सामान्य काळातील
बाविसावा सप्ताह
गुरुवार
२ सप्टेंबर २०२१
✝️
शुभवर्तमान लूक ५:१-११
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“सर्व सोडून देऊन ते ख्रिस्ताचे अनुयायी झाले."
लोकसमुदाय येशूजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मचवे पाहिले; त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनचा होता, त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा आत लोटावा म्हणून त्याने त्याला सांगीतले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनला म्हटले, “खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.” शिमोनने त्याला उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो." मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली, तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून. त्यांनी त्यांना खुणाविले. मग तो आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभो, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे.” कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते; तसेच शिमोनचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब आणि योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनला म्हणाला, “भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील." मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना २०२१
हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा , तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर ,
(इथे आपली विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर.
हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर.
हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.

0 टिप्पण्या