सामान्य काळातील
एकविसावा सप्ताह
शनिवार
२८ ऑगस्ट २०२१
हिप्पोचे संत अगस्तीन
- महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपाल, धर्मपंडित (३५४-४३०)
ख्रिस्तसभा आज महान धर्मपंडित संत आगस्टीनचा सन्मान करीत आहे. पाप कितीही मोठे असले तरी देवाची दया व कृपा त्यापेक्षा खूप महान आहे. पापी आगस्टीनचे परिवर्तन झाले आणि पश्चातापी अंत:करणाने देवाला शरण गेलेल्या आगस्टीनने आपले संपूर्ण जीवन ख्रिस्ताला वाहीले. संत आगस्टीन म्हणतात, आपली हृदये परमेश्वरासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत, ती त्या परमेश्वराठायी विसावा पावल्याशिवाय शांत होऊ शकत नाही."
बिशप अगस्तीन जगातील प्रकांडपंडितांपैकी ख्रिस्तसभेचे विख्यात विद्वान धर्मपंडित होते. त्यांनी तत्त्वज्ञान व ईशज्ञान या दोन्ही क्षेत्रांत आपला असा वेगळा ठसा उमटविलेला होता. 'कृपा' या विषयावरील त्यांचे विचार देवाचा सार्वभौम अधिकार आणि मानवाची स्वतंत्र इच्छाशक्ती या दोहोंचा सुंदर संगम घालताना दिसतात. आपल्या पश्चात्तापाची व परिवर्तनाची प्रक्रिया व श्रद्धेचा प्रवास त्यांनी 'आत्मनिवेदन' (Confessions) या जगप्रसिद्ध आत्मचरित्रामध्ये वर्णन केलेला आहे. परमेश्वराचे निर्मितीकार्य वर्णन करणारे 'सिटी ऑफ गॉड' हे पुस्तक तर नाशवंत वस्तूंमध्ये देवाचे अविनाशी सामर्थ्य कसे भरून राहिलेले आहे त्याचे सुंदर वर्णन करणारे आहे.
संत अगस्तीन २८ ऑगस्ट ४३० साली मरण पावले. त्यांच्या शरीराचे अवशेष आठव्या शतकापासून 'पाविया' येथे ठेवण्यात आलेले आहेत.
चिंतन : हे प्रेमाचे जळते भट्टी! माझ्या प्रभो! तू साक्षात प्रेम आहेस! माझ्या हृदयात प्रेमाचा अग्नी प्रज्वलित कर - संत अगस्तीन
शुभवर्तमान मत्तय २५:१४-३०
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो."
येशूने आपल्या शिष्यांना पुढील दाखला सांगितलाः “परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, एकाला त्याने पाच हजार रूपये, एकाला दोन हजार रूपये आणि एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेच जाऊन त्यावर व्यापार केला आणि आणखी पाच हजार मिळवले. तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्याने आणखी दोन हजार मिळवले. परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली आणि तिच्यामध्ये आपल्या धन्याचा पैसा लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला आणि त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते. तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, “महाराज, आपण माझ्यावर पाच हजार रुपये सोपवून दिले होते. पाहा, त्यांवर मी आणखी पाच हजार रुपये मिळवले आहेत." त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.” मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, "महाराज, आपण माझ्यावर दोन हजार रुपये सोपवून दिले. होते. पाहा, त्यांवर मी आणखी दोन हजार रुपये मिळवले आहेत." त्याला त्याच्या धन्याने म्हटले, "शाबास भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, .मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो." नंतर ज्याला एक हजार मिळाले होते. तोही येऊन म्हणाला, “महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहा, जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता आणि जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता, म्हणून मी भ्यालो आणि तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते, पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत.” तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, “अरे दुष्ट आणि आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो आणि पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय? तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते हजार रुपये त्याच्यापासून काढून घ्या आणि ज्याच्याजवळ आहेत त्याला दया. त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्यांच्याजवळ जे असेल तेदेखील त्यांच्यापासून काढून घेतले. जाईल. ह्या निरुपयोगी दासाला अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल."

0 टिप्पण्या