ. स. १२१२ साली असिसी शहरातील संत जॉर्जच्या चर्चमध्ये असिसीच्या संत फ्रान्सिस ह्यांनी उपवासकालीन प्रवचने दिली. त्या प्रवचनाचा “क्यारा" नावाच्या एका अठरा वर्षीय मुलीवर एवढा जबरदस्त प्रभाव पडला की संत फ्रान्सिसच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या विचार सरणीनुसार व जीवन पद्धतीनुसार साधेपणाचे जीवन जगण्याची तीव्र उत्कंठा तिच्यात निर्माण झाली.
पुढे त्यानेच दिलेल्या सल्ल्यानुसार ती झावळ्यांच्या रविवारच्या रात्री आपल्या राजमहालातून गुपचूप बाहेर पडली. सोबत तिची मावशी बियांका आणि आणखी एक मैत्रीण होती. जवळच्याच पोर्टिउंकुलाच्या खोल्यापाशी असलेल्या लहानशा प्रार्थनामंदिरात संत फ्रान्सिस आणि त्यांचे धर्मबंधू तिच्यासाठी थांबलेले होते. इथेच तिने त्या सर्वांच्या साक्षीने आपले सोनेरी केस कापून घेतले. आपली भरजरी वस्त्रे काढून त्याऐवजी वैराग्याची वस्त्रे परिधान केली आणि ख्रिस्ताच्या नावाने गरिबीचे व्रत स्वीकारले. संत फ्रान्सिसच्या मार्गदर्शनानुसार तिला तात्पुरते जवळच्याच बेनेडिक्टाईन मठात ठेवण्यात आले.
ही बातमी तिच्या वडिलांच्या कानी पडताच त्यांचे रक्त उसळले. त्यांनी क्लेअरच्या लग्नाची व्यवस्था केलेली होती. तिच्यासाठी योग्य असा वर निवडलेला होता. आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात करून देण्याची मनोस्वप्ने ते पाहात होते. त्यामुळे त्यांना ह्या घटनेने धक्का बसला. बेनेडिक्टाईन कॉन्व्हेंटमधून तिला पळवून नेण्याचा मनसुबा देखील त्यांनी आखला. परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला. क्लेअर आता पावित्र्याच्या व गरिबीच्या व्रताशी एकनिष्ठ राहण्यासाठी एका विशिष्ट संघाच्या स्थापनेचा विचार करू लागली.संत फ्रान्सिसला झालेल्या साक्षात्कारातून संत डेमियन चर्चच्या शेजारी मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या प्रार्थनामंदिरात आता क्लेअर अगदी साधेसुधे जीवन जगू लागली. पंधरा दिवसांच्या आतच तिची धाकटी बहीण आग्रेस तिला येऊन मिळाली. 'पुअर क्लेअर्सची संस्था हळूहळू वाढीस लागली. पुढील काही वर्षात क्लेअरची मावशी बियांका, तिची आई धन्यवादित ऑर्तोलाना, आणखी एक बहीण बियाट्रीस ह्यांनीसुद्धा क्लेअरचे आध्यात्मिक नेतृत्व स्वीकारले व त्या तिच्या संघात येऊन दाखल झाल्या.
क्लेअरच्या उर्वरित आयुष्यात ४० वर्षांत युरोपभरातील अनेक देशांमध्ये गरीब मुलींच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी या संघाच्या पुष्कळशा शाखा उघडल्या गेल्या. असिसी येथील या संघाचे प्रमुख केंद्र मात्र क्लेअरच्या उतरत्या वयातही अध्यात्माचे केंद्र बनून राहिले. दोन पोप, अनेक कार्डिनल आणि बिशप्स तिचा सल्ला घेण्यासाठी येत असत. तिच्या अधिकृत निवृत्तीनंतरही असंख्य लोक तिच्याकडे आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी येत असत.
दीर्घकाळच्या आजारानंतर वयाच्या ५९व्या वर्षी १२ ऑगस्ट १२५३ रोजी साक्षात गरिबीचे मूर्तिमंत प्रतीक बनलेली 'संत फ्रान्सिसचे चिमुकले फूल' मानली गेलेली क्लेअर आपल्या स्वर्गीय निजधामी निघून गेली. त्यावेळी पोप इनोसेंट चौथे व त्यांच्या दरबारातील सर्व उच्च अधिकारी, तिच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते, अवघ्या दोनच वर्षांनी 'पुअर क्लेअर्स'ची ही पवित्र संस्थापिका पोपमहाशयांनी संतपदाने सन्मानित केली. तिच्या थडग्यावर असिसी येथे उभारलेले चर्च आतादेखील हजारो भाविकांसाठी तीर्थक्षेत्र बनलेलं आहे.
इ. स. १२२४ मध्ये फ्रेडरिक दुसरा ह्याच्या सारासेन सैन्याने जेव्हा असिसी
शहरावर हल्ला चढविला तेव्हा क्लेअर हिने अतिपवित्र ख्रिस्तशरीर असलेला प्याला आपल्या हाती घेऊन उंचाविला तेव्हा सर्व सैनिक आपोआप गर्भगळीत झाले. त्यांनी ताबडतोब तेथून पळ काढला. त्यामुळे काही चित्रांमध्ये क्लेअर हातात सिवोरियम (पवित्र भाकरींनी भरलेला प्याला) असलेल्या अवस्थेत दाखविण्यात येते.
अतिपवित्र साक्रामेंतातील येशूविषयी तिच्या मनात आत्यंतिक भक्तीभाव भरून उरलेला होता. 

चिंतन: मला जसे वागवायचे तसे वागवा. मी माझी इच्छा सर्वस्वी देवाला अर्पण केलेली असल्याने मी पूर्णतः तुमचीच आहे. मला आता स्वत:ची अशी इच्छा उरलेली नाही. संत क्लेअर

"जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.'

आपले परस्पर संबंध आणि देवाबरोबराचे संबंध विश्वासाने, प्रेमाने आणि सलोखाने सतत वृद्धिंगत होणारे असावे. त्यासाठी आपण जीवनात सतत प्रयत्नशील असावे, म्हणून प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्याला मार्गदर्शन करीत आहे.
शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त प्रथम आपला अपराध करणाऱ्याबरोबर सामंजस्याने समेट करायला सांगत आहे. परस्पर संबंध प्रस्थापित करण्यासाठी क्षमा करणे हा सर्वात चांगला उपाय आहे. कारण क्षमा करणे म्हणजेच नम्रता, संयम व धैर्य धारण करून सलोख वाढवणे होय. प्रभू येशू जाणीव करून देत आहे, की आपल्या प्रत्येकाला क्षमा करण्याची व क्षमा मागण्याची संधी मिळत असते. विशेषतः क्षमादानाचा व्यापक अर्थ समजावताना प्रभू येशू म्हणत आहे, 'जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल.' कारण आपणा  प्रत्येकाला पवित्र आत्म्याने अभिषेक करुन क्षमादानाचा अधिकार देण्यात आला  आहे.

✝️             

पहिले वाचन : अनुवाद  ३४ : १-१२

वाचक :अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन 

“परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशे मरण पावला आणि त्याच्यासमान कोणी संदेष्टा झाला नाही."

मोशे मवाबच्या मैदानांवरून यरिहोसमोरील पिसगा पर्वताच्या नबो नामक शिखरावर चढला. तेव्हा दानापर्यंतचा सर्व गिलाद प्रदेश, नफतालीचा सर्व प्रदेश, एफ्राइमचा व मनश्शेचा प्रदेश आणि पश्चिम समुद्रापर्यंतचा यहुदाचा सर्व प्रदेश आणि नेगेब आणि सोबरापर्यंतची तळवट म्हणजे खजुरीचे नगर यरिहो ह्याचे मैदान, हे सर्व परमेश्वराने त्याला दाखवले. परमेश्वर त्याला म्हणाला, “ज्या देशाविषयी मी आब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्याशी शपथ वाहिली होती की, तो मी तुझ्या संतानाला देईन, तो देश हाच. तो मी तुला प्रत्यक्ष दाखवला आहे, पण नदी ओलांडून तिकडे तुला जाता येणार नाही.” परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्याचा सेवक मोशे मवाब देशीच मरण पावला आणि त्याने त्याला मवाब देशातील बेथपौरासमोरील एका खोऱ्यात पुरले, परंतु त्याच्या कबरेची जागा अजूनही कोणाला माहीत नाही. मोशे मृत्यूसमयी एकशेवीस वर्षांचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती आणि त्याची प्रकृती ही क्षीण झाली नव्हती. इस्राएल लोकांनी मवाबच्या मैदानात मोशेसाठी तीस दिवस शोक केला, मग मोशेबद्दल सुतक धरून शोक करण्याचे दिवस संपले.
नूनचा मुलगा यहोशवा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला होता, कारण मोशेने त्याच्यावर आपले हात ठेवले होते. इस्राएल लोक त्याचे ऐकून परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे वागू लागले. परमेश्वराच्या प्रत्यक्ष परिचयाचा असा मोशेसमान कोणी संदेष्टा इस्राएलमध्ये आजपर्यंत झाला नाही. मिसर देशात फारो आणि त्याचे सर्व सेवक ह्यांच्यापुढे आणि देशभर जी सर्व चिन्हे व चमत्कार करायला परमेश्वराने त्याला पाठवले त्याबाबतीत आणि त्याने सर्व इस्राएलसमक्ष आपल्या हाताचा जो पराक्रम आणि जो भयंकर दरारा प्रकट केला त्याबाबतीत, त्याच्यासमान कोणी झाला नाही.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ६६:१-३,५,८,१६-१७

प्रतिसाद :  धन्य तो परमेश्वर, ज्याने माझ्या आत्म्याला जीवन दिले.

१) अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो देवाचा जयजयकार करा, 
त्याच्या नामाचा महिमा गा.
 त्याची गौरवयुक्त स्तुती करा. 
देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत !

२) अहो, या, देवाची कृत्ये पाहा, 
तो आपल्या कृतींनी मानवजातीला धाक बसवितो.
 अहो, लोकांनो, आमच्या देवाला धन्यवाद द्या, 
त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असा करा.

३) अहो, देवाचे भय धरणारे सर्व जनहो, तुम्ही या, 
ऐका, त्याने माझ्यासाठी जे केले आहे ते मी सांगतो,
 मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला, 
माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते.



जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
देवाने आपणास सुवार्तेच्याद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १८:२४-२०

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १८:१५-२० 

"त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविलास असे होईल."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकान्ती असताना त्याचा अपराध त्याला दाखव. त्याने तुझे ऐकले तर आपला भाऊ मिळविलास असे होईल. परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी एकादोघांना आपल्याबरोबर घे, अशासाठी की, दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा आणि जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळव आणि जर त्याने मंडळीचेही न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो. मी तुम्हांला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. मी आणखी तुम्हांला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी मान्य केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन आजच्या शुभवर्तमानात आपण पाहातो, येशू शिष्यांस म्हणाला, “तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर जाऊन दोघांनीच समेट करण्याचा प्रयत्न करा. जर त्याने मानले नाही तर आणखी दोघांना घेऊन जा. त्याचेही मानले नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्या सारखा होवो.” पण ह्याचा अर्थ असा नाही की त्याला समाजातून बहिष्कृत करावे किंवा धर्मातून काढून टाकावे. तर त्याच्याशी आपले संबंध तसेच ठेवून, नेहमी त्याच्या संपर्कात राहून त्याला क्षमा करावी. त्याच्यासाठी प्रार्थना करून त्याला येशूच्या मेंढवाड्यात आणण्याचा प्रयत्न करावा. ह्यासाठी आपण स्वतः विनम्रपणा धारण करावा. नम्रतेने व श्रद्धेने केलेली प्रार्थना देव निश्चित ऐकून घेईल व प्रार्थनेचे फळ आपणाला खात्रीने देईल. भावाबरोबर आपले नवे नाते जुळेल. तुम्ही काय कराल ?

प्रार्थना:  हे प्रभू परमेश्वरा, समेट, सलोखा व क्षमादान करुन तुझ्या प्रीतित वाढण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या