सामान्य काळातील
अठरावा सप्ताह
गुरुवार
५ ऑगस्ट २०२१
संत मेरी मेजर महामंदिराचे समर्पण
इ. स. ३५५ साली रोम शहरात इस्क्वीलाईन हिलवर पोप लिबेरियुस ह्यांनी एक चर्च उभारलेलं होतं. पुढे ९० वर्षांनी पोप सिक्स्टस तिसरे ह्यांनी या बॅसिलिका लिबेरियानाचे नूतनीकरण केले आणि ते पवित्र मरियेला अर्पण केले. इ. स. सातव्या शतकापासून ह्या चर्चला संत मेरी ऑफ द मेंजर (गोशाळेतील संत मरिया) या नावाने संबोधले जाते. कारण या चर्चमध्ये बेथलेहेमच्या गोशाळेचे पवित्र अवशेष ठेवलेले आढळतात. तसेच जगभर पवित्र मरियेच्या नावाने बांधल्या गेलेल्या कोणत्याही ख्रिस्तमंदिरापेक्षा हे महामंदिर सर्वात मोठे असल्याने त्याला संत मेरी मेजर हे नाव आता सर्वपरिचित झालेले आहे.
कालांतराने उदयास आलेल्या एका दंतकथेनुसार ४ ऑगस्ट ३५५ च्या रात्री झालेल्या हिमवर्षावात या चर्चला एक विशिष्ट आकार प्राप्त झाला. पुढे त्याच आकारानुसार महामंदिराची रचना करण्यात आली. या अद्भुत घटनेची स्मृती म्हणून दरवर्षी ५ ऑगस्टला या सणानिमित्ते पवित्र मरियेच्या इमाजीवर वरील छतामधून जास्मीन व गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो.
वाचक :गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन
“लोकांसाठी खडकातून पाणी काढ.'
पहिल्या महिन्यात इस्राएल लोकांची सर्व मंडळी त्सीन रानात आली, त्यांनी कादेश येथे मुक्काम केला; येथे मिर्याम मरण पावली आणि तेथे त्यांनी तिला मूठमाती दिली. तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे आणि अहरोन ह्यांच्याविरुद्ध एकत्र झाले. ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले, “परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद मेले तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते. तुम्ही परमेश्वराची मंडळी ह्या रानात कशाला आणली ? आम्ही आणि आमच्या जनावरांनी मरावे म्हणून? इजिप्त देश सोडायला लावून आम्हांला ह्या भिकार ठिकाणी का आणलेस? येथे धान्य, अंजीर, द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यावयाला पाणी सुद्धा नाही." तेव्हा मोशे आणि अहरोन हे मंडळीपुढून निघून दर्शनमंडपाच्या दारापाशी पालथे पडले आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले. परमेश्वर मोशेला म्हणाला, “आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा आणि त्यांच्यादेखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्यातून पाणी निघेल; ह्याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ आणि ह्या मंडळीला आणि त्यांच्या जनावरांना पाज." परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्यांच्यासमोरून ती काठी आणली.
मोशे आणि अहरोन ह्यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, "अहो, बंडखोरांनो, ऐका; तुमच्यासाठी आम्ही ह्या खडकातून पाणी काढावे का?" मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी आणि त्यांची जनावरे पाणी प्याली. ह्यावर परमेश्वराने मोशे आणिअहरोन ह्यांना म्हटले, “तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्राएल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रकट केले नाही, म्हणून ह्या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात ह्यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही.” त्या झऱ्याचे नाव मरिबा (म्हणजे भांडण) असे पडले, कारण इस्राएल लोक परमेश्वराशी त्या ठिकाणी भांडले आणि त्यांच्यामध्ये परमेश्वराने आपले पावित्र्य प्रकट केले.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९५:१-२,६-७अबक, ७ड-९
प्रतिसाद : आज तुम्ही त्यांची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.
१) याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू;
आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू;
उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ,
स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
२) याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता
त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू;
त्याची उपासना करू, त्याला नमन करू.
कारण तो आपला देव आहे आणि आपण
त्याच्या कुरणातील प्रजा त्याच्या हातचा कळप आहो.
३) आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल
तर किती बरे होईल! मरिबा येथल्याप्रमाणे,
रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी
केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठोर करू नका;
तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती
पाहिलेली होती तरी त्यांनी माझी परीक्षा
पाहिली व मला पारखले.
आलेलुया, आलेलुया !
देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले.
शुभवर्तमान मत्तय १६:१३-२३
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तू पेत्र आहेस; मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन."
फिलिप्पीच्या कैसरीयाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात ?” ते म्हणाले, “कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिमर्या, किंवा संदेष्ट्यातील कोणी एक, असे म्हणतात." तो त्यांना म्हणाला, "पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?" शिमोन पेत्रने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.” येशूने त्याला म्हटले, "शिमोन बार्योना, धन्य तुझी! कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.” तेव्हा त्याने शिष्यांना निक्षून सांगितले की, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका.
तेव्हापासून येशू आपला शिष्यांना सांगू लागला की, मी येरुशलेमला जाऊन वडील, मुख्य याजक, आणि शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दु:खे सोसावी, जिवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याला निषेध करून म्हणाला, “प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. परंतु तो वळून पेत्रला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, तर माणसांच्या गोष्टींकडे आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : त्सीन रानांत कादेश येथे मोशे व अहरोन ह्यांनी खडकावर काठी आपटून इस्रायल लोकांना पाणी दिले. मात्र आम्हीच तुम्हाला पाणी दिले असे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी तेथे देवाला प्रगट करणे अवश्य होते. देवाने त्यांनाकनान देशात जाण्यापासून परावृत्त केले. शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना विचारतो “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून ओळखतात ?” सर्वांनी वेगवेगळी उत्तरे दिली. मात्र पेत्र म्हणाला, “आपण ख्रिस्त, देवाचे पुत्र आहात.” येशूने ओळखले की हे पेत्राला माझ्या स्वर्गातील पित्याने प्रगट केले. येशू पेत्राला म्हणाला, “तू खडक आहेस व या खडकावर मी आपली मंडळी रचीन.” पेत्र येशूचा सर्वांत जवळचा शिष्य झाला. ख्रिस्ताच्या मरणानंतर ख्रिस्तसभेचा पहिला पोप झाला. पेत्राप्रमाणे आपणाला येशूची खरी ओळख कधी होणार ?
प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझ्या सामर्थ्याने व शक्तीने आम्हा सर्वांची सर्व प्रकारच्या सैतानी बंधनातून मुक्तता कर, आमेन.
0 टिप्पण्या