Marathi Bible Reading | Friday 10thSeptember 2021 | 23rd Week in ordinary Time

     सामान्य काळातील 

तेवीसावा सप्ताह 

शुक्रवार 

१० सप्टेंबर २०२१

“आंधळाच आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय ? "



तोलेंटिनोचे संत निकोलस

वर्तनसाक्षी (१२४५-१३०५) 

 ✝️ 

 फा. निकोलस ह्यांना गोरगरिबांविषयी आस्था होती. शुद्धिस्थानांतील आत्म्यांच्या तारणासाठी ते दररोज मध्यस्थीची प्रार्थना करीत.. एखाद्याच्या आत्म्याला पवित्र मिस्सा अर्पण केल्यामुळे तो आत्मा कालांतराने शुद्धिस्थानातून मुक्त होऊन स्वर्गात कसा जाई त्याचे दृष्टान्त वा साक्षात्कार फा. निकोलस ह्यांना प्रत्यक्ष मिस्साबली अर्पण करताना झालेला आहे.फा. निकोलस १० सप्टेंबर १३०५ रोजी मरण पावले. शुद्धिस्थानातील आत्म्यांच्या तारणासाठी संत निकोलस ह्यांचा धावा केला जातो. त्यांचे अविनाशी शरीर तोलेंटिनो येथे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे.

चांगल्या माणसाचे गुणविशेष काय असतात हे समजावून सांगताना प्रभू येशू आज चांगले झाड व चांगले फळ ह्याचे उदाहरण आपल्या समोर ठेवित आहे. प्रभू म्हणतो, 'चांगला माणूस आपल्या अंत:करणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो.' चांगला माणूस प्रभूच्या वचनांनी भरलेला असतो. चांगल्या माणसाचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास असतो. तसेच चांगला माणूस आज्ञाधारक व प्रामाणिक असतो. म्हणून चागंल्या माणसामध्ये पवित्र आत्म्याठायी चांगली फळे दिसून येत असतात. जे चांगले, दिव्य, पवित्र व सर्वांसाठी अनुकरणीय आहे अशा प्रभूच्या वचनात आपण सतत वाढले पाहिजे. त्या वचनाप्रमाणे आपले आचरण असावे म्हणून आज आपण आपल्या  जीवनशैलीवर चिंतन करु या.
चांगुलपणा हा परमेश्वाराचा दैवी गुण आहे. आपण चांगुलपणा हा गुण आत्मसात करु या.


✝️
पहिले वाचन : १ तिमथी  १:१-२,१२-१४

वाचक : पौलचे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"मी पूर्वी निंदक होतो तरी देवाने माझ्यावर दया केली. "

देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा ह्याच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडूनः विश्वासातील माझा सुपुत्र तिमथी ह्याला, देवपिता आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून कृपा, दया आणि शांती असो. ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो, कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा, आणि जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेवले. मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया केली. ख्रिस्त येशूमधील विश्वास आणि प्रीती ह्यांसह आपल्या प्रभूची कृपा माझ्यावर अगाध झाली.


हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १६ :१-२,५,७-८,११

प्रतिसाद :  प्रभो, तूच माझ्या वतनाचा भागीदार आहेस. 

१) हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या
आश्रयाला आलो आहे. 
मी प्रभूला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस.
 तुझ्याशिवाय मला सुख नाही.
प्रभू माझ्या वतनाचा आणि प्याल्याचा वाटा आहे. 
माझा हिस्सा सांभाळणारा तूच आहेस.रो. 
परमेश्वराचे स्तवन करा. 

२) प्रभूने मला बोध केला आहे, 
त्याला मी धन्यवाद देतो, 
माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते.
 मी आपल्यापुढे प्रभूला नित्य ठेवले आहे. 
तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.

३) जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, 
तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे, 
तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे,
माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.
 आलेलुया!


शुभवर्तमान लूक  :३९-४२

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 “आंधळाच आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय ? "

येशूने आपल्या शिष्यांना दाखला दिला की, “आंधळाच आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाही ? शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही, पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. तू आपल्या डोळ्यांतले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यांतले कुसळ का पाहतोस? अथवा तू आपल्या डोळ्यांतले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, भाऊ, तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे ? अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यांतले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: कुणी वाईटाच्या मार्गाने जात असेल तर त्यांना वेळीच त्याविषयी जाणीव करून द्यावी. वेळीच सावध केलं तर त्याचं पुढचं पाऊल सुधारू शकते. कधी कधी पालक आपल्या मुलांचे दोष लपवतात. मुलांच्या गैर वर्तणुकीचे समर्थन करतात. परंतु अजाण मुलं पालकांच्या या कृतीचा गैरअर्थ लावतात व वाम मार्गाला लागतात. वडील माणसांनी या बाबतीत दक्ष राहायला हवं. मात्र इतरांचे दोष दाखवताना स्वतःच्या जीवनाचं नीट परीक्षण करायला हवं. “आंधळा आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही, दोघेही खाचेत पडतील.' म्हणूनच ख्रिस्ती अनुयायांनी शुभवर्तमानाचा आरसा दृष्टीसमोर ठेवावा कारण ख्रिस्त आपला गुरू आहे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, चांगुलपणाने व श्रद्धेने जीवन जगून तुझी सुवार्ता घोषविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या