सामान्य काळातील
अठरावा सप्ताह
शुक्रवार
६ ऑगस्ट २०२१
प्रभू येशूचे रुपांतर
"हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याचे तुम्ही ऐका.”
आपल्या दुःखसहन, मरण व पुनरुत्थान घटनेच्या जवळजवळ एक वर्ष आधी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या तीन लाडक्या शिष्यांना पेत्र, याकोब व योहान ह्यांना-कैसेरिया फिलिप्पीयाजवळ असलेल्या डोंगरावर नेले. ऑरिजेन या धर्मगुरूंच्या काळातील एका परंपरेनुसार (इ. स. २५४) हा पर्वत गालिलीतील ताबोर पर्वत असल्याचे मानले जाते. तिबिर्याच्या समुद्र सपाटीपासून या डोंगराची उंची २,००० फूट इतकी आहे.
या डोंगरावर प्रभू येशूने आपल्या शिष्यांना आपले वैभव प्रकट केले. त्याचे मूख सूर्यासारखे तेजस्वी झाले. त्याची वस्त्रे बर्फासारखी शुभ्र व चकचकीत झाली. मोशे आणि एलिया त्याच्या बाजूला उभे असलेले शिष्यांच्या दृष्टीस पडले (मोशे हे नियमशास्त्राचे तर एलिया हे संदेष्ट्यांचे प्रतीक मानले गेले आहे) आकाशातून वाणी झाली की, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”
दुःखसहनाच्या काळात आपल्या शिष्यांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणून प्रभूने आपल्या वैभवाचे दर्शन त्यांना ह्या रूपांतराच्या रूपाने घडविले.
पुढे निसर्ग देवतेची पूजा करणाऱ्या अख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर येशूचे रूपांतर हा सोहळा चौथ्या व पाचव्या शतकात उदयास आला. मात्र पोप कॅलिस्टस तिसरे ह्यांनी बेलग्रेड येथे हुनियादी जानोस ह्याने तुर्कांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ १४५६ साली हा सोहळा संपूर्ण जगभर साजरा केला जावा असा आदेश काढला. स्वत: पोप महाशयांनी या सोहळ्यानिमित्ते तयार केलेली प्रातः प्रार्थना व सायंप्रार्थना धर्मगुरूंच्या (ब्रिव्हरी) प्रार्थना पुस्तकात समाविष्ट केलेली आहे.
ह्याच दिवशी रोममध्ये संत जॉन लॅटरन महामंदिराचा सणसुद्धा साजरा केला जातो.
चिंतन : “आपण इथे असावे हे बरे आहे” असे संत पीटर प्रभूला म्हणाला. येशूच्या बरोबर असणे आणि सर्वदा त्याच्या सहवासात राहणे खरोखर किती चांगले आहे. परमेश्वराच्या सहवासात राहणे, त्याच्या समान होत जाणे आणि त्याच्या दिव्य तेजात न्हाऊन निघणे ह्यापेक्षा आपला सन्मान तो काय? -सिनाईचे बिशप अनास्थासियुस
पहिले वाचन :दानीएल ७:९-१०,१३-१४
वाचक :दानीएलच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"त्याचा पेहेराव बर्फासारखा पांढरा होता.'
मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहेराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते आणि त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता. हजारो देवदूत त्याची सेवा करत होते. लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते. न्यायसभा भरली, पुस्तके उघडली गेली. मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले इतक्यात पाहा, आकाशातील मेघांवर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला, तो त्या पुराणपुरुषाकडे आला आणि त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे आणि सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव आणि राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय आणि अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९७:१-२,५-६,९
प्रतिसाद : परमेश्वर राज्य करतो, तो साऱ्या भूतलावर परमश्रेष्ठ आहे.
१)परमेश्वर राज्य करतो, पृथ्वी उल्हास करो,
द्विपसमूह हर्ष करो.
ढग आणि अंधार त्याच्याभोवती आहेत,
नीती आणि न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.
२ )परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर
पर्वत मेणाप्रमाणे वितळले.
आकाश त्याची न्यायपरायणता जाहीर करते,
सारी मानवजात त्याचे ऐश्वर्य पाहते.
दुसरे वाचन २ पेत्र १: १६-१९
वाचक : संत पेत्राने पाठवलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन
"आकाशातून आलेली ही वाणी आम्ही ऐकली.'
चातुर्याने कल्पिलेल्या कथांना अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य आणि आगमन ह्यांसंबंधाने तुम्हांला कळवले असे नाही, तर त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान आणि गौरव मिळाला, तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टयाचे वचन आम्हाजवळ आहे, ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंत:करणात दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
आलेलुया, आलेलुया !
हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्याचे तुम्ही ऐका.
शुभवर्तमान मार्क ९:२-१०
वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हा माझा प्रिय पुत्र आहे.'
येशूने पेत्र, याकोब आणि योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच पर्वतावर एकीकडे नेले आणि तेथे त्यांच्यादेखतत्याचे रूपांतर झाले. त्याची वस्त्रे चकचकीत आणि इतकी पांढरीशुभ्र झाली की तितकी पांढरीशुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परिटाला शक्य नव्हते. तेव्हा मोशेसह एलिया त्यांच्या दृष्टीस पडला, ते येशूबरोबर संभाषण करत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, “गुरुजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. तर आम्ही तीन मंडप उभारू आपणासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक ' काय बोलावे हे त्याला सुचले नाही, कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की, "हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.” मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले पण येशूशिवाय त्यांना आपल्याजवळ आणखी कोणी दिसले नाही.
नंतर ते पर्वतावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतावस्थेतून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका." हे बोलणे मनात ठेवून मृतावस्थेतून पुन्हा उठणे म्हणजे काय ह्याविषयी ते एकमेकांना विचारू लागले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : ताबोर डोंगरावर येशूचे रुपांतर झाले. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. मेघांतून अशी वाणी झाली की, "हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याचे तुम्ही ऐका.” ही वाणी आम्ही ऐकली अशी पेत्र साक्ष देतो. येशू मानव म्हणून जन्मलाः तो खरा मनुष्य व खरा देवही होता. ताबोर डोंगरावर तसे येशूने स्वतःला प्रगट केले आहे. देव जगात होता तरी जगाने त्याला जाणिले नाही. तो स्वकियांकडे गेला तरी स्वकियांनीही त्याचे स्वागत केले नाही. पण ज्यांनी त्याचे स्वागत केले. त्यांना जीवन प्राप्त झाले. जीवन प्राप्त होणे म्हणजे त्याचे स्वागत करणे, स्वागत करणे म्हणजे त्याची वचने पाळणे, त्याची वचने पाळणे म्हणजे येशूचे ऐकणे. जे परमपवित्र पित्याला अभिप्रेत आहे. ताबोर डोंगरावर पित्याने आपल्याला दिलेली ही आज्ञा “तुम्ही ह्याचे ऐका.” शास्त्री परुश्यांप्रमाणे आपण जर येशूचे ऐकत नसाल तर आपले रुपांतर होणे गरजेचे आहे. आपण आपले रुपांतर करण्यास तयार आहोत ना ?
प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व तुझ्या वैभवात सहभागी होण्यास पात्र बनण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या