पहिले वाचन : कलस्सै २:६-१५
वाचक : पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“देवाने तुम्हांला त्याच्याबरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. "
ख्रिस्त येशू जो प्रभू, ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हांला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरतंर उपकारस्तुती करणारे व्हा.
ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान आणि पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हांला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे आणि अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहे, त्याच्या ठायी तुमची सुंताही झाली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुंतेच्या द्वारे तुमची सुंता झाली. तुमचा स्नानसंस्कार झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेला. जे तुम्ही आपल्या अपराधांनी आणि देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हांला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली.
आपल्याविरूद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले आणि क्रुसाला खिळून ते रद्द केले. सत्ताधिशांना आणि अधिकाऱ्यांना नाडून त्याच्याविरूद्ध क्रुसावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले.
हा प्रभूचा शब्द आहे.
शुभवर्तमान लुक ६:१२-१९
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूने रात्रभर प्रार्थना केली आणि बारा जणांना त्यांना प्रेषित असे नाव दिले. "
निवडून येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यातून पुढील बाराजणांना निवडून त्यांना प्रेषित असे नावही दिले. शिमोन, ह्याला त्याने पेत्र हेही नाव दिले आणि त्याचा भाऊ आंद्रेया, याकोब, योहान, फिलीप, बार्थेलोम्यू, मत्तय, थोमास, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबचा मुलगा यहुदा आणि जो पुढे विश्वासघातकी निघाला तो यहुदा इस्कर्योत.
येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदीया व येरुशलेम येथून आणि सोर आणि सिदोन ह्याकडल्या समुद्रकिनाऱ्यापासून त्याचे श्रवण करण्यासाठी व आपले रोग बरे करून घेण्यासाठी जे लोक आले होते. त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता. जे अशुद्ध आत्म्यांनी पीडलेले होते त्यांना त्याने बरे केले. तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यापासून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करीत होते.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: स्पर्श हा गुणकारी ठरतो. मात्र तो करुणेने भरलेला असावा. असंख्य लोकांचा जमाव ख्रिस्तापाशी आला. येशूला स्पर्श करण्याची त्यांची धडपड चालली होती. कारण त्या स्पर्शामध्ये सर्वांना निरोगी करण्याचे सामर्थ्य भरले होते. संत मदर तेरेजा एक किरकोळ देहयष्टीची व्यक्ती! वृद्ध व निराश्रित तसेच विविध आजारांनी पिडलेल्या सामान्य जनांना तिच्या सहवासाची ओढ लागली होती. कारण तिच्या स्पर्शामध्ये करुणा भरली होती. “मदर, आजवर मी देवाला कधी पाहिले नाही. परंतु आज तुमच्या चेहऱ्यावर मायाळू परमेश्वर मला दिसत आहे.' " संत मदर तेरेजाच्या आश्रमातील एका वृद्ध माणसाचे ते अखेरचे शब्द होते. संत पॉल कलस्सै नगरातील ख्रिस्ती मंडळीला उद्देशून म्हणत आहे. “बंधुभगिनींनो, तुम्ही दैहिक स्वभाव झुगारून द्या. कारण तुम्ही स्नानसंस्काराद्वारे नवीन जीवन घेऊन उठला आहात. करुणेचा स्पर्श करून हे नवजीवन दुर्बलांना द्या.”
प्रार्थना: हे प्रभू येशू, विश्वासात दृढ राहून तुझ्या वचनात वाढण्यास व तुझ्या सामर्थ्याचा गुणण्याची स्पर्श अनुभवण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
✝️
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना २०२१
हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा , तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी, आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर ,
(इथे आपली विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. तू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर.
हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर.
हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.
0 टिप्पण्या