सामान्य काळातील
तेवीसावा रविवार
५ सप्टेंबर २०२१
“इप्फाथा, म्हणजे मोकळा हो."
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेना
✝️
पवित्र आत्मा पवित्र शास्त्राला देवाचा जीवंत शब्द बनवतो. जो अनुभवातून आपल्या लोकांना श्रद्धेमध्ये सुपूर्त करण्यात येतो. पवित्र आत्मा शिवाय आपण देवाचा शब्द योग्यप्रकारे समजू शकत नाही आणि पवित्र आत्म्याच्या अनुपस्थितीत मनुष्य देवाच्या शब्दाचा चूकीचा अर्थ लावू शकतो.
जे देवाचे शब्द ऐकतात आणि लक्षपूर्वक त्यावर मनन करतात त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा सक्रीयतेन कार्य करतो. देवाचा शब्द "ज्या पवित्र आत्म्याद्वारे लिहीला गेला आहे. त्याच्याच प्रकाशात तो वाचून त्याचा अर्थ लावावा" (DV12) पवित्र आत्म्याच्या कार्यावरती आपला विश्वास असणं आवश्यक आहे कारण हाच पवित्र आत्मा ख्रिस्तसभेला पवित्र शास्त्र शिकवण्याची प्रेरणा देतो. ज्या ज्या वेळेला मॅजेस्टेरियूम अस्सलपणे पवित्र शास्त्राचा अर्थ लावते आणि प्रत्येक श्रद्धावंत ह्याच अर्थाला आपल्या आध्यात्मिक जीवनाचा नियम बनवतो तेव्हा पवित्र आत्मा प्रेरणा देतो. आपण देवाचा शब्द ऐकण्याची तयारी करत असता पवित्र आत्म्याचं सहाय्य मागूया.
प्रभू येशूने आपल्या बलिदानाद्वारे आपल्या सर्वांची सर्व प्रकाराच्या बंधनातून मुक्तता केली असून देवाबरोबर व बंधु भगिनीबरोबर समेट घडवून आणला आहे. आजच्या शुभवर्तमानातील बहिऱ्या व तोतऱ्या माणसाला बरे करताना प्रभू म्हणतो, 'इप्फाथा' म्हणजे मोकळा हो. लागलीच त्याचे कान मोकळे झाले व जिभेचा बंद सुटला. प्रभूचा गुणकारी स्पर्श आणि त्याचे शब्द यामुळे आपण सर्वप्रकारच्या बंधनातून मोकळे होऊ शकतो. आपण विश्वासाने प्रभूची वाणी ग्रहण करायला हवी, कारण प्रभू प्रेमळ व दयानिधान आहे. मात्र आपणाला आपल्या सर्व प्रकारच्या पापांतून व बंधनातून मोकळे होण्याची गरज आहे.
पहिले वाचन : यशया ३५:४-७
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"बहिऱ्यांचे कान खुले होतील आणि मुक्यांची जीभ गजर करील."
भित्र्या मनाच्या माणसांना म्हणाला, "धीर धरा, भिऊ नका. पाहा, तुमचा देव सूड घेण्यासाठी, अनुरूप असे प्रतिफळ देण्यासाठी येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील." तेव्हा आंधळ्यांचे डोळे उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील, तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील, कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील, जेथे मृगजळ दिसते तेथे तलाव होईल आणि तान्हेल्या भूमीत झरे उफाळतील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १४६ :६-१०
प्रतिसाद : हे माझ्या मना, परमेश्वराचे स्तवन कर. :
१) परमेश्वर सदैव आपले सत्यवचन पाळतो,
तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो,
तो भुकेलेल्यांना अन्न देतो,
परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.
२) परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो,
परमेश्वर वाकलेल्यांना सरळ उभे करतो,
तो नीतिमानांवर प्रेम करतो,
परक्यांचे रक्षण करतो.
३) परमेश्वर अनाथ आणि विधवा ह्यांची दाद घेतो,
परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो,
परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो,
हे सियोन, तुझा देव पिढ्यान्पिढ्या राज्य करील.
परमेश्वराचे स्तवन करा.
दुसरे वाचन याकोबचे पत्र २: १-५
वाचक : याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन
"जे गरीब आहेत त्यांना राज्याचे वारस होण्या देवाने निवडले आहे. "
माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. सोन्याची अंगठी घातलेला आणि भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि भिकार कपडे पांघरलेला एक गरीबही आला तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता, “ही जागा चांगली आहे, येथे बसा.” आणि गरिबाला म्हणता, “तू येथे उभा राहा, " किंवा " माझ्या पदासनाजवळ खाली बैस," तर तुम्ही आपणांमध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनला की नाही ? माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका, लोकदृष्टीने जे गरीब आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही ?
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास तुम्ही समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.
शुभवर्तमान मार्क ७:३१-३७
वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तो बहिऱ्यांना ऐकण्याची आणि मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो. "
येशू सोर प्रांतातून निघाला आणि सिदोनवरून दकापलीस प्रांतामधून गालील समुद्राकडे परत आला. तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या- तोतऱ्या माणसाला त्याच्याकडे आणून आपण ह्याच्यावर हात ठेवा अशी विनंती केली. तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली आणि थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा सोडला आणि म्हटले, 'इफ्फाथा,' म्हणजे 'मोकळा हो.' तेव्हा त्याचे कान मोकळे झाले आणि त्याच्या जिभेचा बंद लगेच सुटून तो स्पष्ट बोलू लागला. तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले, परंतु तो त्यांना जसेजसे सांगत गेला तसेतसे ते अधिकच जाहीर करीत गेले आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, "त्याने सर्व काही चांगले केले आहे, तो बहिऱ्यांना ऐकण्याची आणि मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: “नवा करार हा जुन्या करारामध्ये दडलेला आहे आणि जुना करार हा नव्या करारामध्ये स्पष्ट करून सांगण्यात आलेला आहे.” असे संत अगस्तीन ह्यांनी म्हटलेले आहे. जुन्या करारातील इस्राएली लोक मसिहाची वाट पाहात होते. संदेष्ट्यांनी केवळ त्याच्या येण्याचे भाकीतच केले नाही तर त्याचे व्यक्तिमत्त्व व कार्य ह्यांचा तपशील देखील लोकांना पुरविला. आजच्या पहिल्या वाचनात मसिहाचे असेच चित्र रेखाटण्यात आलेले आहे, तर शुभवर्तमानामध्ये येणारा मसिहा तो मीच आहे असे येशू स्वतःला सादर करतो. अभिवचन आणि त्याची परिपूर्ती अशी साखळी संपूर्ण बायबलमध्ये वाचायला मिळते.
प्रार्थना: हे प्रभू येशू ख्रिस्ता, मी सर्वस्वी तुला शरण आलो आहे. तुझे वचन ग्रहण करुन त्याप्रमाणे आचरण करण्यास मला प्रेरणा दे, आमेन.
✝️
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना २०२१
हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा , तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर ,
(इथे आपली विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर.
हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर.
हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.
0 टिप्पण्या