सामान्य काळातील
तेवीसावा सप्ताह
शनिवार
११ सप्टेंबर २०२१
“प्रत्येक झाड त्याच्या फळावरुन ओळखू येते.”
संत पाफ्नेशियस महान
महागुरू, वर्तनसाक्षी
✝️
सर्व स्थितीत सहनशिलतेचा व चांगुलपणाचा धडा संत पौल देत असतानाच ठासून सांगत आहे की, 'जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा असा एकमेव देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो, आमेन.'
चांगल्या माणसाचे गुणविशेष काय असतात हे समजावून सांगताना प्रभू येशू आज चांगले झाड व चांगले फळ ह्याचे उदाहरण आपल्या समोर ठेवित आहे. चांगला माणूस आज्ञाधारक व प्रामाणिक असतो. म्हणून चांगल्या माणसामध्ये पवित्र आत्म्याठायी चांगली फळे दिसून येत असतात. जे चांगले, दिव्य, पवित्र व सर्वांसाठी अनुकरणीय आहे अशा प्रभूच्या वचनात आपण सतत वाढले पाहिजे. त्या वचनाप्रमाणे आपले आचरण असावे म्हणून आज आपण आपल्या जीवनशैलीवर चिंतन करु या.
चांगुलपणा हा परमेश्वाराचा दैवी गुण आहे. परमेश्वर किती चांगला
आहे, ह्याचा अनुभव घेऊनपाहा, असे स्तोत्रकार आपल्याला सांगतो. चांगुलपणाने भरलेला माणूस देवाच्या वचनात समृद्ध बनत असतो, तसेच परोपकार व सेवाकरुन देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो.
पहिले वाचन : १ तिमथी १:१५-:१७
वाचक : पौलचे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्त येशू पापी लोकांना तारायला जगात आला.'
ख्रिस्त येशू पापी लोकांना तारायला जगात आला, हे वचन विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारायला योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी एक मुख्य आहे, तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया केली. जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा, असा एकच देव, त्याला सन्मान आणि गौरव युगानुयुगे असो. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११३ :१-७
प्रतिसाद : प्रभूचे नाव सदासर्वकाळ धन्यवादित असो.
१) प्रभूचे स्तवन करा. प्रभूचे सेवकहो,
तुम्ही त्याचे स्तवन करा,
प्रभूच्या नावाचे स्तवन करा.
आतापासून सदासर्वकाळ प्रभूचे नाव धन्यवादित असो.
२) सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत
परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे.
परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे,
त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे.
३) परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे.
जो आकाश आणि पृथ्वी ह्यांचे
अवलोकन करण्यास लवून पाहतो,
त्याच्यासारखा कोण आहे ?
तो दीनांना धुळीतून उठवतो,
गरिबांना उकिरड्यावरून उचलतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ.
शुभवर्तमान लूक ६:४३-४९
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
तुम्ही मला प्रभो, प्रभो म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही ?"
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही, तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही. फळावरून झाडाची परीक्षा होते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाहीत आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाहीत. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो, कारण अंत:करणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.
“तुम्ही मला प्रभू, प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही ? जो कोणी माझ्याकडे येतो आणि माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो. तो कोणी एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे, त्याने खोल खणून खडकावर पाया घातला, मग पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते घर हालले नाही. कारण ते मजबूत बांधले होते. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे, त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते घर लागलीच पडले आणि त्या घराचा सर्वनाश झाला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: जे अंतःकरणात भरलेलं असेल तेच मुखावटे निघते. मानवी अंतःकरण हे एखाद्या झाडासारखे असते. चांगल्या झाडाला चांगली फळे लागतात. तसेच ज्या माणसाच्या अंतःकरणात बंधुप्रेम भरलेले असते त्याची वाणी व करणी दुसऱ्याचं भलं व्हावे अशी असते. याउलट दुसऱ्यांची टीका व अवहेलना करणाऱ्या माणसाने आपलेही अंतःकरण तपासून पहावे. इतरांचा द्वेष, तिरस्कार, मत्सर यात समाधान मानणारा माणूस परमेश्वरापासून दूर राहातो. देवशब्दावर नियमित चिंतन करावे. संत प्रवृत्तीच्या माणसांची संगत धरावी ज्याद्वारे आध्यात्मिक जीवनाचा पाया भक्कम होतो.
प्रार्थना : हे प्रभू येशू, चांगुलपणाने व श्रद्धेने जीवन जगून तुझी सुवार्ता घोषविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या