Marathi Bible Reading | 8th August 2021 | 19th Sunday in Ordinary Time

सामान्य काळातील 

एकोणिसावा रविवार  

८ऑगस्ट  २०२१


 
"स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे,"

परमेश्वराचा संदेष्टा एलीया हा निराश अवस्थेत रानातून चालला असताना  त्याला भूक लागली तेव्हा देवाच्या दूताने त्याला भाकर व पाणी दिले. त्याच अन्नच्या पोषणावर एलीया चाळीस दिवस व चाळीस रात्र चालत जाऊन तो  देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. परमेश्वराने जशी श्रद्धावान व निष्ठावान  एलीयाची काळजी घेतली तशीच तो एकनिष्ठ भक्तगणांची काळजी वाहत  असतो.
 ' प्रभू येशू   सार्वकालिक जीवनासाठी लागणारे आवश्यक पोषण म्हणजेच स्वतःचे शरीर आध्यात्मिक अन्न म्हणून आपल्याला देत आहे. प्रभू म्हणत आहे की, 'ह्या भाकरीतून जो खाईल तो सर्वकाळ जगेल. ' क्रुसावरील बलिदानाद्वारे प्रभू येशू  ख्रिस्ताने त्याच्या शरीर व रक्ताने आपले सर्वांचे तारण केले आहे. म्हणजेच आपल्या आध्यात्मिक पोषणासाठी प्रतिकात्मक रुपाने त्याने त्याचे शरीर अति पवित्र साक्रामेंतात ठेवले आहे. प्रत्येक मिस्सा बलीदानातून प्रभू येशू त्याच  भाकरीच्या रुपाने आपल्याला मिळतो. त्या स्वर्गीय जिवंत भाकरीचे आपण सेवन करुन आपण आपले आध्यात्मिक पोषण करुन सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास पात्र ठरु शकतो.
प्रभू येशू आपल्या जीवनाची स्वर्गीय भाकर आहे. त्याची अमृत वचने,  त्याची प्रीतिची आज्ञा आणि बलिदानाचे रहस्य जाणण्यास व सुवार्तेचे साक्षीदारबनण्यास आपण प्रयत्नशील बनू या.


✝️             

पहिले वाचन : १ राजे १९:४-८

वाचक :राजाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"देवाचा डोंगर होरेब येथे तो पोहचेपर्यंत अन्नाच्या बळावर चालत गेला."

एलिया स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडूपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, "हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर. मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही." मग तो रतामाच्या झुडूपाखाली पडून झोपी गेला; तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, "ऊठ, हे खा." त्याने पाहिले तो निखाऱ्यांवर भाजलेली एक भाकर आणि पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे, असे त्यांच्या दृष्टीस पडले. तो खाऊनपिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, "ऊठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावयाचा आहे." त्याने उठून ते अन्नपाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर चाळीस दिवस आणि चाळीस रात्र चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ३३:२- ९

प्रतिसाद :   परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा.

१) मी परमेश्वराला सर्वदा धन्यवाद देईन, 
माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल, 
माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील,
 दीनजन हे ऐकून हर्ष करतील.

२ )तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. 
आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णू या.
 मी परमेश्वराला शरण गेलो आणि
 त्याने माझा स्वीकार केला, 
त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले.

३) ज्यांनी त्यांच्याकडे पाहिले ते प्रकाशित झाले, 
त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत.
 ह्या गरीब माणसाने धावा केला; 
परमेश्वराने ते ऐकला आणि 
त्यांच्या सर्व संकटातून त्याला सोडवले.

४) परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती 
छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. 
परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा. 
जो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य!

दुसरे वाचन इफिस  ४:३०-५:२

वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन ४:३०-५:२

"ख्रिस्ताने तुम्हांवर प्रीती केली, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. "

देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसांपर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहा. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला आणि निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी आणि कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.
तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण आणि यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.

हा प्रभूचा शब्द आहे

सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया ! 
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतः चक्षु प्रकाशित करो, म्हणजे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही आम्ही ओळखावी.  
 आलेलुया!

शुभवर्तमान योहान ६:४१-५१

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

" मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे."

"मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे," असे येशू म्हणाला, म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले.. ते म्हणाले, “ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफचा पुत्र येशू आहे ना?" तर मग, “मी स्वर्गातून उतरलो आहे" असे आता तो कसे म्हणतो ? येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसांत कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहिले आहे की, ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही, जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हांला खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मात्रा खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून जगाच्या जीवनासाठी आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन मानवी जीवनाचे सार्थक नक्की कशामध्ये आहे ? असा प्रश्न मनुष्य आयुष्यभर स्वतःला व इतरांना विचारीत असतो. मात्र जोपर्यंत मनुष्य परमेश्वराकडे येत नाही, त्याची इच्छा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही तोपर्यंत मनुष्य अस्वस्थ राहतो म्हणून संत अगस्तीन म्हणतात, 'हे परमेश्वरा, आमची हृदये तुझ्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत. ती तुझ्याठायी विसावा पावल्याशिवाय कधीही शांत होणार नाहीत. 
१) परमेश्वर मानवी जीवनाचे एकमेव ध्येयः एलिया संदेष्ट्याने कार्मेल पर्वतावर बआलच्या खोट्या संदेष्ट्यांना कंठस्नान घातलेले होते. मात्र परमेश्वराच्या सामर्थ्याचा त्याला जेव्हा विसर पडला तेव्हा ईजबेल राणीच्या धमकावण्याने तो कार्मेल पर्वत सोडून पळून जात होता. बैर-शिबा येथे एका झुडपाखाली झोपलेला असताना देवदूताने त्याला दोन वेळा जागे करून भाकर व पाणी दिले. त्या स्वर्गीय अन्नाच्या बळावर तो देवाचा पर्वत म्हटलेल्या होरेब या ठिकाणी आला. तिथे त्याला परमेश्वराचा जवळून अनुभव आला त्यामुळे त्याच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिलाली. 
२) परमेश्वराची इच्छा जाणून घेणे - मानवाचे एकमेव कामः परमेश्वराची इच्छा काय आहे हे जाणून न घेता माणूस जेव्हा सर्वकाही स्वतःच्या इच्छेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत तेव्हा त्याचे पुष्कळसे निर्णय चुकतात, त्याचे कार्य अल्पजिवी ठरते आणि त्याची मनःस्थिती गोंधळून जाते म्हणून संत पौल इफिसच्या लोकांना आपल्या दैनंदिन जीवनात प्रभूची काय इच्छा आहे हे जाणून घेण्यास सांगत आहे. 
३) स्वर्गीय भाकर- आध्यात्मिक भूक भागविणारे एकमेव अन्न : एलिया मिळालेल्या स्वर्गीय भाकरीच्या बळावर तो चाळीस दिवस आणि चाळीस रात्र चालत राहिला. येशूदेखील आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी स्वर्गीय भाकर देऊ इच्छितो. त्यासाठी मात्र आपल्याला आध्यात्मिक भूक लागली असणे आवश्यक आहे. 
आत्मपरीक्षण : मानवी जीवनाचे सार्थक कशामध्ये दडलेले आहे असे आपल्याला वाटते ? परमेश्वराचा अनुभव घेणे, त्याची इच्छा जाणून घेणे आणि आध्यात्मिक भूक भागविणे ह्या गोष्टींना आपल्या जीवनात कोणते स्थान आहे ?

प्रार्थना:  हे प्रभू येशू, स्वर्गीय भाकरीचा आम्हाला ध्यास लागावा व तुझी साक्ष इतरांना देता यावी म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.

     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या