पहिले वाचन : अनुवाद ४:१-२,६-८
वाचक : अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे तिच्यात काही अधिक करू नका, अशासाठी की, परमेश्वराच्या आज्ञा तुम्ही पाळाव्या."
मोशे लोकांना म्हणाला, अहो इस्राएल लोकहो, जे विधी आणि नियम मी तुम्हाला शिकवीत आहे ते पाळावे म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्या. जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे तिच्यात काही अधिक उणे करू नका तुमचा देव परमेश्वर ह्यांच्या ज्या आज्ञा मी तुम्हांला देत आहे त्या तुम्ही पाळाव्या. तुम्ही ते विधी आणि नियम काळजीपूर्वक पाळावेत. कारण त्यामुळे देशोदेशींच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ आणि समंजस असे दिसाल. त्या सर्व विधीसंबंधी ऐकून ते म्हणतील की, हे महान राष्ट्र खरोखर बुद्धीमान आणि समजंस लोकांचे आहे. कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो, तेव्हा तो आमच्याजवळ असतो, ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी आणि नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे ?
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १५:१-५
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील?
१) हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र पर्वतावर कोण राहील?
जो सात्त्विकतेने चालतो आणि नीतीने वागतो तो,
जो मनापासून सत्य बोलतो तो,
जो आपल्या जिभेने चुगली करत नाही तो.
२) तो आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही,
तो आपल्या शेजाऱ्याची निंदा करत नाही,
तो अधर्माला तुच्छ लेखतो,
तो परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो.
३) तो आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले
तरी ती मोडत नाही, तो आपला पैसा व्याजी लावत नाही,
तो निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाच घेत नाही.
जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.
दुसरे वाचन : याकोबचे पत्र १:१७-१८.२१-२२.२७
वाचक : याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन १:१७-१८.२१-२२.२७
"तुम्हांला आज्ञापिलेल्या वचनाप्रमाणे तुम्ही आचरण करा."
प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही आणि जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला.
सर्व मलिनता आणि उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ असे दृढावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा आणि विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे आणि स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ही भाकर जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
शुभवर्तमान मार्क ७: १-८,१४-१५,२१-१३
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता."
परुशी आणि येरुशलेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून येशूकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अस्वच्छ म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. (परुशी) आणि इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्यावाचून जेवत नाहीत; बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे आणि असल्या बऱ्याच रुढी ते पाळतात.) ह्यावरून परुश्यांनी आणि शास्त्र्यांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत ?” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. तो असा :हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे; ते व्यर्थ माझी उपासना करतात,
कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात, ते असतात मनुष्यांचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसाच्या संप्रदायाला चिकटून राहता."
त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “तुम्ही सर्वजण माझे ऐका आणि समजून घ्या; बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही. तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंत:करणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अंहकार, मूर्खपणा ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात आणि माणसाला भ्रष्ट करतात.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या उपासनेची वाचने आपल्यासमोर आज्ञाधारकपणा या विषयावर चिंतन करण्यासाठी पाचारण करीत आहेत.
१) आज्ञाधारकपणासाठी देवाची इच्छा जाणून घेणे आवश्यक असतेः अनुवादाच्या पुस्तकात मोशेची एकूण ५ प्रदीर्घ भाषणे देण्यात आलेले आहे. त्यात तो लोकांना देवाचे नियम समजून घेऊन ते पाळण्याविषयी बोध करीत आहे. संत बर्नडच्या मते, सर्व मनुष्याचे तारण व्हावे व त्यासाठी त्यांना सत्याची ओळख व्हावी ही देवाची अंतिम इच्छा आहे. मात्र त्यासाठी प्रत्येक पावलागणिक देवाची आपल्यासाठी तात्काळ इच्छा काय आहे हे जाणून घेणे गरजेचे असते.
२) आज्ञाधारकपणा हे एक नीतिमूल्य आहे: नैतिक जीवन जगण्यासाठी नम्रपणे कोणाचातरी अधिकार मान्य करावा लागतो. अंतिम अधिकार परमेश्वराचा असतो. इस्राएली लोकांनी जर परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या तर इतर लोकांना त्याच्या सामर्थ्याची साक्ष घडेल म्हणजेच आज्ञाधारकपणा माणसाला स्वार्थात गुंतवून ठेवीत नाही, तो त्याला इतरांचा विचार करण्यास प्रवृत्त करतो.
३) आज्ञाधारकपणा जीवनात सुसंगती निर्माण करतोः आजच्या दुसऱ्या वाचनात संत जेम्स आपल्या वाचकांना वचनानुसार आचरण करणारे होण्यास मार्गदर्शन करीत आहे. मनुष्य केवळ देवाचे वचन ऐकत राहिला मात्र त्याचे जीवन त्या वचनाशी विसंगत असेल तर तो आज्ञाधारक आहे असे म्हणता येणार नाही.
४) आज्ञाधारकपणा अंतःकरणात जन्माला यावा लागतोः आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू केवळ बाह्य कर्मकांड पाळणाऱ्या यहुदी अधिकाऱ्यांचे वाभाडे काढतो. जे अंतःकरणातून बाहेर येते ते माणसाला भ्रष्ट करते. आज्ञाधारकपणा जर अंतःकरणातून जन्माला आला नाही तर तो केवळ देखावा ठरूशकतो.
आत्मपरीक्षण : पुढील विधानांविषयी आपल्याला काय वाटते ? १) आज्ञाधारकपणा हा मानवी जीवनाचा सर्वोत्तम मार्गदर्शक आहे. २) आज्ञाधारकपणा हा स्वार्थकेंद्रित जीवनावर मिळविलेला विजय होय. ३) आज्ञाधारकपणा माणसामध्ये जबाबदारीची भावना उत्पन्न करतो. माझ्या जीवनात आज्ञाधरकपणा अधिक आहे की आज्ञाभंगाचे प्रमाण अधिक आहे ?
प्रार्थना:हे प्रभू येशू, शुद्ध मनाने तुझी उपासना करण्यास व तुझ्या आज्ञेप्रमाणे जीवन आचरण करण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या