सामान्य काळातील
बाविसावा सप्ताह
शुक्रवार
३ सप्टेंबर २०२१
“वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपवास करायला लावता येईल काय ?
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेना
✝️
प्रभू येशू त्या काळाच्या तथाकथित सर्व धर्मपंडित व नेत्यांना परमेश्वराच्या तारणादायी योजनेची नवीन शिकवण देत आहे. नीतिमत्तेची आणि स्वर्गराज्याची शिकवण देत असताना प्रभू कर्मकांडाच्या जुन्या परंपरा मोडित काढत आहे. शुभवर्तमानात प्रभू म्हणतो, 'नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात घालत नाही.' धर्माचरण करणे म्हणजे केवळ नियमांचे काटेकोरपणे पालन करणे नव्हे, तर देवाच्या आज्ञांचे पालन करुन त्याची वचने आचरणात आणायला हवीत. स्वर्गराज्य सर्वांसाठी आहे मग त्यासाठी स्वर्गराज्याची शिकवण समजून घेणे गरजेचे आहे.
नियमांच्या पलिकडे जाऊन प्रार्थना, उपासना व धर्मचरणाचा अर्थ प्रभू येशू आज आपल्याला त्याच्या वचनाद्वारे समजावून सांगत आहे. देवाबरोबर आणि आपल्या बंधु भगिनींबरोबर नव्याने आपले संबंध प्रस्तापित करण्यासाठी प्रभू आवाहन करीत आहे. जे काही स्वर्गराज्यासाठी अनुरूप आहे त्यांच्या स्वीकार करुन आपण आचरण करावे. ख्रिस्त येशू स्वतःला नव्या द्राक्षरसाची उपमा देऊन नवजीवनाची वचने सांगत आहे. आपण प्रभूला सर्वस्वी शरण जाऊ या.
पहिले वाचन : कलस्सैकरांस १:१५-२०
वाचक : पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"सर्व काही ख्रिस्त येशूद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. "
येशू ख्रिस्त हा अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे, कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेले, दृश्य आणि अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आदी, मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या क्रुसावरील रक्ताच्याद्वारे शांती निर्माण करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतः बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १००:२-५
प्रतिसाद : आनंदगीत गात देवापुढे या.
१) हर्षाने परमेश्वराची सेवा करा.
गायन करत त्याच्यापुढे या,
परमेश्वर हाच देव आहे असे जाणा.
त्यानेच आम्हांला उत्पन्न केले,
आम्ही त्याचेच आहो, आम्ही त्याची प्रजा,
त्याच्या कुरणातील कळप आहो.
२) त्याचे उपकारस्मरण करत त्याच्या दारात,
स्तवन करत त्याच्या अंगणात प्रवेश करा.
त्याच्या नामाला धन्यवाद द्या.
त्याचे उपकारस्मरण करा
३) खरोखर परमेश्वर चांगला आहे,
त्याची दया सनातन आहे.
त्याची सत्यता पिढ्यान्पिढ्या टिकते.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मनुष्य केवळ भाकराने नव्हे. तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.
शुभवर्तमान लूक ५:३३-३९
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
" वर काढून घेतला जाईल तेव्हा ते उपवास करतील.”
परुशी आणि शास्त्री यांनी येशूला म्हटले, “योहानचे शिष्य वारंवार उपवास आणि प्रार्थना करतात, तसे परुश्यांचेही शिष्य करतात, आपले शिष्य तर खातात पितात.” येशूने त्यांना म्हटले, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपवास करायला लावता येईल काय ? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल त्या दिवसांत ते उपवास करतील." आणखी त्याने त्यांना दाखलाही सांगितला : कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावत नाही, तसे केले तर त्याने नवे फाडले आणि नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल आणि नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात कोणी घालत नाही. घातला तर नवा द्राक्षरस बुधले फाडून गळून जाईल आणि बुधल्यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात घालावा. जुना द्राक्षरस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: खरी धार्मिकता केवळ विधी नियमांचे पालन केल्याने साध्य होईल असं यहूदी धर्मीय पुढाऱ्यांना वाटत होतं. आजच्या शुभवर्तमानात येशू सूचवीत आहे, की केवळ प्रार्थना व उपासतापास करून जे निष्क्रिय राहतील त्यांना खऱ्या आध्यात्मिक जीवनाची जाणीव झालेली नाही. ह्याच जाणिवेने संत बेनेडिक्ट यांनी ORA ET LABORA (प्रार्थना व संत्कार्य) हे सूत्र मठवासी व व्रतस्थ जीवन स्वीकारणाऱ्या अनुयायांना शिकवलं. याच प्रेरणेने, असिसीकर संत फ्रान्सीस यांनी गरिबीचं व्रत स्वीकारून गरीब व दुर्बल बांधवांची सेवा करण्याची हाक दिली. कलस्सै नगरात राहणाऱ्या ख्रिस्ती अनुयायांना या मिशनकार्याची आठवण करून देताना संत पॉल म्हणतो, “अदृश्य देवाचे प्रतिरुप असलेल्या ख्रिस्ताठायी सर्व पूर्णता भरली आहे. क्रूसावरील रक्ताद्वारे त्याने दिव्य शांतीमध्ये आम्हाला सहभागी केले आहे.' "
प्रार्थना: हे प्रभू येशू, नवजीवनाचा स्वीकार करण्यास व तुला अनुसरण्यास | आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना २०२१
हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा , तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर ,
(इथे आपली विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर.
हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर.
हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.
0 टिप्पण्या