Marathi Bible Reading | Thursday 9th September 2021 | 23rd Week in ordinary Time

    सामान्य काळातील 

तेवीसावा सप्ताह 

गुरुवार 

९ सप्टेंबर २०२१

"तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीति करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा."

संत पीटर क्लेवर

वर्तनसाक्षी (१५८१-१६५४) 

 ✝️ 


ख्रिस्ताच्या प्रेमात एक कळप बनलेले आपण सर्वांनी प्रीतिने भरलेले जीवन  जगायचे आहे.

प्रीति हा देवाचा स्वभाव आहे आणि तोच प्रीति स्वभाव आपल्या प्रत्येकामध्ये अस्तित्वात असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने देव प्रीतिचा व परस्पर प्रीतिचाच संदेश आपल्याला दिलेला आहे. 
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देवासारखेच प्रेमस्वरूप बनण्यासाठी आवाहन करीत आहे. मानवी स्वभावात अनेक प्रकारची द्वेषभावना आणि सूड भावना भरलेली असते. प्रभू येशू दैवी स्वभाव धारण करण्यास पाचारण करीत आहे. म्हणूनच प्रभू येशू म्हणत आहे, ' तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीति करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, जे तुम्हास शाप देतात त्यांस आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भत्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा'. खरे पाहता मानवी स्वभावासाठी हे खूप कठीण आहे, मात्र देवाठायी सर्वकाही शक्य आहे. शेवटी प्रेम म्हणजेच दया. प्रभू म्हणत आहे, 'जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.

आपल्यामध्ये असलेला देव स्वभाव, प्रीतिचा, दयेचा व शांतिचा झरा खरोखरच अखंडपणे वाहत आहे का? आपण प्रेमळ, दयाळू व शांति करणारे आहोत का? परमेश्वर प्रेम आहे व त्याच्या प्रेमाचे आपण प्रतिक आहोत.
✝️
पहिले वाचन : कलस्सै  ३:१२-१७

वाचक : पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन  

" पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती धारण करा.'

तुम्ही देवाचे पवित्र आणि प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसांत क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंत:करणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या आणि बोध करा. आपल्या अंत:करणात देवाला स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा, बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १५० :१-६

प्रतिसाद : प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो.

१) परमेश्वराचे स्तवन करा.
देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, 
त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा, 
त्याच्या सामर्थ्याच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा, 
त्याच्या अद्वितीय थोरवीबद्दल त्याची स्तुती करा.

२) कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा, 
सतार आणि वीणा वाजवून त्याचे स्तवन करा, 
तंतूवाद्ये आणि बासरी वाजवून त्याचे स्तवन करा.

३) खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा, 
झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा, 
प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो. 
परमेश्वराचे स्तवन करा.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
 आलेलुया!


शुभवर्तमान लूक  :२७-३८

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 “जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.'

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्हा ऐकणाऱ्यांना मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमची निर्भर्त्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्यापुढे दुसराही गाल कर आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नको. जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नकोस. लोकांनी तुम्हांशी जसे वागावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा.

“जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करतात. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळवण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांना उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न आणि दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा."“तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही; कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही; क्षमा करा म्हणजे तुम्हांला क्षमा केली जाईल; द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल; चांगले माप दाबून, हालवून आणि शीग भरून तुमच्या पदरी घालतील. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: “प्रभू, सांग रे किती वेळा मी क्षमा करू भावाला ?” “करू एकदा, करू दोनदा की करू मी सातचिवेळा” या गीतामध्ये गीतकार प्रभू येशूला अंतःकरणापासून साद घालीत आहे. उत्तरादाखल प्रभू येशू सांगत आहे, “जसा तुमचा पिता दयाळू आहे, तसे तुम्हीही दयाळू व्हा.' आपल्या हृदयात दया भरली असेल तरच वैऱ्यावर आम्ही प्रीती करू शकतो. अशी प्रीती जात - पात. धर्म यांची बंधने मानीत नाही. स्वर्गीय पिता चांगले वाईट असा भेदभाव न करता सर्वांवर पाऊस पाण्याचा वर्षाव करतो. सर्वांसाठी निसर्ग समृद्ध करतो. अशी प्रीती जे बाळगतात ते द्वेषभावना मनातून काढून टाकतात. द्वेषाचा मार्ग हिंसेतून जातो. प्रभू येशूने क्रुसावरून वैऱ्यांना क्षमा केली. “शाप नको, आशीर्वाद द्या." हा महामंत्र प्रभू येशूने आम्हाला दिला आहे.

प्रार्थना:हे प्रीतिच्या उगमा, आमच्या अंतःकरणातील सर्व अमंगळपणा नाहीसा कर, तुझ्या प्रीतित वाढण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या