Marathi Bible Reading | Monday 9th August 2021 | 19th Week in Ordinary Time

 सामान्य काळातील 

एकोणिसावा सप्ताह 

सोमवार   

९ ऑगस्ट  २०२१

पवित्र क्रुसाच्या भक्त संत तेरेसा बेनेडिक्टा 

रक्तसाक्षी

व 

नॉर्थुम्ब्रियाचे संत ऑझ्वल्ड

रक्तसाक्षी ( -६४२)

“तू आपला देव परमेश्वर ह्याच्या मार्गाने चालावे, त्याच्यावर प्रीति करावी." (अनुवाद)

ज्या मानवाला म्हणजेच आपल्या सर्वांना परमेश्वराने निर्माण केले त्याने परमेश्वराच्या मार्गांनी चालावे, परमेश्वराचे भय धरावे आणि परमेश्वरावर प्रीति करावी अशी देवाची अपेक्षा आहे. परमेश्वर त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांना नेहमीच आशीर्वादित करुन त्याची कृपा बहालकरीत असतो. असा आजच्या पहिल्या वाचनाचा आशय आहे. 

 प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र व जगाचा तारणारा ह्याचे जीवन, दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान ह्यावर चिंतन करु या. आपल्या सर्वांवरील प्रीतिमुळेच प्रभू येशूने स्वतःचे बलिदान केले. प्रभूयेशूने देव प्रीति आणि परस्पर प्रीतिची आज्ञा  आपल्याला दिली आहे. प्रीतिच्या आज्ञेचा हाच उद्धेश आहे की आपण परमेश्वराचे  भय धरावे आणि त्याच्या सर्व मार्गानी चालावे. आजच्या शुभवर्तमानाता प्रभू  येशू आपल्या मृत्यू विषयी आणि विशेष म्हणजे आपल्या पुनरुत्थानाविषयीचे भाकित सांगत आहे. परमेश्वर पित्याच्या सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा अर्थ आपल्या सर्वांना समजावा म्हणून आज देवाच्या प्रीति वचनांवर आपण चिंतन करु या.

जो देवावर प्राति करतो तो देवाचे भय बाळगतो. मात्र भय म्हणजे भयंकर शिक्षा किंवा मरणप्राय भीती नव्हे तर देवाची आदरयुक्त भीती. देवच आपला निर्माणकर्ता आणि सर्वस्व आहे ह्याची आपण सतत जाणीव ठेवावी. आपल्या जीवनात, प्रार्थनेला आणि परस्पर सेवेला प्राधान्य द्यावे. प्रभू येशू अगदी क्रुसावरील मरणापर्यंत आज्ञाधारक झाल तसे आपण सुद्धा देवाची आदरयुक्त भीती बाळगून त्याचे आपणावरील प्रेम अनुभवू या. !


✝️             

पहिले वाचन : अनुवाद १०: १२-२२

वाचक :अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन

“तुमच्या अंतःकरणाची सुंता करा, अनोळख्यांवर प्रेम करा, कारण तुम्हीही अनोळखीच होता."

मोशे लोकांना म्हणाला, “तर आता हे इस्राएल, तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गानी चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज तुझ्या बऱ्यासाठी तुला सांगत आहे ते तू पाळावे. तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून ह्यापेक्षा जास्त काय मागतो ? पाहा, आकाश आणि आकाशापलीकडचे आकाश आणि पृथ्वी आणि तिच्यातले सर्व काही तुझा देव परमेश्वर ह्याचे आहे, असे असूनही परमेश्वराला तुझे पूर्वज आवडले आणि त्याने त्यांच्यावर प्रीती केली म्हणून त्याने त्यांच्यामागे त्यांच्या संतानाला म्हणजे तुम्हांला, सर्व राष्ट्रातून आजच्याप्रमाणे निवडून घेतले, हे आज माहीतच आहे. म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंता करा आणि ह्यापुढे ताठ मानेचे राहू नका. कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, प्रभूचा प्रभू, महान, पराक्रमी आणि भययोग्य देव असून तो कोणाचा पक्षपात करत नाही किंवा लाच घेत नाही. तो अनाथ आणि विधवा ह्यांचा न्याय करतो आणि परदेशीयांवर प्रीती करावी, कारण तुम्हीसुद्धा इजिप्त देशात परदेशीय होता. आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा. तोच तुला स्तुतीचा विषय आहे, तोच तुझा देव आहे आणि ही जी महान आणि भयानक कृत्ये त्याने तुझ्यासाठी केली ती तू डोळ्यांनी पाहिली आहेत. तुझे पूर्वज इजिप्त देशात गेले तेव्हा ते सत्तरजण होते, पण आता तुझा देव परमेश्वर ह्याने तुझी संख्या आकाशातील तान्यांप्रमाणे बहुगुणित केली आहे.'

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १४८:१२-१५,१९-२०

प्रतिसाद :   हे येरुशलेम, परमेश्वराचा गौरव कर.

१) हे येरुशलेम, परमेश्वराचा गौरव कर, 
हे सियोन, तू आपल्या देवाचे स्तवन कर, 
कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर
 बळकट केले आहेत, त्याने तुझ्याठायी 
तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे.

२) तो तुझ्या सीमांच्या आत शातंता पसरितो, 
उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो. 
तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो,
 त्याचा शब्द फार वेगाने धावतो.

३) तो याकोबला आपले वचन, 
इस्राएलला आपले नियम आणि 
निर्णय जाहीर करतो. कोणत्याही राष्ट्रांबरोबर 
त्याने असे वर्तन केले नाही, 
त्याचे निर्णय ते जाणत नाहीत 
परमेश्वराचे स्तवन करा.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १७:२२-२७

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"मनुष्याच्या पुत्राला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल."

शिष्य गालीलात एकत्र जमले असताना येशू त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे, ते त्याला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल. तेव्हा ते फार खिन्न झाले.

नंतर ते कफर्णहूमात आल्यावर मंदिरपट्टीचे नाणे वसूल करणारे पेत्रकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरू मंदिराच्या पट्टीचा नाणे देत नाही काय? त्याने म्हटले, हो, देतात, मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, शिमोन, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून? परक्यांपासून, असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, तर मुले मोकळी आहेत. तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन शेकेलचे नाणे सापडेल, ते घेऊन माझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल त्यांना दे.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन येशू दुसऱ्यांदा आपल्या शिष्यांना त्याच्या मृत्यूचे भाकित सांगतो. “मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाईल, ते त्याला जिवे मारतील, आणि तिसऱ्या दिवशी उठविला जाईल” हे ऐकून त्याचे शिष्य खिन्न झाले. त्यांना असे वाटे की, येशूला असे मरण येऊच नये. येशूच्या बोलण्याचा अर्थच शिष्यांना कळत नव्हता. म्हणूनच जेव्हा येशूला अटक झाली तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून गेले. पित्याच्या ह्या महान योजनेच्या विचारात असतानाच येशूच्या समोर एक दुसरा प्रसंग येतो. मंदिराची पट्टी वसूल करणारे येतात. त्यांना पाहून येशू पेत्राला म्हणाला, “समुद्रात गळ टाक. पहिल्या माशाच्या तोंडात दोन रुपयाचे नाणे मिळेल ते घेऊन तुझ्याबद्दल व माझ्याबद्दल देऊन टाक.” येशू न्यायी होता, सत्य होता, कोणाचीही भीड धरीत नसे. सर्व सामान्य माणसाने जीवन कसे जगावे हे दाखवतो. सरकारी नियमाप्रमाणे जे सरकारचे ते सरकारला भरावे. माणसांनी आपल्या हक्कापेक्षा आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी.

प्रार्थना:  हे प्रभू येशू, तुझ्या वचनाप्रमाणे, आज्ञेप्रमाणे आणि देवाच्या मार्गाने जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.

     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या