Marathi Bible Reading | Monday 6th September 2021 | 23rd Week in ordinary Time

 सामान्य काळातील 

तेवीसावा सप्ताह 

सोमवार 

६ सप्टेंबर २०२१




पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेना 

 ✝️

 
 देवाचा शब्द परिवर्तनकारक आहे आणि तो आपणास करूणामय बनवतो. संत पॉल सांगतो, “विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला देवाचा शब्द तारणासाठी देवाचे सामर्थ्य आहे.” (रोम १:१६). हा विश्वास येशू ख्रिस्त देवाचे अदृश्य रूप ह्यावरील विश्वासामध्ये दडलेला आहे. आणि येशूद्वारेच परमेश्वराने सर्व गोष्टींचा आपल्याबरोबर समेट केला आहे, जे देवाचे दयाळू कृत्य आहे. जुने ते होऊन गेले आहे आणि खिस्तामध्ये आता सर्वकाही नवीन करण्यात आले आहे.
सूड घेणे हा मानवी स्वभाव आहे. खरे पाहता समाज आपणास तसे करण्यास शिकवतो आणि क्षमा नम्रपणा ह्या भावना धीर व शक्तीविरुद्ध आहेत असे भासवितो. परमेश्वर सामर्थ्यशाली आहे आणि दयाळू देखील आहे. प्रभू येशूचा अशक्तपणा हा पाप आणि मृत्यूवरील विजयामध्ये बदलला. परमेश्वर त्याचे सामर्थ्य दाखविण्यासाठी अशक्त माणसाची निवड करतो. संत पेत्र सांगतो, "पूर्वी तुम्ही लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहा तुम्हास दया मिळाली नव्हती आता तर दया मिळाली आहे (१ पेत्र २:१०). हे शक्य झाले आहे प्रभू येशूच्या दयामय बलिदानामुळे.


✝️
पहिले वाचन : कलस्सै १:२४-२:३

वाचक : पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन

 “जे रहस्य शतकानुशतके गुप्त ठेवलेले होते ते प्रकट व्हावे ह्यासाठी मी ख्रिस्तसभेचा सेवक झालो."

तुम्हासाठी माझ्या दुःखात मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने, त्याचे शरीर जी ख्रिस्तसभा तिच्यासाठी भरून काढत आहे. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्याचा जो कारभार तुम्हासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी त्या ख्रिस्तसभेचा सेवक झालो. जे रहस्य युगानुयुगे, पिढ्यान्पिढ्या गुप्त ठेवलेले होते; परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे ते हे वचन होय. ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो आणि प्रत्येक माणसाला शिकवतो; अशासाठी प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. ह्याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवीत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे.कारण तुम्हासाठी, लावदिकीया येथील लोकांसाठी आणि ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे, हे तुम्हांला माहित व्हावे अशी माझी इच्छा आहे. ते परिश्रम ह्यासाठी की, त्यांच्या मनाला उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी आणि देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्यांचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे आणि बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ६२ :६-७,९

प्रतिसाद : माझे तारण आणि वैभव देवावर अवलंबून आहे.

१) हे माझ्या मना, तू केवळ देवावर भिस्त टाकूनस्वस्थ राहा.
कारण माझी आशातृप्ती करणारा तो आहे. 
तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे. 
तोच माझा उंच गड आहे. मी ढळणार नाही.

२.) अहो, लोकहो, सर्वदा त्याच्यावर श्रद्धा ठेवा, 
त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा,
देव आमचा आश्रय आहे.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
जे वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात, ते धन्य होत.
 आलेलुया!


शुभवर्तमान लुक ६:६-११

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"येशू शब्बाथ दिवशी त्या माणसाला बरे करतो की काय हे पाहायला ते टपून राहिले. "

एका शब्बाथ दिवशी, येशू सभास्थानात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस आला होता. तेव्हा शास्त्री आणि परुशी त्याच्यावर दोष ठेवायला सापडावा म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या माणसाला बरे करतो की काय हे पाहायला टपून राहिले. परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, "ऊठ आणि मध्ये उभा राहा.” मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, शब्बाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?" मग त्याने सभोवती त्या सर्वाकडे पाहून त्याला सांगितले, “आपला हात लांब कर " तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. तेव्हा ते लोक रागाने भडकले आणि येशूचे काय करावे ह्याविषयी ते आपसांत विचार करू लागले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: चांगलं कार्य करण्यासाठी सर्व दिवस योग्य असतात. प्रेमाने व सेवाभावी वृत्तीने संकटात व दुःखात असलेल्या बंधुच्या मदतीस धावून जाणं हे ख्रिस्ती अनुयायाचं पाचारण आहे. हा विचार सनातनी यहुदी धर्माच्या पुरोहितांना मान्य नव्हता. म्हणूनच शब्बाथ दिवशी येशूने अपंग माणसाला बरे करावे हे त्यांना पटले नाही. उजव्या हाताने अपंग असलेल्या बंधुला शब्बाथ दिवशी बरे करणे म्हणजे देवाचा अवमान करणे ठरेल ह्या मताला ते चिकटून राहिले. “ऊठ आणि मध्ये उभा राहा.” हे शब्द बोलून येशूने सर्वासमक्ष त्याचा उजवा हात बरा केला. सनातनी लोकांना हीकृती पटली नाही. संत पॉल कलस्सै येथील | अनुयायांना आव्हान करीत आहे. देवाचे रहस्य म्हणजे मानवपुत्र ख्रिस्त ह्याचे संपूर्ण ज्ञान समजून घ्या. ख्रिस्ताठायी प्रकट झालेले संपूर्ण ज्ञान तुम्हांला मिळाले आहे. “प्रेमाने एकमेकांशी बांधून राहा.”

प्रार्थना:  हे प्रभू येशू, तुझी वचने आत्मसात करुन तुझ्या राज्याचा वारसदार
बनण्यास मला प्रेरणा दे, आमेन.
✝️
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना २०२१

हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा , तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर ,   

(इथे  आपली विनंती सांगावी)

आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस  ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.

हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. 

हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. 

हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या