सामान्य काळातील
बाविसावा सप्ताह
शनिवार
४ सप्टेंबर २०२१
“मनुष्याचा पुत्र शब्बाथचा प्रभू आहे."
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेना
✝️
आज नोव्हेनाचा सहावा दिवस. देवशब्द आणि साक्रामेंते ह्या विषयावर आपण लक्ष केंद्रित करीत आहोत. ख्रिस्तसभा ही शब्दाचे गृह आहे असे मानले तर उपासनेकडे प्रथम लक्ष द्यावे लागेल. कारण उपासनेच्या भाग्यशाली वातावरणात देव आपल्या जीवनामधून आपल्याशी बोलत आहे. जे ऐकतात व उत्तर देतात अशा आपल्या लोकांशी तो बोलत असतो. उपासनेची प्रत्येक कृती स्वभावताच पवित्र शास्त्राने ओथंबलेली असते. ख्रिस्त स्वतः त्यांच्या शब्दात उपस्थित आहे, कारण जेव्हा देवळात शास्त्र वाचले जाते तेव्हा ख्रिस्तच बोलत असतो. प्रत्येक साक्रामेंतावेळी वापरला जाणारा देवशब्द त्या त्या साक्रामेताच्या अधिक समिप नेत असतो. देवशब्दाचे प्रत्येक साक्रामेंतातील स्थान अबाधीत ठेवणे ही आपल्यावर असलेली एक महत्वाची जबाबदारी आहे. ती पार पाडण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
शब्बाथ पाळणे म्हणजे विसावा घेऊन प्रार्थना उपासना करणे व देवकृपा मिळविणे. दैनंदिन जीवन सुरळीतपणे चालावे ह्यासाठी समाजात सर्व स्तरावर नियम बनवले जातात. नियम म्हणजे बंधने नसून शिस्तप्रिय जीवन आचरणासाठी नियम महत्वाचे आहेत. नियमांपेक्षा माणूस व त्याच्या दैनंदिन गरजा महत्वाच्या आहेत. नियमांपेक्षा माणूस महत्वाचा आहे. आजच्या शुभवर्तमानात शब्बाथ दिवशी प्रभूच्या शिष्यांनी शेतातील कणसे काढून खाल्ली म्हणून शास्त्री परुश्यांनी प्रभूला जाब विचारला. प्रभू येशूने म्हटले, 'मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे. ' शब्बाथा ऐवजी आपण रविवार हा प्रभूचा दिवस म्हणून पाळतो. ह्या दिवशी उपासनेत सहभागी होऊन सत्कृत्ये करणे महत्वाचे आहे.
पहिले वाचन : कलस्सैकरांस १:२१-२३
वाचक : पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"तुम्हांला पवित्र आणि निष्कलंक असे उभे करावे, ह्यासाठी देवाने 'तुमचा समेट केला आहे. "
जे तुम्ही पूर्वी परके आणि दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, त्या तुम्हांला पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. म्हणून तुमचा त्याने स्वतःच्या रक्तामांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, त्याने जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले आणि अढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली आणि जिचा मी पौल सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही तर हे होईल.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ५४:३-४, ६-८
प्रतिसाद : देव माझा आधार आहे.
१) हे देवा, तू आपल्या नावाच्या सामर्थ्याने मला तार.
आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर,
हे देवा, माझी प्रार्थना ऐक,
माझ्या मुखातील शब्दांकडे कान दे.
२) देव माझा आधार आहे, तो मला वाचवतो.
मी स्वखुशीने तुला यज्ञबली अर्पीन,
हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वोत्तम आहे,
मी स्तवन करीन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ह्या गोष्टी तू. बाळकांना प्रकट केल्या.
शुभवर्तमान लूक ६:१-५
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"शब्बाथ दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता ? "
एका शब्बाथ दिवशी येशू शेतांमधून जाताना त्यांचे शिष्य कणसे मोडून हातांवर चोळून खाऊ लागले. तेव्हा परुश्यांतील कोणी म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता? येशूने त्यांना उत्तर दिले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले ? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरच्यांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथचा प्रभू आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. त्या सर्वांना पुरविल्या जाव्यात असा ध्यास घेतलेल्या अनुयायांना ख्रिस्त प्रेरणा देत आहे. भुकेलेल्यांना अन्न मिळावं. अनेकविध व्याधींनी पीडलेल्या दुर्बलांना औषधपाणी मिळावं. ही देवाची इच्छा प्रमाण मानून ख्रिस्ती अनुयायांनी कार्य करायला हवे. शब्बाथ म्हणजे रविवार दिवस पवित्र पाळावा ही देवाची आज्ञा आहे. परंतु त्या दिवशी प्रार्थनेला सत्कार्याची देखील जोड द्यायला हवी. या पवित्र दिवशी काही ख्रिस्ती लोक वृद्धाश्रमाला भेट देऊन वृद्ध मातापित्यांना आनंदी करतात तर काही लोक आपल्या मुलांना घेऊन अनाथालयातील गरीब मुलांची विचारपूस करतात. सत्कृर्त्यांनी जोडलेल्या अशा शब्बाथ दिवसाला करुणेचा स्पर्श होतो.
प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझी वचने पाळण्यास व सात्विकतेने तुझी उपासना । करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना २०२१
हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा , तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर ,
(इथे आपली विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर.
हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर.
हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.
0 टिप्पण्या