सामान्य काळातील
बाविसावा सप्ताह
मंगळवार
३१ ऑगस्ट २०२१
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेना
✝️
जर प्रभू येशूवर विश्वास ठेवून व त्याला आपले सर्वस्व समर्पित करुन प्रभू येशूच्या अधिकाराचा आपण वापर केला तर अशुद्ध आत्म्याला आपण घालवून देवू शकतो. कोणत्याहि दुष्ट शक्तिला न घाबरता आपण प्रभू येशूच्या अधिकारात व आज्ञेत जीवन जगण्याच्या प्रयत्न करु या.
प्रभू येशू त्याच्या सामर्थ्यशाली अधिकाराने सर्व प्रकारच्या अंधकारमय शक्तीवर विजय मिळविणार प्रभू आहे. प्रभूच्या प्रकाशात स्थिर राहून आपण त्याच्या सामर्थ्यशाली कृपेवर अवलंबून राहण्यासाठी कृपा मागू या.
पहिले वाचन : १थेस्सलनिकाकरांस ५:१-६,९-११
वाचक : पौलचे थेस्सलनिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे, म्हणून ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. "
बंधूंनो, काळ आणि समय ह्यांविषयी तुम्हांला काही लिहिण्याची गरज नाही. कारण तुम्हांला स्वतःला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. "शांती आहे, निर्भय आहे." असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना चालू होतात, त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावरणारच नाहीत. बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हांला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा आणि दिवसाची प्रजा आहा, आपण रात्रीचे आणि अंधाराचे नाही. म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे आणि सावध राहावे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, म्हणून आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उन्नती करा, असे तुम्ही करतच आहा.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २७:१,४,१३-१४
प्रतिसाद : जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील.
१) परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे,
मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझा दुर्ग आहे,
मी कोणाचे भय धरू ?
२) परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले,
त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, ते हे की,
आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी,
म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन
आणि त्याच्या मंदिरात ध्यान करीन.
३) ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर
खात्रीने माझे कल्याण करील.
परमेश्वराची प्रतीक्षा कर,
खंबीर हो, हिम्मत धर,
परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मी परमेश्वराची प्रतीक्षा करतो, मी त्यांच्या वचनावर विसंबून आहे.
शुभवर्तमान लूक ४:३१-३७
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तू देवाचा पवित्र पुरुष आहेस हे मला ठाऊक आहे."
येशू गालिलातील कफर्णहूम गावी खाली आला. तो शब्बाथ दिवशी त्यांना शिक्षण देत असे. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा अशुद्ध भुताच्या आत्म्याने पछाडलेला कोणीएक माणूस सभास्थानात होता, तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “अरे येशू नाझरेथकर! तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस का? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र पुरुष तो." तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, “गप्प राहा आणि ह्याच्यातून नीघ." मग भूत त्या मनुष्याला त्यांच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले. तेव्हा सर्व जण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “काय हे बोलणे? ह्या अधिकाराने आणि सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात!” नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: देवाचा आत्मा येशूवर उतरला. त्या आत्म्याच्या सामर्थ्याने येशू मोठमोठे चमत्कार करू लागला. त्याच्या चमत्कारावरून आणि शिक्षणावरून लोक थक्क झाले. कफर्णहुमात एका सभास्थानात एक भूतग्रस्त मनुष्य होता. त्या भूताला येशूने धमकावून, अधिकारवाणीने बाहेर काढले. आपण माणसे भुते काढू शकत नाही. कारण आपली विवेकबुद्धी व शक्ती सैतानापेक्षा फारच कमी आहे. आजच्या पहिल्या वाचनात संत पौल म्हणतो, “तुम्ही प्रकाशाची प्रजा आहा." प्रकाश म्हणजे येशू. अंधार म्हणजे सैतान. देवाच्या आत्म्याचे सामर्थ्य येशूमध्ये आहे व येशू आपले सामर्थ्य आहे. म्हणून येशू आपल्या अंतःकरणात वसावा हे आपले ध्येय आहे. पण आपले अंतःकरण शुद्ध आहे का ? पश्चात्ताप करा, आंतरिक दृष्ट्या शुद्ध व्हा, येशूला शरण जा. देवाच्या आत्म्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान द्या. तुम्ही तयार आहात ना ?
प्रार्थना: हे सामर्थ्यशाली प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्यावरील श्रद्धेत दृढ राहून तुझ्या प्रकाशात चालण्या मला प्रेरणा दे, आमेन.
✝️
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना २०२१
हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा , तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर ,
(इथे आपनी विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर.
हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर.
हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.
0 टिप्पण्या