सामान्य काळातील
अठरावा सप्ताह
शनिवार
७ ऑगस्ट २०२१
संत सिक्स्टस दुसरे आणि त्यांचे सहकारी
रक्तसाक्षी (२५८)
संत कॅजिटन
•वर्तनसाक्षी (१४८०-१५४७)
"जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर....."
परमेश्वराने दिलेल्या देवप्रीति व परस्पर प्रीतिच्या आज्ञा सर्वांनी अंतःकरणापासून पाळाव्यात, त्याच बरोबर आज्ञापालनामुळे सर्वांच्या जीवनात परमेश्वर अलौकिक कृत्ये करून आमूलाग्र असा बदल घडवून आणील असे आश्वासन देण्यात आले आहे.
आजच्या शुभवर्तमानात , एका फेंकरीकरी मुलाला बरे करण्यात येशूच्या शिष्यांना अपयश येते. शिष्यांना प्रभू येशूने त्यांच्या अल्प विश्वासाबद्दल आणि आत्मविश्वासाबद्दल कठोर शब्दात दटावले . आपल्या जीवनात परिवर्तन किंवा चमत्कार का घडत नाही ह्यावर प्रभू येशू आपल्याला चिंतन करायला लावीत आहे. प्रथम आपला विश्वास मजबूत असणे गरजे आहे. देवासमोर शरण जाऊन रिक्त होणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्याच्या सहवासात राहून संवाद साधण्याची आवश्यकता आहे. केवळ कर्मकांड नव्हे तर विश्वासाचा अंकूर आपल्या अंत:करणात सतत वाढत गेला पाहिजे. देवाबरोबर असलेले आपले नाते घट्ट बनत गेले पाहिजे.
आपल्या देवावरील विश्वासात चमत्कार घडवून आणण्याचे व परिस्थिती बदलून टाकण्याचे सामर्थ्य आहे. आपल्याला त्या विश्वासाची व देवाच्या सामर्थ्याची जाणीव व्हावी. आपण देव प्रीतित आणि परस्पर प्रीतित वाढत राहावे तर देवाठायी आपल्या जीवनात संपूर्ण परिवर्तन शक्य आहे. आपण देवाला सर्वस्वी शरण जाऊ या.
पहिले वाचन : अनुवाद ६:४-१३
वाचक :अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने प्रीती कर. "
मोशे लोकांना म्हणाला, हे इस्राएल, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे; तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे, त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता, त्यांविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्यांवर आणि आपल्या फाटकांवर त्या लिही."
तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांना म्हणजे आब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांना जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तो तुला घेऊन जाईल, जी मोठी आणि सुंदर नगरे तू स्वतः वसवलेली नाहीत, तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेल्या विहिरी आणि तू लावलेले नाहीत असे द्राक्षमळे व जैतुन वृक्ष हे सर्व तो तुला देईल आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील; ज्या परमेश्वराने तुला इजिप्त देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप. तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर आणि त्याच्याच नामाने शपथ वाहा.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १८:२- ४,४७.५१
प्रतिसाद : हे परमेश्वरा,मी तुझ्यावर प्रेम करतो.
१) हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या
मी तुझ्यावर प्रेम करतो;
परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा आहे.
२) माझा देव, माझा खडक आहे,
त्याचा मी आश्रय घेतो. तो माझे कवच,
माझ्या रक्षणाचे बळकट साधन,
माझा उंच बुरूज आहे.
तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो.
स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो,
३) परमेश्वर जिवंत आहे,
त्या माझ्या दुर्गाला धन्यवाद असो!
माझे तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढो.
तो आपल्या राजाला मोठाले विजय देतो;
आपल्या अभिषिक्ताला, सर्वकाळ वात्सल्य दाखवतो.
आलेलुया, आलेलुया !
तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता.
शुभवर्तमान मत्तय १७:१४-२०
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुमच्याजवळ विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट तुम्हांस असाध्य नाही. "
एक मनुष्य येशूकडे येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभो, माझ्या मुलावर दया करा; कारण तो फेपरेकरी असून त्याचे हाल होतात; तो वारंवार विस्तवात पडतो आणि कधी पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही." तेव्हा येशूने उत्तर दिले, “अहाहा, हे विश्वासहीन आणि कुटिल पिढी! मी कोठपर्यंत तुम्हाबरोबर असू? कोठपर्यंत तुमचे सोसू ? त्याला येथे माझ्याजवळ आणा." नंतर येशूने भुताला दटाविले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकान्ती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हांला ते का काढता आले नाही?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हांला नक्की सांगतो की, जर तुम्हांमध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल; तुम्हांला काहीच असाध्य होणार नाही.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : देवासमोर गुडघे टेकणे म्हणजे मनोभावे देवाला नमन करणे, त्याचा स्वीकार करणे, देव आपले सर्वस्व आहे हे मान्य करणे. देवासमोर गुडघे टेकणे हे विश्वासाचे व विनम्रपणाचे प्रतिक आहे. ती एक विश्वास दर्शक कृती आहे. एक माणूस मुलाला घेऊन येतो. येशूच्यापुढे गुडघे टेकून म्हणतो. “प्रभुजी माझ्या मुलावर दया करा. कारण तो फेफरे करी आहे.' येशूने भूताला दटावले व तो मुलगा बरा झाला.शिष्य प्रभुला म्हणाले, “आम्ही ते का काढू शकलो नाही? येशूने उत्तर दिले, "तुमच्या अल्प विश्वासामुळे.” पुढे येशू असेही म्हणतो, “तुमच्यात मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही डोंगराला इकडून तिकडे सरक असे म्हणाल तर तो सरकेल.” असे मोहरीच्या दाण्याएवढा तरी विश्वास आपल्या अंतःकरणात निर्माण व्हावा असे तुम्हांला वाटते ना ?
प्रार्थना: हे प्रभू परमेश्वरा, माझी श्रद्धा बळकट करण्यांस व स्वतःबरोबरच इतरांचे जीवन परिवर्तन करण्यास मला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या