सामान्य काळातील
बाविसावा सप्ताह
बुधवार
१ सप्टेंबर २०२१
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेना
✝️
शुभवर्तमान लूक ४:३८-४४
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.'
येशू सभास्थानातून उठून शिमोनच्या घरी गेला. शिमोनची सासू कडक तापाने पडली होती, तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली.
सूर्यास्ताच्या वेळी, ज्यांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांनी त्यांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. "तू देवाचा पुत्र आहेस," असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली. त्याने त्यांना धमकावले आणि बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते.
दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते, परंतु तो त्यांना म्हणाला, मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.मग तो यहुदियांच्या सभास्थानांमध्ये उपदेश करत फिरला.
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना २०२१
हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा , तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर ,
(इथे आपली विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर.
हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर.
हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.

0 टिप्पण्या