Marathi Bible Reading | Tuesday 10th August 2021 | 19th Week in Ordinary Time

  सामान्य काळातील 

एकोणिसावा सप्ताह 

मंगळवार  

१०ऑगस्ट  २०२१

संत लॉरेन्स, 

धर्मप्रसेवक व रक्तसाक्षी

" गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला तर पुष्कळ पीक देतो. "


रोमचे संत लॉरेन्स
पोप सिक्स्टस दुसरे ह्यांच्या हौतात्म्यानंतर त्यांचा चां अटक करण्यात आली. तीन दिवसानंतर त्याला तेलाच्या त्यात हळू तळण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी त्यांचे जीवनचरित्र लिहिणारे संत आंब्रोज ह्यांच्या मते सरिन्स ह्यांनी आपली सर्व मालमत्ता सम्राट व्हेलेरियन यांच्या चरणाशी आणून ठेवावी म्हणून सम्राटाने त्यांना आदेश दिलेला होता. परंतु सरिन्स ह्यांनी आपली सर्व मालमत्ता गोरगरिबांना वाटून टाकली आणि सर्वोत्तम संपत्ती म्हणून त्याने स्वतःला ख्रिस्तसभेच्या कार्याला वाहून घेतले.
डिकन लॉरेन्स ह्यांच्या या वर्तनामुळे संतप्त झालेल्या सम्राटाने त्याला १० ऑगस्ट इ.स. २५८ रोजी मृत्यूदंडाची शिक्षा दिली. डिकन रिन्स अत्यंत विनोदी स्वभावाचे होते. त्यांना उकळत्या तेलामध्ये तळले जात असताना त्याने आपल्या मारेकल्यांना सांगितले, माझी एक बाजू तळून झाली आता मला फिरवून दुसरी बाजू तळून काढा.
पुढे तिवोलीला जाणान्या रस्त्यालगत त्याच्या थडग्यावर 'कॉन्टन्टाईन द ग्रेट' ह्या सम्राटाने एक छोटेखानी सभागृह उभारले. पाचव्या सातव्या शतकात तिथेच "संत लॉरेन्स बियाँड-द-वॉल्स" हे महामंदिर बांधण्यात आले. रोममध्ये असलेल्या सात मुख्य चर्चेसमध्ये संत लॉरेन्स महामंदिराचा आजदेखील समावेश केला जातो.

नवा जन्म म्हणजेच ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती.  गहू किंवा कोणतेही बीज जमिनीत लावल्यावर त्या बीजाला आपला जुना आकार व जुन्या जीवनाचा त्याग करावा लागतो. जुन्याचा ऱ्हास होतो आणि त्यातून नवा अंकूर उगवतो. त्या अंकुराची जोपासना केल्याने त्याचे रोपटे होते. कालांतराने त्याचे मोठ्या वृक्षात रुपांतर होऊन त्याला फळे लागतात.
ख्रिस्ती जीवन फलदायी बनविण्यासाठी आत्मत्याग व बलिदान करावे लागते. 
 ख्रिस्तसभा आज संत लॉरेन्सचा स्मृतिदिन साजरा करीत आहे. स्वार्थत्याग करुन गरिबांसाठी तळमळीने सेवाकार्य करणाऱ्या लॉरेन्सला मृत्यू आला, परंतु त्याच्या सेवाकार्याला चांगुलपणाचे पीक आले. संत लॉरेन्स हा गरिबांचा आणि स्वयंपाक्यांचा आश्रयदाता असून आग आटोक्यात आणण्यासाठी त्याचा धावा केला जातो. आपल्या जीवनात चांगुलपणाची फलप्राप्ती व्हावी, म्हणून प्रभू येशू आज आत्मत्यागाचे आवाहन करीत आहे.

✝️             

पहिले वाचन : २ करिंथ ९ : ६-१०

वाचक :पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

"संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.'

जो हात राखून पेरतो तो त्याच मापाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मापाने कापणी करील. प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरवल्याप्रमाणेच द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे.
"तो चहूकडे वाटप करत असतो, गरिबांना दानधर्मकरत असतो, त्याचे नीतिमत्व युगानुगे राहते,”
असे शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढवील.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ११२:१-२,५-९

प्रतिसाद :  जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते.

१) परमेश्वराचे स्तवन करा.
जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो 
आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य !
 त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, 
सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.

२) जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो 
त्याचे कल्याण होते, 
तो न्यायाने आपले व्यवसाय करील. 
तो कधीही ढळणार नाही, 
नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील.

३) तो वाईट बातमीला भिणार नाही, 
त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते, 
त्याचे मन स्थिर असते, आपल्या शत्रूंची गत
 आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही.

४) त्याने सढळ हाताने गरिबांस दानधर्म केला आहे, 
त्याचे नीतिमत्व सर्वकाळ राहील. 
त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल.



जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
प्रभू म्हणतो, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
 आलेलुया!

शुभवर्तमान योहान १२:२४-२६

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल, जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा सन्मान करील."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन प्रभू येशू म्हणतो, “गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.” प्रभू येशूने आमचे व्याधी, आमचे क्लेश, स्वतः वाहिले. आमच्या अपराधांमुळे, दुष्कर्मामुळे ठेचला गेला. त्याच्या जखमांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले शेवटी अनंत यातना सहन करून क्रुसावर मरण पावला. एक दाणा मेला. त्याच्या मरणाने अगणित दाणे जन्मले. आज सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात सुवार्ता घोषविण्याचे पवित्र कार्य करीत आहेत. अनेकजण ख्रिस्ताचरणी जीवन समर्पित करून संत पदावर विराजमान झाले आहेत. असेच एक संत, “संत लॉरेन्स” डिकन व रक्तसाक्षी यांचा आज सण. त्यांना गरिबांविषयी अत्यंत कळवळा होता. त्यांनी आपला सर्व पैसा व भांडीकुंडी गरीबांना वाटून टाकली. त्यांना लोखंडी सळईच्या जाळीवर भाजून मारले. जो गरिबांची सेवा करतो तो येशूची सेवा करतो व जो येशूची सेवा करतो तर त्याचा पिता सन्मान करील. तुम्ही कुणाची सेवा करणार ?

प्रार्थना:  हे प्रभू, आत्मबलिदान व त्याग करण्यास आम्हाला प्रेरणा दे तसेच एकनिष्ठेने सेवा करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.

     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या