Marathi Bible Reading | Wednesday 8th September 2021 | 23rd Week in ordinary Time

   सामान्य काळातील 

तेवीसावा सप्ताह 

बुधवार 

८ सप्टेंबर २०२१


Happy Birthday Dear Mama Mary

पवित्र मरियेचा जन्मदिन सोहळा 

 ✝️

संत अल्फान्सोस लिगरी ह्यांनी आपल्या लिखाणामध्ये धन्य कुमारी पवित्र मरियेविषयी पुढील माहिती दिलेली आहे : 'देवाच्या पुत्राची माता होण्यासाठी पवित्र मरियेची निवड होणार होती. त्यादृष्टीने देवाने तिला तिच्या गर्भसंभवाच्या पहिल्या क्षणापासून निष्कलंक व मूळपापापासून दूर ठेवले. अशाप्रकारे परमेश्वराने तिला सर्व देवदूत व सर्व संत ह्यांच्याहून उच्च असे स्थान दिले.'
'पवित्र मरियेचा आत्मा ही देवाची पृथ्वीतलावर सर्वोत्कृष्ट अशी निर्मिती होती. स्वर्गात आणि पृथ्वीवर या सुंदर आत्म्याविषयी किती जल्लोष आणि आनंद मानला गेला असेल नाही? बाळ मरियेच्या जन्माबद्दल, देवाला प्रिय आणि पवित्र वाटणाऱ्या या बाळाच्या अत्युत्तम देणगीबद्दल आपणदेखील आनंद करावा हे उचित आहे.'
पवित्र मरिया नक्की कोणत्या ठिकाणी व वर्षी जन्मली त्याविषयी निश्चित पुरावा उपलब्ध नाही. मात्र संत जोकिम आणि आना हे मूळचे गालिलातील होते व नंतर ते जेरूसलेम येथे आले. ती दोघे बरीच वर्षे नि:संतान होते. त्यांच्या प्रदीर्घ प्रार्थनेनंतर त्यांच्या म्हातारपणी त्यांना झालेले कन्यारत्न म्हणजे देवाची निवडलेली कन्या, मरिया होय.
सर्वसाधारण सहाव्या शतकात सिरिया किंवा पॅलेस्टाईनमध्ये पवित्र मरियेच्या वाढदिवसाचा सोहळा साजरा होऊ लागला. रोमन ख्रिस्तसभेने साधारण सातव्या शतकापासून हा सोहळा आपल्या मुख्य उपासनेमध्ये समाविष्ट केला.
आज धन्य कुमारी पवित्र मरियेचा वाढदिवस ! युगानुयुग राज्य करणाऱ्या व जगाचा सम्राट होणाऱ्या ख्रिस्ताची माता होण्यासाठी देवाने तिची जडणघडण केली. धन्य तो परमेश्वर, धन्य ती कुमारी मरिया ! क्रेतचे संत एण्ड्रयू 
गेल्या नऊ दिवसापासून धन्य कुमारी मरियेच्या जीवनावर आपण चिंतन केलेले आहे. आज मरियामाते सारखे श्रद्धापूर्ण, प्रेमळ व परोपकारी जीवन आपल्याला जगता यावे म्हणून निश्चय करू या. जशी मरिया माता ख्रिस्तमय झाली होती तसे आपणसुद्धा ख्रिस्ताठायी समर्पित जीवन जगण्याचा निर्धार करू या.
✝️
पहिले वाचन : मीखा  ५:१-४

वाचक : मीखाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"असा समय येत आहे की, प्रसूतिवेदना पावणारी प्रसूत होईल."

प्रभू असे म्हणतो : हे बेथलेहेम एफ्राथा, जरी यहुदाच्या नगरामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यातून एकजण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलचा सत्ताधीश होईल. त्याचा उगम प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. म्हणून प्रसूतिवेदना पावणारी प्रसूत होईपर्यंत तो त्यांना परक्यांच्या अधीन करील. मग त्याच्या बंधूंचा अवशेष परत इस्राएलच्या वंशजाकडे येईल. तो प्रभूच्या प्रतापाने आपल्या प्रभू देवाच्या नावाच्या ऐश्वर्याने प्रकट होईल, आपल्या प्रजेचे पालन करील आणि ते निर्धास्त वस्ती करतील. कारण आता त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचेल.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १३ :६,७

प्रतिसाद :मी प्रभुठायी हर्ष करतो. 

१) मी तुझ्या दयेवर विसंबून आहे. 
माझे हृदय तू सिध्द केलेल्या तारणाने उल्हासेल.

२)परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत,
म्हणून मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे पवित्र कुमारी मरिये, तू धन्य असून गौरवास पात्र आहेस, कारण न्यायसूर्य ख्रिस्त, आमचा परमेश्वर, तुझ्या पोटी जन्मला.
 आलेलुया!


शुभवर्तमान मत्तय  १:१-१६, १८-२३

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"मरियेच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे."

आब्राहामचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त ह्याच्यापर्यंतची वंशावळ : आब्राहाम हा इसहाकचा बाप, इसहाक याकोबचा, याकोब यहूदा व त्याचे भाऊ यांचा बाप, यहूदा, पेरेस आणि जेरह यांचा बाप (त्यांची आई तामार), पेरेस हेसरोमाचा, हेसरोम रामाचा, राम अम्मीनादाबाचा, अम्मीनादाब नहशोनाचा, नहशोन सलमोनचा, सलमोन बवाजाचा बाप (बवाजाची आई राहाब), बवाज ओबेदचा बाप (ओबेदची आई रूथ), ओबेद इशायचा आणि इशाय राजा दावीद याचा बाप होता.

दावीद शलमोनचा बाप होता (शलमोनाची आई पूर्वी उरियाची पत्नी होती) शलमोन रहबामाचा, रहबाम अबीयाचा, अबीया आसाचा, आसा यहोशाफाटाचा, यहोशाफाट योरामाचा, योराम उज्जीयाचा, उज्जीया योथामाचा, योथाम आहाजाचा, आहाज हिजकीयाचा, हिजकीया मनश्शेचा, मनश्शे आमोनाचा, आमोन योशीयाचा, योशीया हा यखन्या आणि त्याचे भाऊ यांचा बाप, या काळात यहुदी लोक बाबिलोन येथे हद्दपार करण्यात आले.

बाबिलोन येथे हद्दपार झाल्यानंतर : यखन्या शलतीएलाचा बाप, शलतीएल जेरुब्बाबेलाचा, जेरूब्बाबेल अबीहूदाचा, अबीहूद एल्याकीमाचा, एल्याकीम अज्जूराचा, अज्जूर सादोकाचा, सादोका याखीमाचा, याखीम एलीहूदाचा, एलीहूद एलाजाराचा, एलाजार मत्तानाचा, मत्तान याकोबाचा, याकोब योसेफचा बाप. हा योसेफ  मरियेचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला. 

*(येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली : त्याची आई मरिया हिचा योसेफाशी वाड्. निश्चय झाला होता. पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच, पवित्र आत्म्याच्या योगाने ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वाड्.निश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, “दावीदच्या पुत्रा, योसेफ, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिऊ नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल, तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे.”) या घटना घडण्याचे कारण म्हणजे प्रभूने आपल्या संदेष्ट्यामार्फत वदवले होते. * “पाहा कुमारी गर्भवती होईल तिला मुलगा होईल. त्याला 'इम्मानुएल' म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: मरिया एक निरागस सुंदर बालिका म्हणून नाझरेथ गावी जन्मास आली. संत आन्ना व जोकिम या देवभिरू व प्रेमळ मातापित्याचं कृपाछेत्र तिला लाभलं. धन्य ते मातापिता ज्यांच्या प्रेमळ छायेखाली ती वाढली. या भाग्यशाली बालिकेच्या जन्माने इस्राएलच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार झाला. दावीद राजाचा संपूर्ण वंश परिवार भाग्यशाली ठरला. आज आपण या पवित्र बालिकेचा जन्मदिन साजरा करीत आहोत. याच दिवशी जगात जन्मास येणाऱ्या सर्व बालिकांकडे लक्ष देण्यास ख्रिस्तसभा आम्हाला आवर्जून सांगत आहे. आपल्या भारत देशातच पहा! मुलींचं जीवन किती अवहेलनेनं भरलेलं आहे. जन्माआधीच तिचा कोवळा जीव नष्ट केला जात आहे. ती जन्मास आली तर तिचं पोषण, संस्कार व शिक्षण या बाबतीत तिला वंचित ठेवलं जातं. म्हणूनच अनेक मान्यवरांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पिलेलं आहे. परंतु अजूनही खेडोपोडी तिच्यावर अन्याय होत आहेत आणि शहरात "निर्भया बलात्कार" सारख्या भयानक घटना घडत आहेत. मरिया मातेच्या जन्मदिनी पवित्र मातेच्या सर्व मुलींना सन्मानाने वागवण्याचा निर्धार करूया. तिच्या या जन्मदिनी हीच अमोल भेट देऊन तिचा सन्मान करू या.

प्रार्थना: हे धन्य पवित्र माते, तुझ्यासारखे पवित्र व सेवाभावी जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या